You are currently viewing मनाचा आजार…

मनाचा आजार…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*मनाचा आजार…*

 

प्रसिद्ध मानस शास्रज्ञ सिग्मंड फ्राईड म्हणतो की,कोणत्याही शारिरीक व्याधीची सुरूवात

ही मनातून होते. आधी मन आजारी पडते व त्यातून मग हे दुखते, ते दुखते सुरू होते. म्हणून

आधी तुमचे मन:स्वास्थ्य तुम्ही तपासून पहायला हवे.

 

ह्या मनाच्या आजाराची शेकडो कारणे आहेत.

ती मनातून आपल्याला पटली तरी माणूस ती

मान्य करत नाही इतका माणूस विचित्र आहे.

हो, माणूस जितका चांगला आहे त्याहून तो

जास्त विचित्र आहे. प्रत्येकालाच वाटते की मी

सुखी रहावा. पण हे सुख किती? त्याची मर्यादा

काय? हे मात्र त्याला कळत नाही किंवा ठरवता येत नाही असे म्हणा हवं तर. किंवा कळते पण वळत नाही, माणसाचा लोभ सुटत

नाही आणि सुखाच्या मागे धावणे तो थांबवत

नाही, जे हाती लागते तेवढ्यावर तो थांबत नाही. अजून.. अजून करता करता दमछाक होते, समाधान होत नाही आणि मग येते ते

नैराश्य.डिप्रेशन. काही काही घरात अफाट

पैसा असतो पण.. स्वास्थ्य नावाची गोष्ट त्या

घरातून हरवलेली असते. ह्याला काय बाहेरच्या

व्यक्ति थोड्याच जबाबदार असतात?

 

आपल्या प्रत्येक गोष्टीला आपणच जबाबदार

असतो हे पक्के लक्षात ठेवा. आपण खापर मात्र इतरांवर फोडत असतो. माझा एक नाही

दोन, नातलागातील मुले आई वडीलांनी पैसा

पुरवून शिकवले पण त्यांनी ३/४ वर्षे कॅालेजला

नुसतीच चैन केली, प्रेमप्रकरणं केली, अभ्यासाच्या नावाने ठो ठो ! काढताहेत बापाच्या जीवावर आयुष्य. वरून बोलायची सोय नाही. घरात तमाशा उभा करतातच पण

आपल्या नाकर्तेपणाची ना खंत ना लाजलज्जा. मला ही पोस, माझ्या बायकोलाही पोस. असा कारभार आहे.

 

बोलले की डिप्रेशन मध्ये जातात. मग पुन्हा

त्यांच्या दवाखान्याला पैसे भरा. म्हाताऱ्या आई

वडीलांनी पोट आहे म्हणून किती सोसायचे?

काही घरांमध्ये अमाप पैसा आहे. मनाला, हातापायांना काही कामच नाही. मग हे दुखते ते दुखते, पुन्हा डिप्रेशन आहेच.मग आपल्याला नको नको ते आजार झाल्याचे भास होऊन आपण आता मरणार अशी त्यांना भीती वाटत

राहते हा केवढा मोठा मानसिक आजार आहे.

मग पुन्हा मानसरोग तज्ञाची गोळी सुरू करणे

आलेच. असा हा गुंता कमी होण्या ऐवजी वाढतच जातो व घरच्यांसाठी ती एक मोठी

डोकेदुखी होऊन बसते ते वेगळेच.

 

म्हणून आपल्या लायकी प्रमाणे काम शोधून

त्यात मन गुंतवणे, मनाला बिझी ठेवणे अत्यंत

गरजेचे असते. नाही तर मग ही माणसे” रिकामा न्हावी नि भिंतीला तुंबड्या लावी” असे वर्तन करतात व त्याचा परिसरात सगळ्यांनाच त्रास होतो. घरोघर मतभेद आहेत, भांडणे आहेत. भांडण नाही असे एक ही घर नाही.प्रश्न

नाही असे एक ही घर नाही कोणी मान्य करो

अथवा न करो. मी ही याला अपवाद नाही.

बऱ्याच वर्षांपूर्वी मी अशीच एकदा कसल्याशा

स्ट्रेस मध्ये होते. घराघरात अधून मधून हे प्रश्न असतात व प्रश्न सुटतात, गाडी रूळावर येते.

 

तर….

तेव्हा माझे अचानक पोट दुखायला लागले.

नेहमी प्रमाणे जाईल १/२ दिवसात म्हणून मी

दुर्लक्ष केले. पण ते काही बंद होईना. मग मुलगा मला पोटाच्या विकारांच्या तज्ञा कडे

घेऊन गेला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, डॅा.नी पहिला प्रश्न विचारला मॅम काही स्ट्रेस आहे का? मी थक्क झाले. मी म्हटले, अहो असे छोटे

मोठे स्ट्रेस बायकांच्या नशिबात असतातच, त्यात काय विशेष. अर्थात औषध गोळ्यांनी मला बरे वाटले हे सांगायला नको. म्हणून मी

सुरूवातीलाच सांगितले की शारिरिक आजाराची सुरूवात मनातून होते.

 

खेड्यापाड्यात तर महिलांकडे कुटुंबियांचे एवढे दुर्लक्ष होते की आपल्याकडे लक्ष वेधून

घेण्यासाठी बायकांचे अंगात येणे, घुमणे असे

प्रकार सुरू होतात. शहरात खूप वेळा स्पर्धा

दुस्वास,इतरांना कॅापी करणे,त्यांचा हेवा करणे

यातून हे मानसिक आजार सुरू होतात.तो श्रीमंत मग मी का नाही? अगदी साध्या फालतू

गोष्टीही या आजाराचे कारण बनतात.हा माणसाचा स्वभाव दोषच नाही का? आपल्या

पंखात बळ आहे, तेवढीच झेप घ्यावी ना? नाही तर मग कपाळमोक्ष ठरलेलाच आहे. विनोबाजी

म्हणतात, माणूस नेहमी दु:खाच्या शोधात असतो. त्यांचे हे म्हणणे मला एकदम पटते.

खरेच आहे ते. आपण हातचे सोडून पळत्याच्या

पाठीमागे लागतो. का नाही दु:ख पदरी येणार?

 

कधी कधी मुर्ख शेजाऱ्यांमुळेही मानसिक स्वास्थ्य बिघडते पण ते कितपत बिघडू द्यायचे

हे आपल्या हातात असतेच ना? एक आग व एक पाणी असेल तरच निभते हो कोणतेही नाते, नाहीतर दोन्ही जळून भस्म होतात.

म्हणून आयुष्यात तारतम्य नावाची एक गोष्ट

असते तिचा वापर करता आला पाहिजे नाहीतर आयुष्यभर दु:ख पदरी येते. मी तर एका मर्यादेपलीकडे कुणी मला त्रास दिला

तर त्या नावावर फुली मारून माझ्यापुरता प्रश्न

सोडवून टाकते. एक लक्षात ठेवा, बोलण्यापेक्षा न बोलणे ही फार मोठी शिक्षा

असते. माणसे अक्षरश: जळतात. म्हणून एखाद्याला अनुल्लेखाने मारून आपल्यापुरता

प्रश्न मिटवून टाकावा. कशाला मानसिक

आजाराचे शिकार व्हावे? देवाने एवढे सुंदर शरीर व त्यात एवढे अफाट मन व बुद्धी दिली

आहे तिचा वापर आपण आपले व समाजाचे

आरोग्य टिकवण्यासाठीच केला पाहिजे.

पटतंय् ना मग? मनाचा आजार एवढाही बळावू

देऊ नका की, घरच्यांपासून लांब रहावे लागेल.

कारण आपल्या घराइतके सुख स्वर्गातही नाही

हो? आणि स्वर्ग पाहिला आहे कुणी? त्या पेक्षा

आपल्या घरालाच स्वर्ग बनवून त्यात सुखाने राबू या ना!

काय मंडळी, हो.. आणि ही फक्त माझी मतं

आहेत. मी ती कुणावरही लादणार नाही.

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा