You are currently viewing दीप पूजन

दीप पूजन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*दीप पूजन*

 

*शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा।*

*शत्रुबुद्धी विनाशाय दीप:ज्योती नमोस्तुते।।*

प्रत्येक हिंदू कुटुंबात संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी देवाजवळ सांजवात करून

ही प्रार्थना म्हणण्याची प्रथा आहे. मुले बाहेर खेळून आली की हातपाय धुवून, देवाजवळ उभे राहायचे आणि ही प्रार्थना म्हणायची हे संस्कार मुलांना लहानपणापासून दिले जातात. दिवा म्हणजे अंधाराचा नाश करून

प्रकाशाची वाट दाखवणारा. जसा दीपप्रज्वलनाने बाहेरच्या अंधाराचा नाश होतो, त्याचप्रमाणे मनात येणाऱ्या कुविचारांच्या अंधाराचाही,” हे दीपा तू विनाश कर” यासाठीची ही प्रार्थना.

हिंदू पंचांगानुसार पाहिले जाता प्रत्येकच महिन्यात काहीतरी सण साजरा होत असतो. त्याचप्रमाणे तो सण साजरा करण्याचे महत्व

पौराणिक कथांद्वारे आपल्याला सांगितले जाते.

दीपपूजनाच्याही अशाच काही कथा जुन्या ग्रंथातून सापडतात.त्यापैकी ही एक कथा…

एका नगरा मधील राजा शिकार करून परत येत असता त्याने एक चमत्कार पाहिला. एका झाडावर अनेक वेगवेगळे दिवे एकत्र बसले होते

आणि ते त्यांच्या बसण्याचे कारण परस्परांना सांगत होते. त्यातील एक मुख्य दिवा म्हणाला,

” माझ्या राजाच्या सुनेने एक दिवस घरातील काहीतरी पदार्थ खाल्ला आणि त्याचा आळ उंदरावर घेतला. उंदीर चिडला व त्याने तिचा सूड घ्यायचे ठरवले. त्यांच्या घरात काही पाहुणे मंडळी आली असता उंदराने काय केले, त्या सुनेची चोळी पळवली आणि पाहुण्यांच्या अंथरुणात आणून टाकली. सकाळी हा प्रकार पाहून तिची सासू दीर वगैरे घरातील सर्व मंडळी चिडली,

आणि त्यांनी सुनेला हाकलून दिले. सून अतिशय देवभोळी होती, ती नित्यनेमाने पूजा करून देवाजवळ दिवे लावत असे. आता ती

नसल्यामुळे कोणीच दिवा लावत नाही, आणि मी या झाडावर येऊन बसलो आहे.”

तो दिवस आषाढ महिन्यातील अमावस्येचा होता. राजाने ही कथा ऐकल्यानंतर, त्याच्या सुनेचा काहीच दोष नाही, म्हणून तिचा शोध

घेऊन तिला घरी आणले. पुन्हा घरात दिवे लागले, घर उजळून निघाले, अंधाराचा नाश झाला.

तेव्हापासून दरवर्षी आषाढ अमावस्येला दीप पूजन करून दुसऱ्या दिवशीपासून सुरु होणाऱ्या

श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. या अमावस्येला दिव्यांची अमावस्या असे म्हणतात.गटारी अमावस्या असेही या दिवसाचे दुसरे नामाभिधान आहे. याचे कारण म्हणजे, सामिष अथवा तामस अन्न सेवन करणारे लोक श्रावण महिन्यात फक्त निरामिषच अन्न सेवन करतात. पुढचा संपूर्ण महिना ते मांस,मच्छी किंवा दारू घेऊ शकणार नाहीत म्हणून या अमावस्येच्या दिवशी भरपूर दारू पितात. पुढचे न लिहिणे बरे!

सकाळी घरातील स्त्रिया समई,निरांजन लामणदिवा वगैरे घरातील सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून चकचकीत करतात आणि घरातील देवाजवळ

एका चौरंगावर किंवा पाटावर लाल वस्त्र पसरून

सर्व दिव्यांची स्थापना करतात. पाटाखाली व पाटा सभोवती रांगोळी घालतात व तो परिसर सुशोभित करतात. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी सर्व दिव्यांना हळद,कुंकू,अक्षता व पिवळी फुले वाहून मनोभावे नमस्कार करतात. घरातील सर्व इडा पिडा टळोत,कुलक्षणांचा नाश होऊन सर्वत्र आनंदाचा प्रकाश उजळो अशी प्रार्थना करतात. आपल्या हिंदू संस्कृतीत तेलाचा किंवा तुपाचा दिवा हे मांगल्याचे प्रतीक आहे.दूध- साखर किंवा काहीतरी गोडाचा नैवैद्य दाखवतात.

घरातील सर्व मंडळी एकत्र बसून गोडाधोडाचे भोजन मोठ्या आनंदाने करतात. घरातील कर्ते सदस्य कामानिमित्त बाहेर असतात,मुले अभ्यासात व्यग्र असतात,थोडक्यात आजकाल जो तो आपापल्या व्यवसायात व्यस्त असतो. या अशा सणासुदीच्या निमित्ताने केलेले सहभोजन हे फार आनंददायी तसेच श्रमपरिहारक असते.

या दृष्टीने विचार करता या अशा छोट्या मोठ्या सणांचे आपल्या आयुष्यात फार महत्व आहे असे मला नेहमी वाटते.

आपल्या संस्कृतीत दानाचे महत्त्व फार आहे. गरजवंताला अन्नदानप,वस्त्रदान नेहमी करावे,विद्यार्थ्यांना विद्यादान करावे ही शिकवण

लहानपणापासूनच आपल्याला मिळत गेली आहे.या दिवेअमावस्येच्या दिवशी सुद्धा दीपदान करण्याची पद्धत आहे. माझ्या घरी दिव्याचा प्रकाश पडत आहे तसाच प्रकाश माझ्या गरीब बांधवांकडेही पडो हीच भावना त्यात असली पाहिजे.

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

प्रतिक्रिया व्यक्त करा