You are currently viewing मुंगी उडाली आकाशी

मुंगी उडाली आकाशी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.शैलजा करोडे लिखित अप्रतिम कथा*

 

*मुंगी उडाली आकाशी*

—————————————

“अगं थोडसं सैल सोड तू. आक्रसून घेऊ नकोस. तुला भीती वाटणं साहजिकच आहे. पण आई व्हायचंय ना तुला. मग हे उपचार तर करावेच लागतील. काही त्रास होणार नाही तुला. या उपचारानंतर पुढच्या वेळेस येशील तू गोड आनंदाची बातमी घेऊनच. आणि मग पुढे बाळंतपणासाठी. मग मला सहकार्य कर.” पेशंटची कळी खुलली. उपचार करून घेण्यास मला सहकार्य देण्यास तयार झाली.

 

“बाई, तुम्ही धन्वंतरी आहात. आजपर्यंत अनेक घरात तुमच्या मदतीने, ज्ञानाने वंशाचा दिवा उजळलाय. घरात पाळणा हलला आहे. सगळी आशा सोडून दिलेल्यांना तुम्ही पुन्हा त्यांच्या काळोख्या जीवनात दीपज्योती प्रज्वलित केलेल्या आहेत. अनेक मातांची ओटी भरून तुम्ही त्यांचे आशीर्वाद घेतलेत. त्यांच्या कुटुंबात आनंद निर्माण केलात. खरंच बाई, परमेश्वराला तर मी पाहिलं नाही पण परमेश्वरा समान माणूस मी तुमच्या रूपात पाहिलाय.” पेशंटची सासू शेवंता सोनटक्के बोलत होती.

 

“अहो, मी काही करत नाही. जे काही घडतं त्यामागे परमपित्या परमेश्वराचीच प्रेरणा असते. मी तर एक निमित्त मात्र. पेशंट्सची सेवा करणे हे तर माझं व्रत. त्यांना योग्य मार्गदर्शन करणं , औषध उपचार करणं , त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यानुसार उपचार करणं हे तर माझं कर्तव्यचं. माझ्या हाताला यश आहे असं तुम्ही मानता , पण मावशी माझ्या पेशंटचे सहकार्य, जिद्द, इच्छाशक्ती आणि मनोबल ही त्यांना मदत करतं. माझ्या प्रयत्नांना अशी सहकार्याची जोड मिळाली तर यश मिळणारच ना मावशी. होय एक गोष्ट मात्र मी कटाक्षानं पाळलीय, मी आणि पेशंटच्या दरम्यान पैसा हा महत्त्वपूर्ण घटक मी कधीही ठरू दिला नाही. एखादा गरजवंत अडचणीतील पेशंट असेल तर पैशा अभावी त्याचे उपचार न करणं हे माझ्या तत्त्वात कधीच बसलं नाही. अनेकांची मी मदत केली आहे, करीत आहे आणि करीत राहीन.”

 

“तेच तर म्हणते ताई मी , माणसापेक्षा त्याच्यातील माणुसकी ही श्रेष्ठ असते. तुमच्यातील माणुसकी, तुमच्यातील जिद्द, कामातील सचोटी यामुळेच तर माणूस ओढला जातोय तुमच्याकडे. तुमचं लाघवी बोलणं, पेशंटसच्या समस्या अगदी मातेच्या ममतेनं जाणून घेणं, सगळंच विलक्षण. तुमच्या बोलण्यानेच बाई पेशंटचा निम्मा आजार बरा होतो. अनेक माता भगिनी रित्या ओटीन , रित्या मनानं तुमच्याकडे येतात, आणि निराश न होता भरभरून सुख घेऊन जातात. म्हणून तर म्हणते तुम्ही धन्वंतरी नाही तर कोण आहात बाई?” शेवंताबाई दिलखुलास हसली.

 

“ठीक आहे मावशी, तुमच्या सुनेसाठी मी , ही काही औषधे लिहून देते. ती वेळेच्या वेळी घ्या. तिच्या खाण्यापिण्याकडे ही लक्ष असू द्या. थोडीशी ॲनिमिक झालीय ती. रक्ताची कमतरता भरण्यासाठी सकाळच्या वेळी खजूर, राजगिऱ्याचा लाडू, पालकाची भाजी, सफरचंदे, दूध, डाळी यांचा आहारात समावेश असू द्या. या महिन्याचं मासिक चक्र संपलं की लगेचच घेऊन या तिला.”

 

“होय, डॉक्टर ताई तुम्ही सांगितलेला प्रत्येक सल्ला पाळीन मी. माझ्या ही सुनेची ओटी भरू द्या. माझ्याही घरात चिमणी पावलं उमटू द्या. आणि आजी म्हणून आता माझंही प्रमोशन होऊ द्यात. ऋणी राहीन तुमची.”

 

मी माझा आश्वासक हात त्यांच्या हातावर ठेवला. मायेने थोडासा दाबला. शेवंताबाईच्या नेत्रात आसवांनी दाटी केली. “या मावशी आता.” मी टेबलावरची बेल दाबली तशी नर्स आत आली “नेक्स्ट” , “येस मॅडम” म्हणत तिने पुढील पेशंटला माझ्या केबिनमध्ये सोडलं.

 

सुनिता निनावे व तिचे यजमान माझ्यासमोर बसले. “काय त्रास होतो.” “मॅडम आमच्या लग्नाला एक वर्ष होत आलंय. पण अजून बाळाची चाहूल लागली नाही. घरात आई-बाबांनाही नातवंडाचं मुख पाहण्याची तीव्र इच्छा वाढलीय.

 

“हे बघा, निनावे साहेब, एक वर्ष म्हणजे काही फार मोठा काळ नाही. अजून एक वर्ष आपण वाट पाहूया. दोन वर्षांच्या कालावधीतही अपयश आलं तर मग पुढील सगळ्या टेस्ट, उपायोजना आपण करूयात.”

 

“सुनिता तुझे चेकअप करूयात.” नर्स ने सुनीताला टेबलावर झोपले. सुनिता मासिक चक्र व्यवस्थित सुरू आहे ना. त्यात काही अनियमितता तर नाही ना.” “नाही मॅडम, मला कसलाही त्रास होत नाही. पोटात दुखत नाही की ब्लीडिंग चा त्रासही होत नाही.” “गुड गुड ,बाकी सर्व ठीक आहे.” मी काही शक्तिवर्धक औषधे लिहून देते. आहार-विहार-योग्य व्यायामाचीही जोड असू दे. आणि मुख्य म्हणजे चिंता करू नकोस. काळजी करणं सोडून दे. “ऑल द बेस्ट” “येस मॅडम,” सुनिता व तिच्या यजमानांचा चेहऱ्यावर हास्य पसरले.

 

काम आटोपून मी थोडी रिलॅक्स झाले. अर्थात असे निवांत क्षण माझ्या जीवनात फार कमी प्रमाणात येत. सातत्याने पेशंट, प्रसुती, दिवसाचे 24 तास मी जणू कामाला वाहिलेली होते. माझ्या दोन सखी भारती आणि रेखा या दोघींची मला खूप मदत व्हायची. बरीचशी जबाबदारी त्या सांभाळत. जणू माझा उजवा हातच होत्या ह्या दोघीजणी.”

 

“मॅडम कॉफी” भारती ने गरमागरम कॉफीचा मग माझ्या हाती दिला. माझ्या थकल्या भागल्या जीवाला ती कॉफी अमृता समान वाटली. “भारती, सगळ्या पेशंट ठीक आहेत.” “होय मॅडम, रूम नंबर सात मधील पेशंटचं बाळ दूध पीत नाही हे तिचं म्हणणं ” “अगं मग बाळाच्या पायाला गुदगुल्या करा. त्याच्या कानाच्या चाफ्यावर हळूवार मसाज करा. कपाळावर मायेने हात फिरवा.बाळ लगेच दूध प्यायला सुरुवात करेल” “होय मॅडम, करते मी हे सगळं आणि मॅडम लेबर रूममध्ये एक पहिलटकरीण तळमळतेय .मी प्राथमिक स्तरावर तिची सर्वस्वी मदत करीत आहे . पण तिला काही वेदना सहन होत नाही आहेत . खूप आरडाओरडा करतेय . संपूर्ण हाॅस्पिटल दणाणलंय . आपण बघा मॅडम आता तिला ” ” ओ के , मी आलेच , वेळ पडली तर आँपरेशन थिएटर सुसज्ज ठेवा सिझेरियनसाठी . आपण नैसर्गिक सुटकेवरच भर देऊयात . सिझेरियन शेवटचा उपाय .”

 

मी पेशंटला स्टेथास्कोपनं तपासलं , तिचे व बाळाचे ठोकेही ठीक होते . ” हे बघ बाळ जन्माला येणार , ते आसुसलंय जगात पहिलं पाऊल टाकायला आणि तू त्याची मदत नाही करत. पोटात वेदनेची कळ उठली की तू ही प्राणपणानं शक्ती लाव. बाळाचा मार्ग सुकर होईल. ”

 

“आता नाही सहन होत डॉक्टर ताई. मी पाया पडते तुमच्या पण माझी सुटका लवकर करा. सिझर करा माझं.”

 

“अगं जगात बाळाचं पहिलं पाऊल पाहणं , त्याच्या संघर्ष पाहणं आणि त्याने फोडलेला पहिला टाहो ऐकणं हे तर प्रत्येक मातेचं आद्य कर्तव्य, नव्हे तो तिच्या जीवनातला सोनेरी क्षण. अशा सोनेरी क्षणाची साक्षीदार होण्याऐवजी झोपी जाऊन बाळाला जन्म देणार होय. तुला तपासलंय मी. नैसर्गिक प्रसुतीची सगळी चिन्हे आहेत. मग कशासाठी सिझेरियन करायचं. आणि ऑपरेशन नंतर दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती. जखमेचं दुरुस्त होणं, त्यामुळे येणारा अशक्तपणा, का ओढवून घेतेस”.

 

“नाही नाही डॉक्टर ताई. खूप त्रास होतोय मला तुम्ही करा माझं ऑपरेशन. मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही”. मी तिला हलकेच थोपटून आश्वस्त केले.

 

“डॉक्टर ताई कशी आहे माझी मुलगी खूप त्रास होतोय हो. तिच्या वेदना ऐकल्याही जात नाहीत माझ्याकडून.”

 

“मावशी तुम्ही स्वतःही या दिव्यातून गेल्या आहात. आणि आज तुम्हीच घाबरताय. रीमा च्या नैसर्गिक प्रसुतीची सगळी चिन्हे आहेत. हे सगळं आपण तिच्या आणि बाळाच्या भल्यासाठीच करीत आहोत. थोडा धीर धरा. होईल सगळं व्यवस्थित.”

 

“मॅडम, बालरोग तज्ञ डॉक्टर राहुल पाटील आलेत.”

 

“माझ्या केबिनमध्ये बसव त्यांना चहा कॉफीचं विचारशील. मी येतेच थोड्या वेळात.”

 

“या डॉक्टर साहेब,  काल माझ्याकडे एक अपूर्ण दिवसाची सातव्या महिन्यातच प्रसूती झालीये. बाळ अतिशय कमी वजनाचं. फक्त सोळाशे ग्रॅम वजनाचं आहे. इनक्यूबेटर मध्ये ठेवलंय. तुमचा सल्ला हवाय. बाळाला तुम्हीच ट्रीट करा.” “ओके मॅडम, बघूया पेशंट” म्हणत मी आणि डॉक्टर त्या रूम कडे वळलो. “मॅडम बाळ कमी वजनचं अवश्य आहे. पण हेल्दी आहे. निरोगी आहे. जवळपास एक महिनाभर तरी याला इनक्यूबेटर लागेल. होईल सगळं व्यवस्थित.”

 

डॉक्टर पाटील माझ्या दवाखान्यातील प्रत्येक बाळाची देखभाल करीत. प्रत्येक जन्माला येणाऱ्या बाळाला बालरोग तज्ञाला दाखवून देणे हा अलिखित नियमच केला होता मी माझ्यासाठी.

 

“रेखा आज जन्माला आलेल्या बाळांची यादी दिलीस कां महानगरपालिकेत.” “होय मॅडम, काल जन्मालेल्या तिघी बाळांची , दोन मुली एक मुलगा याची यादी दिली मी महानगरपालिकेत , जन्म मत्यू नोंदणी विभागात .” “व्हेरी गुड-चल रीमा काय म्हणतेय बघूया.”

 

रीमाने आता संपूर्ण हॉस्पिटल दणाणून सोडलं होतं. आणि तो सुवर्णक्षण मी एका झटक्यासरशी टिपला. बाळाचं डोकं बाहेर येतात त्याला हळुवारपणे संपूर्ण बाहेर ओढलं. आणि रेखाच्या हाती दिलं. तिनं बाळाच्या नाका तोंडावरची घाण साफ केली आणि लगेच बाळाने टाहो फोडला. रीमाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. संपूर्ण कुटुंब आनंद सागरात न्हाऊन निघालं. बाळाच्या जन्माच्या वेळी बाळ ओढल्याने प्रत्येक पहिलटकरीणीला टाके येतातच. मी ते काम करण्यात गर्क झाले. माझ्या धाकटा भाऊला व्हिडिओ चित्रीकरण यांचं मोठं वेड. अर्थात हा त्याचा छंद होता. शिक्षण त्याचं सुरू होतं. त्याने बाळाच्या जन्माची सीडीच तयार केली .बाळाला प्रत्येक नातेवाईकांकडे देणं, त्यांचे ते आनंदाचे चेहरे कॅमेर्‍यात बंद करणं, नवजात आईचं नवजात बालकाशी संवाद साधणं – सगळं सगळं त्याने चित्रीत केलं.

 

पेढ्यांचा बॉक्स माझ्या हाती देत रीमाची आई उद्गारली, “ताई तोंड गोड करा तुमचं” “अहो मावशी, तुमचं तोंड गोड होऊ देत आधी. आजीबाई झालात तुम्ही.” म्हणून मी तिने दिलेल्या बॉक्स मधील पेढा तिला भरवला. “ताई बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. चांगले आहेत. निरोगी आहेत. भरून पावले मी.”

“ही सगळी परमेश्वराची कृपा. आपण फक्त मदतीचे हात  सगळं नियंत्रण तर त्याच्याच हाती आहे.”

 

आज सकाळी सकाळी माझ्याकडून अंथरुणातून उठवलेही जात नव्हते. अंगात तापाची कणकण जाणवत होती. डोकं दुखत होतं. सर्दीनं  नाक बंद झालं होतं. थोडासा खोकलाही येत होता. रेखा ड्युटीवर हजर झालीच होती. “मॅडम काय त्रास होतोय आपल्याला, चेहराही बराच उतरलाय.” “अगं रेखा, बघ अंगात ताप आहे माझ्या. थर्मामीटर आण बघू”. “बापरे मॅडम 102 डिग्री ताप आहे तुम्हाला.” “थांबा मी डॉक्टर देवकरांना बोलवते”. म्हणत तिने डॉक्टरांना फोन लावला.

 

“काय होतंय गं माझ्या बछडीला” म्हणत आई माझे जवळ आली. वार्धक्याने तिचा थरथरणारा हात ,डोळ्यातून माझ्या विषयी ओसंडून वाहणारी अपार माया, करुणा पाहून मला भडभडून आलं. “उगी उगी बाळ, अंगं केवढं तापलंय. रात्रंदिवस काम, काम आणि काम. आजार पण नाही येणार तर काय होणार अशानं. कधी विश्रांती म्हणून नाही की चार आठ दिवस कुठे गावी जाणं नाही. सातत्याने कामाच्या दावणीला जुंपलेली. आता काही ऐकणार नाही मी तुझं. पंधरा दिवस डॉक्टर वृशालीला सोपव तुझ्या हॉस्पिटलचं काम. करील ती तुझी मदत.” “अग आई किती काळजी करशील माझी. ऋतू बदलामुळे होतो त्रास. काही काळजी करू नकोस. ”

 

“हा काय म्हणतोय आमचा पेशंट” म्हणून डॉक्टर देवकरांनी माझ्या रूममध्ये प्रवेश केला. मनगटावर बोटे ठेवून नाडीचे ठोके घेतले. टॉर्च चा झोत टाकून डोळ्यांची बुब्बुळे तपासली.  स्टेथास्कोपने हृदयाचे ठोके घेतले.” “केव्हापासून आलाय ताप. ” ” काल रात्रीपासूनच मला बरं नव्हतं डॉक्टर साहेब. आज तर अंथरुणातूनही उठवले जात नाही आहे.” ताप, सर्दी, खोकला सगळी व्हायरल फिवरची लक्षणे आहेत. मी औषधे लिहून देतो, ती वेळेवर घ्या आणि रेखा ही दोन इंजेक्शनने सलाईनच्या ड्रिप मधून जाऊ देत शरीरात. होईल ताप लवकर कंट्रोल. आणि आई काही काळजी करू नका. लवकरच बऱ्या होतील मॅडम.

“माझं मेलीचं म्हातारपण. त्यात या पोरांना काही त्रास झाला तर माझं अवसानचं संपतं. हातपाय गळतात माझे. कधी आराम करीत नाही पोरगी, विश्रांतीसाठी कुठे जात ही नाही. 24 तास नुसती कामाला वाहिलेली. अहो यंत्राला सुद्धा काही तासांची विश्रांती लागते. तेव्हा ते पुन्हा पुर्ववत काम करतात. आम्ही तर हाडामासांची माणसे. त्यांना विश्रांती नको. मग व्हायचा तो परिणाम होतोच. बघा ना कसं अंथरुणातूनही उठवत नाही आहे आज हिच्याकडून.”

“हो बरोबर आहे आई. विश्रांती तर पाहिजेच. सक्तीच्या विश्रांतीसाठी तर सलाईनची बाटली लावली आहे. काळजी करू नका तुम्ही. येतोय मॅडम” डॉक्टर देवकर निघून गेले.

 

अंगात असलेला ताप , त्यामुळे आलेली ग्लानी , प्रचंड थकवा आणि पाच-सहा तास पुरणारे सलाईनमुळे माझ्या

पापण्या केव्हा जडावल्या आणि मी निद्रेच्या आधीन झाले मला कळलेही नाही. आज दिवसभराच्या माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट्स रेखाने रद्द केल्या होत्या. अगदीच इमर्जन्सी केस असली तर डॉक्टर वृशालीला बोलवण्यात येणार होते.

 

सायंकाळपर्यंत माझा ताप बराच कंट्रोल झाला होता. पण अंग मात्र ठणकत होतं. विकनेस खूप जाणवत होता. ” उठलीस बाळ , चल थोडीशी चूळ भर आणि खाऊन घे. मूग डाळीची मऊ खिचडी केली आहे तुझ्यासाठी , त्यावर थोडीशी शुद्ध तुपाची धार. चवीला पापड आणि खुर्चणीची चटणी केलीय. जेवून घे बेटा. त्याशिवाय तुला तकवा कसा राहील. आईने मला जेवायला भाग पाडले. पण अन्नाची चव लागत नव्हती. सगळंच कडू वाटत होतं. अन्न गिळले न जाता तोंडातच गोळी होत होती. “होतंय बेटा तापात  असं आणि हा अशक्तपणा चांगला आठ-दहा दिवस घेईल पूर्णपणे बरं व्हायला. आईने हलकेच माझ्या कपाळावर थोपटले.”

 

सायंकाळची मंद वाऱ्याची झुळूक हिरवळीवरचा प्रशांत गारवा, रात राणीचा मंद सुगंध माझ्या खिडकीतून माझ्यापर्यंत पोचत होता. या आल्हाददायी वातावरणानं थोडं मोकळं वाटलं. माझी कळी खुलली. आणि काहीतरी काम करावं , माझं मन मला खुणावू लागलं.

 

रेखा परवा येऊन गेलेल्या हेमांगी जोशीचा टेस्ट रिपोर्ट आलाय तो जरा मला दाखवशील. निवांतपणा आहे तर थोडं बारकाईने त्याविषयी मला विचार करता येईल. “होय मॅडम, मी घेऊन येते ती रिपोर्ट फाईल”.

 

लग्नाला चांगली पाच वर्षे होऊनही मातृत्व सुखाने वंचित हेमांगी माझ्याकडे आली होती मोठी आशा घेऊन. “डॉक्टर ताई मदत करा हो माझी .तुम्ही सांगाल ते सगळे औषधोपचार , तपासण्या करून घेण्यास मी तयार आहे. त्यासाठी कोण कोणती दिव्ये मी केली मलाच माहित. उपवास, व्रतवैकल्य, घरगुती उपचार,  पवित्र नद्यांचं स्नान. सगळं सगळं केलं. घरात सासूबाईचा तगादा वाढलाय. नातेवाईक , शेजारी, मित्र मैत्रीणी, शुभचिंतक, हितचिंतक, प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तर देताना माझी दमछाक होते हो. आणि डॉक्टर बाळाच्या मऊ कोमल स्पर्शासाठी मी सुद्धा आसुसले हो.” “हेमांगी, अगं इतकी सेंटीमेंटल होऊ नकोस. आपण करू उपचार. सगळे प्रयत्न करू. ईश्वर नक्कीच आपली मदत करेल.”

 

मी हेमांगीची फाईल चाळली हेमांगीचं गर्भाशयचं अविकसित  होतं जन्मतःच त्यात दोष होता. ईश्वराने तिला स्त्रीत्व तर दिलं होतं, पण मातृ सुखाचा तिचा तो मार्ग मात्र अविकसित राहिला होता. अशा स्थितीत तिला मातृत्व लाभणं कठीण होतं. हेमांगीला माता होण्यासाठी दोनच मार्ग आता शिल्लक होते. एक तर तिने मूल दत्तक घेणे. दुसरा भाडोत्री आईच्या (सरोगेट मदर) गर्भाशयात मूल वाढविणे. हेमाचे यजमान अविनाश जोशी तसे समजदार गृहस्थ होते. पण कुटुंबातून किती सहकार्य मिळेल याविषयी मी साशंक होते.

 

माझ्या हातातील फाईल काढून घेत आई म्हणाली, “एक दिवस तर आराम कर माझी बाई.” मी मंद स्मित करीत फाईल ठेवली. आईला बरं वाटावं म्हणून बेडवर आडवी झाले. आणि हळूहळू भूतकाळाची आवर्तने माझ्या मन: पटावरून सरकू लागली. आई-वडिलांच्या संसार वेलीवरचं मी पहिलं वहिलं फूल. माझा जन्मच सगळ्यांना आनंद देणार होता. सगळ्यांच्या मुखावर हास्य होते. कारण बऱ्याच दिवसातनं रांगती पावलं घरभर दुडूदुडू धावत होती. माझ्यानंतर घरात दोन भावांचा जन्म झाला. सुखाच्या राशीवर आम्ही सगळे खेळत होतो, बागडत होतो.

माझा शाळा प्रवेश, शिक्षणातील गती, इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड, माझा वाचनाचा छंद- घरात नेहमीच कौतुकाचा, प्रोत्साहनाचा विषय ठरला. मुलगी म्हणून कुठलीही आडकाठी दुय्यम दर्जा मला कधी मिळाला नाही. वयाची बारा वर्ष मी पार केली आणि आईची काळजी वाढू लागली. मुलगी तारुण्यात पदार्पण करेल, तिला सांभाळायला पाहिजे ,या चिंतेने ती पोखरली जाऊ लागली. पण वयाची पंधरा वर्षे पार होऊनही माझ्यात स्त्रित्वाची

कोणतीच लक्षणे न दिसल्याने आई-बाबांनी मला डॉक्टरांकडे नेले. माझी सगळी शारीरिक तपासणी, सोनोग्राफी करण्यात आली. आणि विधात्याने माझ्यावर केलेला अन्याय लक्षात आला. मुलगी म्हणून मला जन्म तर मिळाला पण स्त्रित्व बहाल करणारा तो अवयवच (गर्भाशय) माझ्या शरीरात नव्हता. माझ्या कुटुंबावर तर हा आघात होताच. पण माझ्या तनामनावर आघात करणारा हा क्रूर नियतीचा खेळ होता. पण माझे वडील मोठे खंबीर आणि धीरोदत्त विचारसरणीचे, ताठ कण्याचे एक सद्गृहस्थ होते. त्यांनी आईला व मुख्यतः मला सावरले.

 

” काही काळजी करू नकोस बेटा. तुझा अभ्यास उत्तम चालू ठेव. त्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित कर. खूप शिक .मोठी हो आणि स्वतःच्या पायावर उभी रहा. ताठ मानेने ताठ कण्याने जगायला समर्थ करण्याइतका तुझा बाप नक्कीच तुला मदत करणारा आहे. “अहो पण मुलीची जात, परक्याचं धन आणि हा समाज- कसं सगळ्यांना तोंड देणार ?. मुलीचं लग्न कसं होणार?कोण करील तिच्याशी लग्न? आणि मुलींचे लग्न नाही केलं तर समाज काय म्हणेल?” माझी आई बोलत होती .थोडीशी पॅनिक झाली होती

 

“कोणता समाज, कोणते लोक, कोणाला घाबरताय तुम्ही. तुमचं दुःख, तुमचे कष्ट, कमी करायला काही हा समाज येत नाही. मग तुम्हाला बोलणारा, तुम्हाला बोट दाखवणारा कोणता समाज म्हणता तुम्ही. त्यांना अधिकार तरी आहे का तुम्हाला बोलण्याचा.”

 

बाबांचा खंबीरपणा , आईची मदत, भावांचं सहकार्य मी यशाच्या पायऱ्या भरभर चढत होते. बारावीचा माझा परीक्षेचा निकाल लागला. आणि मी बाबाजवळ मनमोकळेपणाने बोलले. “बाबा मला उत्तम डॉक्टर व्हायचंय. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून अनेक माता-भगिनींची सेवा करायचीय. विधात्याने माझ्यावर अन्याय केला स्त्रि जन्मा येऊनही स्त्रीचं पूर्णत्व मातृत्व सुखापासून मी वंचित राहिले. माझं दुःख सहन करण्याची विधात्यानचं मला शक्ती दिलीय. आता माझ्यासारख्या अनेक भगिनींची सेवा करून माझा हा जन्मच ही सफल करीन. मी अभागी नाही हो बाबा.”

 

“कोण म्हणते बेटा तू अभागी आहेस म्हणून. आणि तुझा विचार केवढा उदात्त. समाजानं आपल्याला काय दिलं, यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो. “जनसेवा हीच ईश्वरसेवा” मांडणारी माझी मुलगी खरंच महान आहे. बेटा तुझ्यापुढे आज तुझा हा बाप ,जन्मदाता नतमस्तक होतोय. जा बेटा, पुढे पुढे जा. माझा मदतीचा हात सदैव तुझ्या पाठीशी राहील.”

 

आईबाबांच्या आशीर्वादाने व खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिल्याने आज मी डाॅ. शर्वरी गोखले एक. नामांकित स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ होते

 

माझ्या नेत्र पाकळ्या केव्हाच जडावल्या व मी झोपेच्या आधीन झाले. सकाळी उठल्यावर थोडे फ्रेश वाटले. रेखा आज हेमांगीला आणि तिच्या पतीराजांना  बोलावून घे. मी सविस्तरपणे हेमांगी व अविनाशला समजावून सांगितले. आणि मूल दत्तक घेणे किंवा सरोगेट मदर द्वारा प्राप्त करण्याचे मार्गही सुचवले. अविनाश उच्चशिक्षित व समंजस होता मूल दत्तक घेण्याचाच त्याने विचार केला आणि कुटुंबाला समजावून सांगण्याची जबाबदारी ही स्वीकारली.

 

“ताई ताई तुम्ही खरोखरच धन्य आहात. मदतीचा हात देणाऱ्या दाता आहात आणि रोज नवीन कुटुंबाला जन्म देणाऱ्या अनेक माता भगिनींच्या ओटीत मातृत्वाचा दान देणाऱ्या तुम्ही धन्वंतरी आहात.”

 

“मी कसली धन्वंतरी. करता करविता तो ईश्वर आहे. तो सगळ्यांची मदत करणारा सगळ्यांचा भाग्यविधाता आहे. तुम्ही सगळेच मला धन्वंतरी, मातृरुपिणी मानतात. पण स्त्री जन्मा येऊनही स्त्रीचं पूर्णत्व मातृत्व मला कधीच मिळालं नाही. अपूर्णत्व असलेली मी एक स्त्री.”

“नाही डॉक्टरताई, तुमचं दुःख तसं मोठं आहे पण स्वतःचं दुःख विसरून इतरांच्या दुःखावर मायेनं फुंकर घालणाऱ्या तुम्ही एक असामान्यचं आहात. या मानवीय दुःखावर मदतीचा हात देऊन तुम्ही त्यावर मात करतात, हे मानव जातीवर तुमचे उपकारच आहेत ताई. येते मी आणि बाळ दत्तक घेतल्यावर मिठाईचा बॉक्स घेऊन लवकरच येईल मी.”

 

माझी ओ.पी.डी. संपली होती. मी घरात आले. फ्रेश झाले. आईची सायंकाळची दिवाबत्ती नुकतीच झालेली होती. तिचे हरिपाठ स्तोत्र गुणगुणणे सुरू होते.

 

“मुंगी उडाली आकाशी,

तिने गिळले सुर्याशी.”

 

देवघरातील त्या दिव्याच्या मंद प्रकाशात आज मलाही अनोखे सौख्य लाभले होते. मनःशांती मिळाली होती. सौख्य आनंदाने भरलेला माझा तो तेज:पुंज चेहरा पाहिल्यावर आईलाही समाधान वाटले होते. तिचा आशीर्वादाचा हात माझ्या मस्तकावर होता.

———————————————

लेखिका—शैलजा करोडे ©®

नेरूळ नवी मुंबई

मो.9764808391

प्रतिक्रिया व्यक्त करा