You are currently viewing श्रावण आला…

श्रावण आला…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*श्रावण आला…*

 

श्रावण आला श्रावण आला

कानात माझ्या सांगून गेला..

फुलल्या वेली लेकुरवाळ्या

हासल्या सुंदर नाजुक कळ्या

कळ्यांना बांधला सुंदर झुला..

श्रावण आला श्रावण आला…

 

पारिजाताचा पडला सडा

गंध घेऊनी आला केवडा

रातराणीचा गंध कोंदला

अबोलीचा तो मुग्ध अबोला

कर्दळीचा लाल भडक शेला

श्रावण आला श्रावण आला…

 

मंदिरी नाद गेल्या ललना

सरसर सरी मंजुळ काना

ऊन सावली खेळ रंगला

रासक्रिडेत कान्हा दंगला

घराघरात झुलला झुला

श्रावण आला श्रावण आला…

 

सणवार ते मंगळागौरी

लाजत लाजत नाचती पोरी

साजण मनी जीव गुंतला

हळूवार हात लावी कुंतला

शृंगार मनी जीव झिंगला

श्रावण आला श्रावण आला…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा