*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जन्मदिन*
आज २/८/२०२४ चे पाहता दिनमान
कळले झाले माझे (अवघे) पाऊणशे वयोमान ||
गतकाळात डोकावण्या एक छानसा झरोखा
घेतला बालपणापासूनचा लेखा-जोखा
सारा-सारा प्रकारच वाटला अनोखा
होऊनिया सावधान जरा द्यावे अवधान ||
ज्या दिवशी श्रावणात पूरणपोळीचा घाट
त्या दिवशी मज वाढदिवसाचा मिळे पाट
तिथी-तारखेशी नघडे संधान,परि न वर्णवे थाट
मोठ्यांचा आशीश मिळे ‘होऽ आयुष्मान’ ||
पुढे-पुढे कौतुकास लागले वेगळे वळण
सोबत्यांच्या शुभेच्छा-भेटवस्तुंचे आकर्षण
जोडीदारास होऊ दिले ना कधी विस्मरण
आयुष्यात जाणले योगायोगाचे महिमान ||
माझे मित्र-मैत्रिणी,विद्यार्थी,व्हाट्स अॅपसमूह किती
बाई-बाई अंगिकारल्या नवयुगात नव्या रिती
प्रत्यक्ष भेटले नाही तर पाठवा चित्रफिती
आयुष्य गतिमान,देवा!सार्थ करी मम अभिधान ||
विजया केळकर________
नागपूर ( हैद्राबाद )