You are currently viewing पावसानंतर भारतीय फलंदाजांची धावांची बरसात

पावसानंतर भारतीय फलंदाजांची धावांची बरसात

*श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव, मालिकाही जिंकली*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी पल्लेकेले स्टेडियमवर खेळला गेला. भारताने हा सामना ७ विकेटने जिंकून मालिका खिशात घातली. मालिकेतील शेवटचा सामना ३० जुलै रोजी होणार आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत १६१ धावा केल्या. पावसामुळे सामना थांबवावा लागला. यानंतर डीएलएस पद्धतीने भारताला ८ षटकांत ७७ धावांचे लक्ष्य मिळाले. भारतीय संघाने ३ विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर श्रीलंकेची सुरुवात सरासरी होती. संघाला पहिला धक्का २६ धावांवर बसला. कुसल मेंडिसने ११ चेंडूत १० धावा केल्या. यानंतर पथुम निसांका आणि कुसल परेरा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी रवी बिश्नोईने भेदली. त्याने निसांकाला पायचीत बाद केले. पथुम निसांकाने २४ चेंडूत ३२ धावा केल्या. यानंतर कामिंदू मेंडिसने २६ आणि कुसल परेराने ५३ धावा केल्या.

दासुन शनाकाला सलग दुसऱ्या सामन्यात खातेही उघडता आले नाही. वानिंदू हसरंगाही गोल्डन डकचा बळी ठरला. कर्णधार चरिथ असलंकाने १२ चेंडूत १४ धावा, महेश तिक्षनाने २ धावा आणि रमेश मेंडिसने १२ धावा केल्या. मथिशा पाथिराना १ धाव करून नाबाद राहिला. भारताकडून रवी बिष्णोईने ३ बळी घेतले. त्याच्याशिवाय अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांनी २-२ गडी बाद केले.

१६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पावसामुळे सामना थांबवावा लागला तेव्हा भारतीय संघाने ३ चेंडूत ६ धावा केल्या होत्या. यानंतर षटकांमध्ये कपात करण्यात आली. डीएलएस पद्धतीने भारताला ८ षटकांत ७८ धावांचे लक्ष्य मिळाले, जे भारताने ३ गडी गमावून पूर्ण केले. यशस्वी जैस्वालने १५ चेंडूत ३० तर सूर्यकुमार यादवने १२ चेंडूत २६ धावा केल्या. संजू सॅमसनचे खातेही उघडले नाही. हार्दिक पंड्या २२ धावांवर नाबाद राहिला तर ऋषभ पंत २ धावांवर नाबाद राहिला. महेश तिक्षना, वानिंदू हसरंगा आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

रवी बिष्णोईला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा