You are currently viewing श्रावण..

श्रावण..

*मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*श्रावण….*

 

कशी माहेराची ओढ

बाई वाटे श्रावणात

कधी जाईन माहेरी

कधी सरेल ही रात

 

झुला नागपंचमीचा

माझी पाहतो गं वाट

पावसाची रिमझिम

कधी होईल पहाट

 

वसुंधरा नटते गं

तिचे पालटते रुप

लिंबलोण उतरावे

मना वाटे खूप खूप

 

भिजलेली वसुंधरा

फिटे डोळ्याचे पारणे

खेळ उन पावसाचा

दिसे आणिक देखणे

 

लयलूट ही सणांची

फक्त असे श्रावणात

राखी बांधीन भावला

मन रमे माहेरात

 

अष्टमीला गं कान्ह्याचा

झुलविन मी पाळणा

कधी येईल गं घरी

बाळ तो गोजिरवाणा

 

श्रावणाची ही सांगता

बाई होई गं पोळ्याने

बळीराजा नि बैलाला

घास घालीन प्रेमाने

 

नटलेल्या श्रावणाची

किती सांगावी महती

कधी येणार श्रावण

वाट सारेच पाहती

 

– अरुणा गर्जे

प्रतिक्रिया व्यक्त करा