You are currently viewing व्यक्तित्व विकास

व्यक्तित्व विकास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा अध्यक्ष लेखक कवी श्री.पांडुरंग कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*व्यक्तित्व विकास*

 

आपण अगदी पहिल्यांदा, सुरुवातीलाच व्यक्त म्हणजे काय, व्यक्ती म्हणजे काय आणि मग व्यक्तित्व विकास म्हणजे काय हे पाहू यात.

अदृश्य, गूढ, अचिंतनीय असे अव्यक्त तत्व आहे. ते परमात्मा तत्व आहे. अश्या अव्यक्त परमात्मा तत्वाचे दृश्य, चिंतनीय, समजण्यासारखे रूप म्हणजे व्यक्त तत्व. हे ज्या माध्यमातून होते ते माध्यम म्हणजे व्यक्ती. व्यक्तीकडून हे अपेक्षित आहे की त्या अव्यक्त परमात्मा रुपास व्यक्त रूपात पाहणे. जो व्यक्त होतो तोच व्यक्ती. प्रभावीपणे व्यक्त होवून इच्छित परिणाम मिळतो, तेंव्हा ते व्यक्तित्व. हे व्यक्तित्व जेंव्हा विश्वाच्या कल्याणासाठी वापरले जाते, कार्य करते तेंव्हा ते विकसित व्यक्तित्व किंवा हा खरा व्यक्तित्व विकास असे आपणास म्हणता येईल.

केवळ व्यावहारिक, योग्यप्रकारे, काटेकोरपणे नियमांचे पालन करून वागणे म्हणजे व्यक्तित्व विकास असू शकत नाही. केवळ बाहेरून चांगले दिसणे, असणे, वागणे, किंवा चांगली अस्खलित भाषा बोलणे, एटीकेट्स, न्यानर्स पाळणे, यामुळेही पूर्ण व्यक्तित्व विकास होत नाही. शरीराच्या जडण घडणी बरोबरच मनाला स्थिरता आणि बुध्दीला विवेक देणारे विचार आपले व्यक्तिमत्व खुलवतात. मन ही एक अजब वस्तू आहे. ते चंचल आहे. ते दिसत नसले तरी विश्वव्यापक आहे. साऱ्या अलौकिक शक्ती माणसाच्या मनातच असतात. सूक्ष्म आणि स्थूल यांच्यातील दुवा असणारे मन हे अकरावे इंद्रिय आहे. सूक्ष्मा कडून स्थुलाकडे आणि स्थूलाकडून सूक्ष्माकडे मनाचा प्रवास सतत चालू असतो. बुद्धीला इनपुट देणे आणि बुद्धीने दिलेले आउटपुट इंद्रियच्या मार्फत त्यांच्या माध्यमातून वापरणे हे मनाचे मुख्य कार्य. या मूळ मनाच्या ठिकाणी वसणाऱ्या सूक्ष्म शक्तीचे तिथेच मनाच्या ठिकाणी जर आपण नियंत्रण करू शकलो तर पुढील कितीतरी प्रकारची अपयशे आपण टाळू शकतो आणि यशाची शिखरे पदार्क्रांत करू शकतो. या मनोविकासाची संपूर्ण प्रक्रिया आपल्या सर्वच संतांनी आणि विचारवंतांनी अत्यंत उघडपणे व स्पष्ट रीतीने आपल्या वाड:मयातून मांडली आहे. त्यासाठी त्याचे वाचन, मनन,चिंतन करीत राहणे हा पहिला टप्पा आणि ते आपल्या वर्तनात उतरविणे हा दुसरा टप्पा. पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध महत्वाचा आहे. पण पूर्वार्ध पार केल्यावरच उत्तरार्ध मिळणार आहे. पूर्वार्ध हे साधन किंवा साधना आहे तर उत्तरार्ध हे साध्य आहे. याची पूर्ण जाणीव असली की नेणीवेकडे जाण्याचा म्हणजेच आत्मशोध घेण्याचा मार्ग सुकर होतो. आत्मशोध घेण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे. वैज्ञानिक सौंक्रेटीसनेसुद्धा Know Thyself असे सांगितले आहे. व्यक्तित्व विकास साधण्यासाठी याची नितांत आवश्यकता आहे. मी कोण आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. नंतर भगवंत कोण आहे हे जाणून घ्यायचे आहे आणि नंतर माझा आणि परमेश्वराचा संबंध कसा दृढ होईल यासाठी प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. यालाच योग म्हणतात. युज म्हणजे जोडणे. माणसाचे परमेश्वराशी जोडणे म्हणजे योग.

देव दगडात शोधणारी आपण माणसं. माणसातला देव पाहायला मात्र का बरे विसरतो? माणसातील देव पहायला शिकला की अखंड आयुष्य साक्षात्कार होऊन जातं. रोज कोणी ना कोणीतरी आपल्याला मदत करत असते. ती मदत टाळू नये. तो देवमाणसाचा प्रसाद म्हणून स्वीकारावा. असाच प्रसाद आपणही देवामाणूस बनून इतरांना द्यावा. असे केले तर आपला प्रवास माणूस, देवमाणूस, देव अश्या स्तरानी वाढत जाऊ शकतो.

प्रवीण दवणे सरांचा याबाबताचा आशय इथे आवश्य नमूद करावासा वाटतो तो असा….

दुसऱ्याचे घर छोटे लेखून आपले घर मोठे होत नाही. जगातील ८० टक्के माणसं आयुष्याला शर्यत करून सोडतात. दिशा, ध्येय, स्वप्न सर्व काही दुय्यम ठरते. मी इतरांच्या पुढे आहे एवढच पुरेसे होते. तर मग पोहोचायचे तरी कुठे असते?

हातात पडलेले पत्ते बदलता येत नसले तरी डाव कसा खेळायचा हे ठरवता येते. कितीही संकटे आली तरी तुम्ही ठाम राहिलात तर उद्या तुम्हाला चांगले दिवस येतील हे नक्की.

कोणत्याही कारणाने तुमच्या कामात खंड पडू देऊ नये. समस्येजवळ हतबल होऊन थांबण्यापेक्षा पुढे चालत राहणं महत्त्वाचं. काही वेळेला वाटतं की, काय चुकले की काय, पण नाही जिद्दीनं चालणार त्याची वाटही सोबत करत असते. योग्य वाटेकडे तीच घेऊन जाते. तिथे सुधारते नव्या आशेचं, नव्या ध्यासाचं, हे जिवाचं आकाश.

आगरकर म्हणतात की, या विश्वामधील अंतिम सत्य मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडे आहे म्हणून मनुष्याने आपल्या ज्ञानेंद्रियांची सध्याची मर्यादा लक्षात घेऊन ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल किंवा ना अस्तित्वाबद्दल काथ्याकोट करत बसणे निरर्थक आणि व्यर्थ आहे आणि त्यामुळे गोंधळ उडतो मनाचा आणि मग मानसिक अस्वस्थतेचे मूळ तिथे रुजले जाते आणि व्यक्तीविकास थांबतो.

कितीही मिळवलं, मिळालं तरी आपल्याला अजून काहीतरी पाहिजे असतं. आपल्या गरजा आपल्या अपेक्षा, वासना कितीही पुरवल्या तरी त्या संपतच नाहीत. आपण थांबायला तयारच नाही. पुढे समाधान झालं, मन भरलं, तृप्ती आली असं म्हणायला तयार नाही. आपलं असणं जगणं बघणं अनुभवन हे असं कोणाकडे तरी गहाण टाकून किती काळ निभेल बरं?

चंगळवादाचं फुलपाखरू दूर उडणारे चिमटीत येतच नाही. मग त्याच्या विरहाची का तमा बाळगायची? आणि हे करताना मनाचा विचारच होत नाही आणि मग त्याच्या गतीत अडथळा येतो आणि मानसिक आजार जडतो. त्याचा व्यक्तींत्वावर विपरीत परिणाम होतो.

स्वतः ला जाणून घेवून आपल्यातले दोष कमी करणे आणि आपल्यातल्या गुणांचे वर्धन व जोपासना करणे म्हणजे व्यक्तित्व विकास होय. त्यासाठी आपल्या अंतर्मनाशी सहज संवाद साधता आला पाहिजे. त्यातूनच चिंतन घडून आपल्या व्यक्तित्व विकासाच्या प्रगतीचा मार्ग प्रकाशमान होतो. याचे काही टप्पे आपणास खालीलप्रमाणे तपासता येतील.

१. आपल्या व्यक्तिमत्वात बदल होत आहे हे आपणास जाणवू लागते.

२. आपण आपणास ओळखू लागतो.

३. आपल्यातील गुण व दोष हेरू शकतो.

४. दोष कमी करणे आणि गुणाची वृध्दी व संगोपन करावेसे वाटते.

५. आपण इतराशी सहज संवाद करू शकतो, तो प्रभावी असतो आणि तो इतरांना हवाहवासा वाटतो हे आपल्या लक्षात येते.

६. हळू हळू आपण लोकांना प्रेरणा देवू शकतो किंव्हा आपल्यापासून लोक प्रेरणा घेत आहेत हे आपल्या लक्ष्यात यायला लागते.

७. इतरांनी यश मिळविले, पराक्रम गाजवला तर आपणाला मनापासून त्याचे कौतुक करावेसे वाटते आणि तसे आपण करतो.

८. आपण दुसऱ्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेवू शकतो.

९. आपल्या वाणीमध्ये मार्दवता येत असल्याचे आपणास जाणवते.

१०. बदलत्या परिस्थितीशी, वातावरणाशी आपण सकारात्मक पद्धतीने सहज गत्या जुळवून घेवू शकतो.

११. अंतर्मुख होवून विचार करू शकतो, आपणच आपले परीक्षक,निरीक्षक, समीक्षक बनू शकतो आहोत याची जाणीव व्हायला लागते.

१३. शड्रिपुवर आपण हळू हळू विजय मिळविण्यात यशस्वी होत असल्याची चाहूल लागते.

तर आपण करू यात का असा प्रयत्न, स्वांत सुखाय!

 

*पांडुरंग कुलकर्णी नाशिक*

प्रतिक्रिया व्यक्त करा