*हरमनप्रीत सिंगने केले दोन गोल*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील गट ब सामन्यात आयर्लंडचा २-० असा पराभव केला. भारताने अशा प्रकारे पॅरिस गेम्समध्ये आपली अपराजित मोहीम सुरू ठेवली आहे. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली जी शेवटपर्यंत अबाधित राहिली. हरमनप्रीतने ११व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर पहिला गोल केला. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये त्याने १९व्या मिनिटाला मैदानी गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली. भारताने याआधी न्यूझीलंडचा पराभव केला होता, तर रिओ ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनासोबत १-१ अशी बरोबरी साधली होती.
भारताचे दोन्ही गोल कर्णधार हरमनप्रीत सिंगने केले. पहिल्या क्वार्टरमध्ये त्याने पेनल्टी स्ट्रोकचे रूपांतर केले, तर दुसऱ्या क्वार्टरमध्ये मैदानी गोलद्वारे भारताची आघाडी दुप्पट केली.
भारतीय संघ सध्या ब गटात दोन विजय आणि एक बरोबरीत पहिल्या स्थानावर आहे, तर आयर्लंड गटात तळाशी आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या क्षणी विजय मिळवला होता आणि शेवटच्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरच्या जोरावर अर्जेंटिनाविरुद्ध बरोबरी साधण्यातही यश मिळविले होते.
भारताचा पुढील सामना १ ऑगस्ट रोजी बेल्जियम विरुद्ध होणार आहे. तर गटातील शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ ऑगस्ट रोजी होणार आहे.