*भाजपा अधिवेशनात ना. रवींद्र चव्हाण यांनी फुंकले रणशिंग..*
*माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे केले कौतुक*
*जिथे भाजपाची सत्ता तिथे विकास*
*राजन गिरप यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात वेंगुर्ले शहराचाही चेहरा मोहरा बदलला*
सावंतवाडी :
सिंधुदुर्ग भाजपाच्या विस्तारित कार्यकारिणीच्या अधिवेशनात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचे कौतुक केले. सत्ता नसतानाही नगराध्यक्ष पदाच्या काळात संजू परब यांनी बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावाने असलेले नाट्यगृह अद्ययावत केले. भाजपाची सत्ता आल्यानंतर राजन गिरप यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात वेंगुर्ले शहराचाही चेहरा मोहरा बदलला. पर्यटन शहर म्हणून वेंगुर्लेची नवी ओळख निर्माण झाली. यावेळी नामदार रवींद्र चव्हाण यांनी वेंगुर्ले चे माजी नगराध्यक्ष राजन गिरप यांचेही कौतुक केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सावंतवाडी शहरातील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात भाजपाच्या सिंधुदुर्ग विस्तारित कार्यकरणीचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. रत्नागिरी येथील अधिवेशनाला संबोधित केल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनीही सावंतवाडीत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार डॉ. निलेश राणे, सिंधुदुर्ग भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, माजी आमदार प्रमोद जठार, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, लखम राजे भोसले, महेश सारंग, रणजीत देसाई,जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या अधिवेशनात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपाच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुक महायुतीच लढणार आहे यावर शिक्कामोर्तब केले. महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे काम करायला हवं, विजयाचा शिल्पकार हा तळागाळातील कार्यकर्ता असतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेले यश हे तळागाळातील भाजपाच्या कार्यकर्त्यामुळे मिळाले आहे. यावेळी ना. रवींद्र चव्हाण यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचे ही कौतुक केले.