*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हिरवाई अंथरली….*
आला श्रावण श्रावण नाही त्याचा गाजावाजा
हिरवाई अंथरली तिचे पुस्तक हो वाचा…
ढगपालख्या निघती डोंगराला अभिषेक
मित्र झाडांच्या संगती गोष्टी करती अनेक…
माड हासती डोलती वारे खेळती अंगात
वेळूच्या त्या बनामध्ये रोज पावा, वाजतात…
टपटप टपटप थेंबुल्यांचा पडे खच
जणू वाहत्या पाण्यात दिवेलागणीला नाच..
उन पडते तशात इंद्रधनू आकाशात
रंग उधळी आदित्य पश्चिमेस नकाशात…
जणू क्षितिज येतसे धरतीला भेटायाला
सांज उघडे अवचित धरा न्हाते प्रकाशात…
ऊन पावसाचा खेळ सणवार रेलचेल
झोके लागती झाडांना सया वाहतात बेल
जाती नटून थटून देवालयी पुजायला
दान दे रे दे शंकरा आयुष्याचे सखयाला…
मागणे त्या मागतात सुखी संसाराचे दान
आणि म्हणती मनात राहो माहेराची शान
आनंदात न्हाती सारे असा श्रावण महिना
दर वर्षी येतो तरी मनातून तो जाईना….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)