*सात्विक-चिराग आणि लक्ष्यही विजयी*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शनिवारी भारतीय खेळाडूंनी आपल्या मोहिमेला सुरुवात केली. भारतासाठी पहिला दिवस संमिश्र ठरला. काही नेमबाजांनी निराश केले, तर मनू भाकर अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. याशिवाय प्रीती पनवारने बॉक्सिंगमध्ये भारताचा पहिला दिवस ५-० असा जिंकून संपवला. मात्र, अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो या महिला दुहेरी जोडीला गटातील पहिल्या सामन्यात कोरियाच्या किम-काँगकडून २-० असा पराभव पत्करावा लागला. कोरियन जोडीने भारतीय जोडीचा २१-१८, २१-१० असा पराभव केला. प्रीतीने व्हिएतनामच्या व्हो किमचा ५-० असा पराभव केला. मनू भाकर रविवारी सुवर्णपदकासाठी झुंज देईल. पहिल्या दिवशी भारताला एकही पदक मिळाले नाही.
भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. तिने पात्रता फेरीत ५८०-२७ गुण मिळवले आणि ती तिसरी राहिली. त्याचवेळी भारताची रिदम सांगवान १५वे स्थान मिळवून पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली. सांगवानने ५७३-१४ गुण मिळवले. रविवारी दुपारी साडेतीन वाजता अंतिम सामना होणार असून मनू भारतासाठी पदकाचे खाते उघडू शकते. अंतिम फेरीत, आठ नेमबाज सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा तीन पदकांसाठी स्पर्धा करतील.
हंगेरीची वेरोनिका मेजर ५८२-२२x गुणांसह प्रथम स्थानावर आली, तर दक्षिण कोरियाची जिन ये ओह ५८२-२०x गुणांसह द्वितीय स्थानावर आली. मनूने सहा प्रयत्नांत ९७, ९७, ९८, ९६, ९६ आणि ९६ गुण मिळवले. या तिघांव्यतिरिक्त व्हिएतनामचा विन्ह थु ट्रिन्ह, दक्षिण कोरियाचा येजी किम, चीनचा झ्यू ली, तुर्कीचा एलायदा सेवल तरहान आणि चीनचा रेन्क्सिन जियांग हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
कर्णधार हरमनप्रीतने ५९ व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे भारतीय पुरुष हॉकी संघाने गट-ब मधील त्यांच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा ३-२ असा पराभव केला. या रोमांचक सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये सॅम लेनच्या गोलमुळे टीम इंडिया १-० ने पिछाडीवर होती. मात्र, दुसऱ्या क्वार्टरमध्ये मनदीप सिंगच्या गोलने भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये विवेकच्या गोलमुळे टीम इंडिया २-१ अशी आघाडीवर होती. चौथ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडच्या सायमन चाइल्डने गोल करत स्कोअर २-२ अशी बरोबरीत आणला. सामना बरोबरीत संपेल असे वाटत होते, पण पूर्ण वेळेच्या एक मिनिट आधी कर्णधार हरमनप्रीतने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत भारताला ३-२ विजय मिळवून दिला.
सात्विक-चिराग या भारतीय पुरुष दुहेरी जोडीने पॅरिस ऑलिम्पिकची विजयी सुरुवात केली आहे. सात्विक-चिराग जोडीने कोरवी आणि लाबर जोडीचा सलग सेटमध्ये २१-१७, २१-१४ असा एकतर्फी पराभव केला.
भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. लक्ष्यने पुरुष एकेरीच्या लढतीत केविन कॉर्डनचा २१-८, २२-२० असा पराभव करत विजयी सुरुवात केली. लक्ष्यने पहिला गेम सहज जिंकून कॉर्डनला संधी दिली नाही. मात्र, कॉर्डेनने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी लक्ष्यने पुनरागमन करत हा गेम एकतर्फी जिंकला.
भारतीय टेबल टेनिसपटू हरमीत देसाईने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केली. हरमीतने पुरुष एकेरीच्या लढतीत झायेद अबो यामनचा एकतर्फी ४-० असा पराभव केला. ३० मिनिटे चाललेल्या या सामन्यात हरमीतने ११-७, ११-९, ११-५, ११-५ असा विजय मिळवला. यासह हरमीत टॉप ६४ मध्ये पोहोचला आहे.