You are currently viewing चातुर्मास

चातुर्मास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*चातुर्मास*

 

*परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध* हे चातुर्मासाचे मूलतत्त्व अथवा वैशिष्ट्य आहे.

 

हिंदू धर्मात चातुर्मास या कालावधीला पारंपरिक महत्त्व फार आहे. चातुर्मास म्हणजे नक्की काय? या काळात काय करावे आणि काय करू नये याविषयीचेही परंपरागत नियम आहेत . चातुर्मास हा चार महिन्यांचा कालावधी आहे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत हा कालावधी असतो. यंदा म्हणजेच २०२४ सालचा चतुर्मास १७ जुलैपासून म्हणजेच आषाढी एकादशी पासून ते १२ नोव्हेंबर २०२४— कार्तिकी एकादशी पर्यंत आहे. साधारणपणे ११८दिवसांचा हा काळ आहे. या कालावधीभोवती पौराणिक कथा आहेत. असे मानले जाते की या चार महिन्यांच्या काळात भगवान विष्णू निद्रासनात जातात. ते या काळात, संपूर्ण विश्वाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भगवान शंकराकडे सोपवतात. थोडक्यात चातुर्मास हा भगवान विष्णूचा निद्राकाळ आहे आणि शिवाच्या पूजनाचाही काळ आहे.

 

याविषयीची परंपरा सांगते की या काळात सकाळी लवकर उठून सूर्यदेवाची पूजा करावी, सात्विक अन्नाचे सेवन करावे. जास्तीत जास्त दान करावे. दही, लोणचे, हिरव्या भाज्या, मुळा वगैरे खाणे टाळावे. तसेच या काळात विवाह, मुंजी, गृहस्थापनासारखी शुभ कार्ये टाळावीत. हा धर्मशास्त्रीय संकेत आहे.

 

अशी समजूत आहे की देवशयनी (आषाढ एकादशी) ते प्रबोधिनी (कार्तिक एकादशी) या देवांच्या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देतात म्हणून त्यांच्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते. सामान्यपणे लोक चातुर्मासात एखादे तरी व्रत करतातच जसे की *पर्णभोजन*( पानावर जेवण करणे ) *एक भोजन* *अयाचित* ( म्हणजे न मागता मिळेल तेवढे) *एकवाढी* ( एकदाच वाढून घेतलेले), *मिश्र भोजन* ( काला करून ) धरणे— पारणे (एक दिवस भोजन एक दिवस उपास) अशा प्रकारची काही ठळक व्रते चातुर्मासात केली जातात. थोडक्यात हा झाला चातुर्मासाविषयीचा काय करावे, काय करू नये, वर्ज्य, अवर्ज्य याविषयीचा परंपरागत विचार पण या पलीकडे जाऊन या धर्मसंकल्पनांच्या गाभ्यातून उलगडणार्‍या वैज्ञानिकतेचा, भौगोलिकतेचा, ऋतुमानाचा, नैसर्गिक वातावरणाचा, शास्त्रोक्त दृष्टीने विचार करून चातुर्मास हा कालावधी समजून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नवा विचार रुजवणे. केवळ धर्मशास्त्र सांगते म्हणून किंवा पापभीरू मानसिकतेतून व्रतवैकल्ये करणे या अंधश्रद्धायुक्त वृत्तीतून बाहेर येऊन, डोळसपणे या चातुर्मासाला नवा आयाम दिला तर त्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होईल.

 

हा संपूर्ण चार महिन्याचा कालावधी म्हणजे श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक. यात सुरुवातीला आषाढाचे काही दिवस आणि शेवटी कार्तिक महिन्यातले काही दिवस येतात. पावसाळ्याचा हा काळ. यावेळी धरणीचे रूप पालटलेले असते. स्थलांतर अशक्य असते. अशावेळी कुटुंबात होणारी शुभकार्ये म्हणजे उपस्थित राहण्यासाठी इच्छुक असणाऱ्या गणगोतांसाठी ही यातायातीची, कठीण किंवा अशक्य बाब होऊ शकते मग या संपूर्ण काळात अशी शुभकार्ये न केलेलीच बरी नाही का? किंबहुना संभाव्य धोके टाळण्यासाठी ती करूच नये म्हणून भगवान विष्णुच्या योगनिद्रेचे कारण पूर्वजांना द्यावे लागले असेल. शिवाय मंगलकार्याच्या निमित्ताने होणारा रजतमयुक्त आहारही धोकादायक. या संपूर्ण विचारामागे *देव* आणि *असुर* या रुपकात्मक कल्पना आहेत आणि या कल्पनांचा आधार म्हणजेच परंपरा.

 

याच काळात मानवाचे ऋतुबदलामुळे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशावेळी कंद, वांगी, मुळे, तंतुयुक्त पदार्थ पचनसंस्थेसाठी योग्य ठरत नाहीत म्हणून धर्मशास्त्रात या वातवर्धक, पित्तवर्धक,कफवर्धक पदार्थांना चातुर्मासात वर्ज्य ठरवण्यात त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन दडलेला आहे. रजतमयुक्त आणि सत्वगुण प्रधान पदार्थांची एक शास्त्रीय यादी देऊन, वैज्ञानिकता जाणून परंपरेचे महत्त्व धर्मशास्त्रात सांगितले आहे आणि त्याचा अभ्यासपूर्ण विचार करणे म्हणजेच परंपरेला नव्या अर्थाने स्वीकारणे.

 

या काळात शरीरातील अग्नी मंदावलेला असतो. चेतनाशक्ती, वीर्य शक्ती इतर ऋतूंच्या मानाने कमी झालेली असते आणि जीवन जगताना याचे भान ठेवणे गरजेचे आहे आणि हेच लक्षात आणून देण्यासाठी चतुर्मासातील व्रतवैकल्यांचा आधार घेतला जातो.

*एक वेळ जेवणाने* ताकद आणि ओज यांची वृद्धी होते. *मौन धारणेमुळे* शक्तिर्‍हास रोधला जातो कारण बोलण्यातून बरीच ऊर्जा खर्च होत असते.

*दीपध्यान* म्हणजे प्रकाशाचे, तेजाचे अग्नीचे मंगलदायी पूजन. शरीराला ताजेतवाने करण्याचे ते एक माध्यम असते.

 

खरं म्हणजे आपली सर्वच धार्मिक व्रते ही निसर्गाशी जवळीक साधतात. चातुर्मासात पिंपळ, तुळस या वनस्पतींची पूजा, सेवा तसेच त्यांच्याभोवती प्रदक्षिणा घालण्यात येते कारण या सर्वच वनस्पती औषधी, जंतुनाशक आहेत. त्यांच्या संपर्कानेही आरोग्याचे रक्षण होते.

 

चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्याचे आपल्या परंपरेत फार महत्त्व आहे. श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना पण त्याचा मूलभूत संबंध निसर्गाशी जुळलेला आहे.. पर्जन्यधारांनी वसुंधरा पूर्णतया नटलेली असते. फुलं, पत्री, फळे यांची रेलचेल असते. हरतालिकेच्या निमित्ताने वेगवेगळ्या २१ पत्रींचे पूजन होते. नागपंचमी, ललित पंचमीच्या निमित्ताने हातावर मेंदी रेखली जाते. दुर्वा खुडणे, दुर्वांच्या संपर्कात राहणे हे सारेच पित्तशामक,आरोग्यवर्धी असते. अशाप्रकारे चातुर्मासाचा पाप पुण्याशी, संस्कृतीशी, देवाधर्माशी संबंध जोडलेला आहे असे वरवर वाटत असले तरी त्यामागे ऋतुबदलाप्रमाणे मनुष्याच्या आरोग्याची, निसर्ग संवर्धनाची काळजी घेणे हा मुख्य हेतू आहे. चातुर्मासातील व्रतवैकल्ये ही वैज्ञानिक पायावर आधारित आहे. त्यांना शास्त्रीय बैठक आहे. शरीर मन व आत्म्याचे आरोग्य आणि उत्कर्ष या हेतूने ती तयार केलेली आहेत.

 

कुठल्याही परंपरेला का? कशासाठी? हे प्रश्न विचारणे म्हणजे परंपरा डावलणे नव्हे तर त्यात दडलेली शास्त्रीय उत्तरे शोधून परंपरेचा नव्याने डोळस स्वीकार करणे आणि बदलत्या काळानुसार, जीवनपद्धतीनुसार, गरजेनुसार, सोयीप्रमाणे, उपलब्धता जाणून त्यात आवश्यक, सुटसुटीत, कर्मठपणा आणि अंधश्रद्धा टाळून सकारात्मक रूप, आकार देणे म्हणजे खरी आधुनिकता.

 

चातुर्मासातील परंपरागत व्रतधारणांविषयी याच विचारांची जागृती व्हायला हवी कारण चातुर्मास ही केवळ

धर्म परंपरा नव्हे तर ती ऋतुबदलानुसार केलेली एक आरोग्य समृद्ध *लाईफ स्टाईल* आहे.

 

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा