You are currently viewing हे थांबवा

हे थांबवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम रचना*

 

*हे थांबवा*

*मातृभू अवयव विकृत करणे*

 

लोभी शेतकऱ्याला मिळाली कोंबडी

कोंबडी अहो सोन्याची अंडी देणारी |

देणारी रोज एक ते अंडे सुवर्ण

सुवर्ण मोही एके दिनी ती कापली ||१||

कापली अन् अति मोही माती झाली

झाली माती गेले मोती शिल्लक भीक |

भीक जित्याची किंमत मेल्यावर का

मेल्यावर का धन कुणा हवे आहे ||२||

हवे आहे देह दान मरणोत्तर

मरणोत्तर मानवतेच्या उद्धारा |

उद्धारा रुग्णाशी अवयव रोपण

रोपण गरज काळाची नसे स्वार्थी ||३||

स्वार्थी किती झालो आपण आंधळेच

आंधळेच मोहाने का विकृत झालो |

झालो जरी विकृत माता विसरावी

विसरावी इतके लचके तोडावे ||४||

तोडावे जिच्या अंगावर हा संसार

संसार संसार प्रेतांचाच संसर्ग |

संसर्ग होता बुद्धी मरुन पडली

पडली ती पडली बुद्धिमंतांचीच ||५||

बुद्धीमंतांचीच बुद्धि हरवली हो

हरवली हो झोपलेल्यांची आधीच |

आधीच जळी स्थळीच काष्ठी पाषाणी

पाषाणी नाही, नाही आणि कशातच ||६||

कशातच नाही स्थान परत तुला

तुला धरणीशिवाय आधार नाही |

नाही ग्रह परग्रहाते मान तुला

तुला सावध रहायलाच हवं रे ||७||

हवं ते विज्ञान तज्ज्ञांचे गेले कुठे

गेले कुठे अध्यात्मिंचे थोर अध्यात्म |

अध्यात्म का झिरपून गळून गेले

गेले का ते खनीज उत्खननासाठी ||८||

उत्खननासाठी सरकार आहेच

आहेच लोभी जन सलग्न त्यासवे |

त्यासवे ते सद्ज्ञान गळतीस आले

आले लयास गेले धन स्वार्थासवे ||९||

स्वार्थासवे दान लोप घालवू नका

नका भुकवचाला भेदून भयाण |

भयाण होईल ज्वाला उद्रेक कधी

कधी प्रदूषण होऊन होऊ नष्ट ||१०||

नष्ट कारे एक एक व्हारे अनेक

अनेक जेथे एक कोण कार्या धोका |

धोका आहे सरकारमुळे म्हणता

म्हणता की आहे मृत जाणीवेमुळे ||११||

जाणीवेमुळे सामर्थ्य लौकिक आहे

आहे सरकार आपल्यामुळे तरी |

तरी सत्यासाठी देशासाठी बदला

बदला घेतो कुणी दुष्ट देशद्रोही ||१२||

देशद्रोही वसुंधरा तुडवी स्वार्थी

स्वार्थी क्रौर्य मातृभूमीचे तनधन |

तनधन अवयव लुटण्या अरे

अरे अरे ती मेली का सधन माय ||१३||

माय लक्तरे चिरुन कोणी काय हे

काय हे साधता अमानवी अमानुष |

अमानुष अवयव चोरी करिती

करिती त्या क्रूर मानवी वैद्यासम ||१४||

वैद्यासम याचसाठी आपणा हवे

हवे अज्ञानी स्वजन भूमी लुटण्या |

लुटण्या पुढे ते सुराज्य निर्मिणार ?

निर्मिणार ? अहा कसले दुर्दैवीच ||१५||

दुर्दैवीच आपणही का व्हावे असे

असे नंदनवन भकास होऊन |

होऊन गेल्या चुकाच सोडून आता

आता चुका सोडा स्वरुप ज्ञानात या ||१६||

ज्ञानात या प्रश्न विचारा स्वतःलाच

स्वतःलाच प्रत्येकाने आधी सुधारा |

सुधारा सावध व्हा सुखी जीवनाते

जीवनाते भूमी वाचवू अन्नासाठी ||१७||

अन्नासाठी रोजगारासाठी मातीच

मातीच जीवनासाठी आधार आहे |

आहे मातीच अंतासाठी एकरुप

एकरुपाने मायभू सौंदर्य राखू ||१८||

राखू खनीजाहून अमूल्य ठेवा हा

ठेवा हा मातृभूमी गाव गाव आहे |

आहे मातृभूमी देश सौख्य गावच

गावच शहर सौख्य या देशाचेही ||१९||

 

पृथ्वी पोटची खनीजे हीच पृथ्वीच्या जीवसृष्टीचे कारण आहेत. जल हे (एच टू ओ)असले तरी अनंत रसायनापासून निर्माण होणारे एक सर्वश्रेष्ठ रसायन आहे म्हणूनच ते सर्वोत्तम द्रावक आहे. अशा या वसुंधरेच्या पोटातील खनीजे ही जीव सृष्टीचे कारण आहेत. पृथ्वीपोटी ज्वालारुपी रस आहे जो ज्वालारस लाव्हा म्हणून ओळखला जातो. आपल्या त्वचेवर एक साधा चिमटा घेतला तर किती वेदना होतात नाही? पृथ्वी जीवंत आहे म्हणून आपण जीवंत आहोत. अन्यथा जीव सृष्टी कधीच नष्ट झाली असती. हेच सत्य आहे.

पृथ्वीवरचे असे जीवंत वातावरण दुर्लभ आहे तरी आपण बेजबाबदार असे कसे होऊ शकतो याचीच कीव येते.

सांगा कसे जगायचे पृथ्वीवरच्या जगात की शोध न लागलेल्या काल्पनिक जगात?

धोक्याच्या काल्पनिक भवितव्यात की सुखाच्या पृथ्वी स्वर्गात?

पृथ्वी सांभाळा, वाचवा. नैसर्गिक सृष्टी वाचवा स्वतःला वाचवा, मानवी सृष्टी वाचवा.

SAVE EARTH SAVE NATURE. SAVE YOURSELF.

धन्यवाद

शुभम् भवतु |

🪷🙏🏻🪷

 

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता.- वेंगुर्ला,

जि. – सिंधुदुर्ग, राज्य :- महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा