अमरावती दि. 29 – शिक्षणाच्या व कृषी क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या शिक्षण महर्षी व कृषी महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब शामराव देशमुख यांना भारतरत्न ही उपाधी देऊन गौरव करण्याच्या व यासाठी सर्व दूर लोक चळवळ तयार होत असून त्यासाठी अनेक मदतीचे हात समोर आले आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच भाऊ साहेबांचा वारसा खऱ्या अर्थाने चालवणारे स्वर्गीय दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतिदिनापासून भारतरत्न डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना प्राप्त व्हावी यासाठी सर्व समावेशक स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती डॉ पंजाबराव देशमुख भारतरत्न समितीचे केंद्रीय समन्वयक प्रा . डॉ. नरेशचंद्र काठोळे व मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. व्ही टी इंगोले यांनी एका पत्रकात दिली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कार्य शब्दातीत आहे. या माणसाने भारताचे पहिले कृषी राज्यमंत्री असताना कृषी क्षेत्रात व शिक्षण क्षेत्रात संपूर्ण भारतात क्रांती घडवून आणली आहे. अमरावतीला श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून त्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगा विदर्भात आणली आहे. डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुण्याईने करोडो विद्यार्थी उच्चशिक्षित होऊन संपूर्ण जगात यशस्वीरित्या काम करीत आहेत .हे वर्ष डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे 125 जयंती वर्ष असून या वर्षात त्यांना भारतरत्न उपाधीने गौरव विण्यात यावे अशी मागणी आता सर्व क्षेत्रातून होऊ लागली आहे. या कामी अमरावतीचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी राज्यसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आहे तसेच भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न ही उपाधी देण्यात यावी असे रितसर पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे खासदार डॉ अनिल बोंडे यांनी महाराष्ट्र सदन येथे महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा सदस्य व सहा राज्यसभा सदस्य यांच्या एका सभेचे आयोजन केले आहे. या सभेत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्याचा ठराव करण्यात येणार असून हे खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री श्री अमित शहा यांची भेट घेऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत. त्याचप्रमाणे श्री शिवाजी संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख यांची भेट घेऊन मुख्य केंद्रीय संयोजक व डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे व दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाचे सीनियर एडवोकेट श्री के के चौधरी यांनी अमरावतीला येऊन त्यांना संस्थेचा ठराव करण्याची विनंती केली आहे. या कामात संस्थेचे सदस्य व स्व.दादासाहेब काळमेघ यांचे सुपुत्र श्री हेमंत काळमेघ यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राचे लोकनेते श्री शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा श्री राज ठाकरे यांच्याशी सर्वश्री दिनेश सूर्यवंशी पप्पू पाटील प्रा. भैय्यासाहेब मेटकर यांच्यामार्फत संपर्क साधला असून त्यांना या कामी सर्व क्षेत्रातून अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळण्यासाठी संयोजन समितीने स्वाक्षरी मोहीम राबवण्याचे ठरविले असून एक लाख सह्या गोळा करण्याचा समितीचा संकल्प आहे. या कामी पंजाबराव वर प्रेम करणाऱ्या सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन काम करावे व संयोजन समितीला सहकार्य करावे असेही आवाहन या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
प्रकाशनार्थ प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक
डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएस अकादमी
अमरावती 9890967003