You are currently viewing कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना भाजपा उघड्यावर पडू देणार नाही

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना भाजपा उघड्यावर पडू देणार नाही

विशाल परब यांचा जखमी वीज कर्मचाऱ्यांना उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात

 

वेंगुर्ले :

जनतेच्या घरातला अंधार दूर व्हावा, यासाठी कंत्राटी वीज कर्मचारी वाऱ्यापावसाची पर्वा न करता धाव घेत असतात. अशावेळी झालेल्या अपघातात त्यांना योग्य ते सहकार्य विद्युत विभागाकडून होत नाही. मात्र, काहीही असले तरी यासाठी धडपडणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांच्या संकटात त्यांच्या व कुटुंबीयांच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी समाज म्हणून आपण सर्वांनी पुढे सरसावत घ्यायला हवी, असे मत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी व्यक्त केले आहे.

दोन दिवसांपूर्वी वेंगुर्ले महावितरण उपविभाग मधील कंत्राटी कर्मचारी असलेले संदेश सत्यवान शिरोडकर आणि बाळा शंभा गावडे हे कर्मचारी विद्युत पुरवठा करण्यासाठी आपल्या दुचाकीवरून जात असताना रुग्णवाहिकेची धडक बसून अपघात झाला. त्यात बाळा गावडे हे कर्मचारी तत्काळ मृत झाले तर गंभीररित्या जखमी झालेल्या संदेश शिरोडकर यांना पुढील उपचारासाठी बांबूळी गोवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. संदेश शिरोडकर यांची घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांना या घटनेबद्दल कळताच त्यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांच्या घरी भेट दिली आणि त्याच्या नातेवाईकांना धीर दिला. जखमी रुग्णाच्या उपचारासाठी तातडीची गरज असलेली आर्थिक मदत देऊ केली आहे. सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या या दोन्ही कंत्राटी वीज कर्मचाऱ्याची घरची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने समाज म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या संकटकाळात पाठीशी राहून त्यांना धीर देऊया, असे आवाहन विशाल परब यांनी केले आहे. या वेळी उपस्थित वेंगुर्ला मंडल अध्यक्ष सुहास गवडळकर, मनवेल फर्नांडिस, सायमन अल्मेडा, युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर, राजबा सावंत (उपसरपंच) होडवडे, भाजपा गाव अध्यक्ष मनोहर नाईक, तालुका कार्यकारणी सदस्य प्रसाद परब, ग्रामपंचायत सदस्य संदीप सातार्डेकर, बाल्या पावणोजी, श्रेयस परब उपस्थित होते.

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे त्यांच्या संघटनेचे प्रमुख आणि भाजपाचे जेष्ठ नेते अशोक सावंत यांच्याशी चर्चा करून या दोन्ही कर्मचाऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देण्याच्या प्रश्नी योग्य तोडगा काढण्यात येईल असेही श्री विशाल परब यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा