You are currently viewing जनतेच्या उद्रेकाची वाट पाहू नका.!

जनतेच्या उद्रेकाची वाट पाहू नका.!

*शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी अधिकाऱ्यांना सुनावले.!*

 

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या विजेच्या समस्या लक्षात घेता आयटीआय झालेली मुले कंत्राटी पध्दतीवर वीज कंपनीत भरती करुन घ्या, गावागावात निर्माण झालेली समस्या लक्षात घेता अन्य जिल्ह्यातील टिम आणून विज पुरवठा सुरळीत करा. पुढील २ महिन्यात सेवा देणे शक्य व्हावे यासाठी प्रत्येक उपकेंद्रावर भाड्याच्या गाड्या घ्या, त्याचा खर्च आपण देवू तसेच झाडे तोडण्यासाठी आवश्यक असलेली कटर खरेदी करा, लोकांचा उद्रेक होईल असे काही करू नका, कोण फोन बंद करून ठेवत असतील, कामचुकारपणा करत असतील त्यांच्यावर थेट कारवाई करा, अशा सुचना आज येथे आढावा बैठकीत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रशासनाला दिल्या.

 

विधानसभा मतदार संघात अनेक गावात ८ ते १० दिवस वीज पुरवठा खंडीत आहे. ग्रामस्थात उद्रेक आहे. या पार्श्वभूमीवर योग्य ते नियोजन करण्यासाठी ना. केसरकर यांनी शनिवारी सावंतवाडी नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधत आवश्यक सुचना दिल्या.

केसरकर म्हणाले, या ठिकाणी कामगार नाही, साहित्य नाही, असे सांगून कामचुकारपणा करू नका. ग्रामस्थांना चांगली सेवा द्या, फक्त कारणे देवून आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करू नका, असे सांगत आत्ताच तुम्ही हे नाही ते नाही असे सांगता मग पावसाळ्या आधी नेमके नियोजन काय केलात? असा सवाल मंत्री केसरकर यांनी उपस्थित करीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

प्रतिक्रिया व्यक्त करा