*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम वृत्तबद्ध काव्यरचना*
*वृत्त उद्धव*
*पाऊस कधीचा पडतो*
पानोपानी सरसरतो
थेंबाथेंबांनी हसतो
हा वेड्यागत कोसळतो
पाऊस कधीचा पडतो
नाले नद्यांमधे भरतो
काठांना स्पर्शुन जातो
अडथळे कुणीही करता
हरवून दिशा भरकटतो
बेधुंद बरसुनी घेतो
संसार वाहुनी नेतो
रागात असा का येतो
प्रश्नच कुणा ना सुटतो
होत्याचे नव्हते करतो
डोळ्यांमधुनी पाझरतो
कोणाचे चुकते शोधा
वाईट पाउसच ठरतो
बुजवले कुणी ते नाले
बांधुनी इमारत गेले
पाण्याने जावे कोठे
उत्तर अबोल का झाले
यापेक्षा बरसत होता
पूर्वीचा पाउस मित्रा
आत्ताशा वाहत जातो
हरएका नेत्रा नेत्रा
का दोष तयाला द्यावा
तो कर्तव्यावर असतो
सृष्टीच्या कल्याणाला
सर्वस्व त्यागुनी उरतो
© दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६