You are currently viewing वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुण्यातील अट्टल दरोडेखोर जेरबंद

वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुण्यातील अट्टल दरोडेखोर जेरबंद

*हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई, प्रवीण सापळे, आबा पिळणकर, अमोल धुरी,प्रशांत धुमाळे,दीपक शिंदे, अभिजीत कांबळे यांची कौतुकास्पद कामगिरी*

*प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवावर उदार; सिंधुदुर्ग वाहतूक पोलिसांचे कौतुक*

 

सावंतवाडी :

पुणे येथील लक्ष्मी ज्वेलर्स वर दरोडा टाकून पसार झालेल्या तिघा दरोडेखोरांना सिंधुदुर्गातील ट्राफिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे जेरबंद करण्यात यश आले. हेडकॉन्स्टेबल दत्ता देसाई, प्रवीण सापळे, आबा पिळणकर, दीपक शिंदे, अभिजीत कांबळे यांनी प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवावर उदार होतं कारसह दरोडेखोरांना पकडले.

सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस केवळ वाहन चालकांवरच दंडात्मक कारवाई करत नाही तर, संशयास्पदरीत्या प्रवास करणाऱ्या वाहन चालकांवरही त्यांची करडी नजर असते. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नाकाबंदीचे आदेश मिळाल्यावर तत्काळ सतर्कता बाळगून सिंधुदुर्ग वाहतूक पोलिसांनी आंबोली येथे शस्त्रधारी दरोडेखोरांना स्वतःचा जीव धोक्यात घालत जेरबंद केले. दरोडेखोरांजवळ दोन पिस्तूल होती. प्रसंगवधान राखत हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई, प्रवीण सापळे, आबा पिळणकर, अमोल धुरी, प्रशांत धुमाळे,दीपक शिंदे, अभिजीत कांबळे यांनी आंबोलीत दरोडेखोरांकडून दोन पिस्तुलांसह जिवंत काडतुसे हस्तगत केली.

पुणे हिंजवडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स वर दरोडा टाकून तिघे दरोडेखोर गोव्याच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. पाच चोरट्यानी भर दिवसा लक्ष्मी चौकातील सराफी दुकानावर दरोडा टाकला होता. मालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करत मिळतील ते दागिने घेऊन त्यांनी पोबारा केला होता.

आंबोली पोलीस तपासणी नाक्यावर त्यांची कार तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी केला. यावेळी दरोडेखोरांनी वाहतूक पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.

अल्ताफ बाबू खान, गोविंद भवरालाल दिवानी, रातुराम कृष्णराम बिश्नोई अशी त्यांची नावे आहेत. झाडाझडतीत दोन बंदुकांसह जिवंत काडतुसे, सोन्या चांदीचे दागिने पोलिसांना सापडले. अधिक तपास सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वाहतूक पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा