*वन्य प्राण्यांचा उपद्रव; वनविभागाची टीम दाखल होणार कांदूळी गावात*
*माजी सभापती मोहन सावंत यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाला निवेदन*
कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कांदुळी हा गाव शेती वरच अवलंबून आहे, वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे चिंतेत असलेल्या ग्रामस्थांनी कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती मोहन सावंत यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी सहायक उपवनसंरक्षक सुनील लाड, वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर उपस्थित होते. वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी शेतकऱ्यांची संवाद साधला, येत्या शनिवारी वनविभागाची टीम कांदुळी गावात दाखल होणार असून, ग्रामस्थांच्या सहकार्याने वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी, उपाययोजना केल्या जाणार आहेत.
निवेदन देण्यासाठी वनविभाग कार्यालयात आलेल्या, शेतकऱ्यांशी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी स्वतः संवाद साधला.
वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात वृक्षतोड झाल्याने, त्यांचा उपद्रव वाढत आहे. मानवी वस्ती लगतच्या जागेत त्यांचा अधिवास वाढला की, त्या जागेची त्यांना सवय होते. माणसांवरही ते हल्ला करतात. सोलर कुंपण योजना शासनाची आहे. शेतकऱ्यांनी संघटित होऊन वन्य प्राण्यांचा उपद्रव टाळण्यासाठी ही योजना राबवावी, त्यासाठी वनविभाग कर्मचाऱ्यांचे सहकार्य राहणार आहे.
शेती कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या सोयीनुसार वनविभागाची टीम गावात पोहोचेल, असे रेड्डी यांनी स्पष्ट केले.
उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी समाधानकारक संवाद साधल्याने, ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. येत्या शनिवारी सकाळी दहा वाजता उपवनसंरक्षक यांच्या सूचनेनुसार वन विभागाची टीम कांदूळी गावात दाखल होणार आहे.