मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा – मालवण तहसील वर्षा झालटे यांचे आवाहन
मालवण
महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्ष व त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राज्य शासनाने जाहिर केली आहे. मालवण तहसीलदार कार्यालयात या योजनेची माहिती देत आवश्यक कागदपत्रे, दाखले उपलब्ध करणे यासाठी अर्ज भराणा करून घेत जेष्ठ नागरिकांना माहिती देण्यात आले.
यावेळी मालवण तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले यांसह अधिकारी कर्मचारी तसेच यावेळी तालुक्यातील मालवण, कोळंब, हडी, आचरा या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले. अनेक धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रे आपल्या महाराष्ट्रात आहेत. प्रत्येकालाच अशा तीर्थक्षेत्रांना, मंदिरांना भेट देण्याची इच्छा प्रत्येक व्यक्तीची असते, परंतु सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांची त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे इच्छा बऱ्याच वेळा अर्धवट राहते , त्यामुळेच अशा ज्येष्ठ नागरिकांना विविध धार्मिक स्थळांना भेट देता यावी आणि मनशांती मिळून जीवन सुखकर व्हावे, यासाठीच मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू होणार आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकांना अधिक माहिती मिळावी यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या योजनेबाबतचा जी आर या सभेमध्ये वाचण्यात आला. योजनेचे पात्र, अपात्र याबाबत माहिती तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, प्रवास प्रक्रिया इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींबद्दल माहिती देण्यात आली.