You are currently viewing पाचवा

पाचवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*पाचवा*

 

दरवर्षी श्रावण येतो आणि सहजच नव्या भावभावनांचे, नवचैतन्याचे माप ओंजळीत टाकतो. उन्हाळलेल्या, भेगाळलेल्या, धरणीचे पर्जन्याशी मिलन होते आणि धरतीला नवा साज चढतो. नववधूचा नवा शृंगार लेऊन ती हसत, खेळत, बागडत नव्या रूपात अवतरते आणि अवघं विश्वच चैतन्यमय करते. नव्या तेजाची कात टाकते. तिच्या गर्भातून हिरवे अंकुर फुटतात आणि सृष्टीला हिरव्या रंगाचे नहाणच जणू घडते.

 

श्रावण म्हणजे सृजनाचा महिना. कवी बा.भ, बोरकर म्हणतात,

 

समुद्र बिलोरी ऐना

सृष्टीला पाचवा म्हैना

वाकले माडाचे माथे

चांदणे पाण्यात न्हाते..

 

ऊनपावसाचा हा श्रावण, हिरव्या शिवारावर फुललेल्या रंगीबेरंगी रानफुलांचा श्रावण, श्रावण म्हणजे हिरवा रंगोत्सव, नवनिर्मितीचा हा ऋतू, श्रावण म्हणजे पाऊस स्थिरावत असलेला मास, पाचू सारखा हिरवा म्हणून *पाचवा* श्रावण, पाऊस आणि सृजन यातलं अमीट नातं दाखवणारा श्रावण, मनभावन श्रावण, निळ्या मेघातून बरसणाऱ्या रेशीमधारात भिजणारा श्रावण, हळदीचं ऊन रांगत येतं आणि आभाळात इंद्रधनुष्य उमटतं. सप्तरंगाची ही कमान म्हणजे नभातले तोरण जणू, श्रावणातल्या आनंदोत्सवाचं ते प्रतीक.

 

श्रावणात जशी वृक्षवल्लींना पालवी फुटते तशी मानवी मनालाही फुटते. मुसळालाही कोंब फुटावे असा हा महिना. सर्जनशील, नव्याला जन्म देणारा.

 

हिरव्या तृणांची पाती दुडदुडतात, लव्हाळी डोलतात, नदी झुळझुळते, डोंगरावरून अमृत कलश वाहतात, दगडावरचं शेवाळं सुद्धा कसं गालीचा अंथरल्यासारखं वाटतं, मधूनच फांदीवरून पोपटाचा थवा हिरवळीवरून नाचत जातो नाहीतर जलाशयाच्या किनाऱ्यावर पंख फडफडवत एखादी बदकाची प्रणय जोडी दृष्टीस पडते, मोरांची जोडी वातावरणात प्रणयधुंद केकारव करते.

 

या शृंगारिक श्रावणाला जसा गंध आहे तसा नादही आहे. या नादगंधात मनाला मुक्तपणे झोकून द्यावं आणि त्या ब्रह्मानंदाशी सूर लावावा. परमात्म्याशी एकरूप होऊन जावं. अंतरंगातले तानपुरे जुळतात आणि मल्हार बरसतो.

 

अशा या श्रावणाने शब्दसृष्टीच्या त्या कवीरूपी ईश्वरांना वेड नाही लावले तर नवलच ना?

*कवी शंकर रामाणी* म्हणतात,

 

मदालस स्पर्श सुखाचा सडा

भेगाळलेले गात्र गात्र अन

मुखात श्रावणविडा

हिरवे हिरवे मळे मनाचे

हिरवा पक्षी दडे

पैलथडीच्या पल्याड कोठे

प्राणांचे चौघडे ….

 

खरोखरच या श्रावणातला शृंगार देहाच्या अंत:प्रवाहात मांगल्याचे सूर घुमवतो. मेंदीच्या पानावर मनाला झुलवतो. झाडाझाडातून अवचित मोर पिसारा फुलतो आणि मन हर्षसागरात तुडुंब बुडून जाते.

 

हा श्रावण नुसताच रेशीमधारा घेऊन येत नाही बरं का! सोबत मानवी जीवनासाठी कित्येक आनंदाचे संकेत घेऊन येतो. सणासोहळ्यांचा उल्हास घेऊन अवतरतो.

वावरात कणसाचे दाणे भरत असतात आणि मनात प्रेमाचा महापूर वाहत असतो. सया नागोबाच्या वारुळाला जातात, बहीण भावाला प्रेमाचा धागा बांधते, कृष्णजन्माची गाणी गाता गाता मनातली यमुना मुसळधार पावसात खळखळते, दहीहंडीतल्या काल्याची न्यारी मजा लुटली जाते, *वादळ वारं सुटलं ग दर्याला तुफान उठलं ग* म्हणत त्या खवळणाऱ्या सागराची नारळ अर्पण करून पूजा केली जाते. श्रावणी शुक्रवारचे चणे आणि जीवतीचे पूजन कसे ऊर्जादायी वाटते आणि शेवटच्या दिवशी अमावस्येचं ते बैल पूजन. या धरणीला, चराचराला, झाडापानांना, प्राणीमात्रांना, कृतज्ञतेचा भाव अर्पण करणारेच हे सारे सोहळे किती सुंदर, अर्थपूर्ण आणि प्रेमाचा आविष्कार देणारे! याचवेळी ललनांना नटावसं वाटतं, मुरडावसं वाटतं. चापूनचोपून ठेवणीतली वस्त्रं नेसावीत, अंगावर आभूषणे मिरवावीत आणि सौंदर्या कडून सौंदर्यातच विरघळून जावे.

या ललनांना पाहताना बालकवी म्हणतात,

*सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती

सुंदर बाला त्या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती..*

 

श्रावणातल्या शृंगाराचा आस्वाद घेताना बालकवींना हा पुरोपकंठी शब्द कसा सुचला असेल? या धरतीवरचे हे उपवन म्हणजे खरोखरच बिनकुलुपाचा मुक्त खजिना!

*देता किती देशी घेणाऱ्याचे हात अपुरे* अशी होणारी अवस्था म्हणजे श्रावण महिना.

 

पत्री फुलांच्या सुगंधासोबत या श्रावणात आणखी एक गंध दरवळत असतो जो रसनेला तृप्त करतो. घरोघरी केले जाणारे ते पारंपरिक पदार्थ आणि त्यांचे रुचीस्वादगंध. बाहेर नयनशृंगार आणि आत रसनेसाठी शृंगार.

त्या रसरशीत नारळाच्या दुधातल्या तांदळाच्या शेवया, नाहीतर गरमागरम वाफाळलेले कळीदार उकडीचे मोदक, त्या केळीच्या हिरव्यागार पानावर मांडलेला तो पाकसाज, त्या रानभाज्या, ती भुईफोडं… अनंत रस आणि अनंत स्वाद.

दुर्गाबाई म्हणतात,

“ पारिजातकाच्या मोत्यापोवळ्याच्या राशीतून श्रावणाचं हसू फुटतं”

 

किती खरं आहे!

रूपरसरंगगंधाचे सारे सुंदर विभ्रम या श्रावणात दिसतात. मोगऱ्याचे फूल हुंगावे तसेच कृष्णमेघांना हुंगावं असं वाटतं. मनात आसक्ती असते आणि आसक्तीतच सृजन असते म्हणून हा सृजनमास— शृंगारमास. तृप्तीचा महिना. चैतन्याचा गर्भ स्थिरावलेला हा पाचवा मास, श्रावण मास…

 

राधिका भांडारकर.

प्रतिक्रिया व्यक्त करा