You are currently viewing गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर प्रथम स्मृतीदिन

गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर प्रथम स्मृतीदिन

पणदूर / कुडाळ :

दिनांक १६ जुलै २०२४ रोजी वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय आणि अँड. रामकृष्ण कोले इंग्लिश मिडीयम स्कूल पणदूरतिठा येथे गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर यांचा प्रथम स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न झाला.

१९६० रोजी वेताळबांबर्डे येथे श्री देव वेतोबा मंदिरात सुरू झालेली ही छोटीशी शाळा गुरुवर्य कै. अणावकर सर यांच्यामुळे वटवृक्षात रूपांतरित झाली आणि नांवारूपाला आली. त्यांच्या कार्य कर्तृत्वाला आदरांजली देण्यासाठी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्था सचिव मान. श्री. नागेंद्र परब यांनी कै. अणावकर सरांचे आचार- विचार, त्यांच वागणं, त्यांची शिस्त, त्यांची शिकवण यांची माहिती तुम्हा विद्यार्थ्यांना होऊन या शाळेत शिकत असताना, तुमच्या जीवनात अंगी ते रुजावेत असे या स्मृतीदिनाचे महत्त्व आहे असे सांगितले. या दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने प्रशालेतील इ. १० वी व इ. १२ वीच्या प्रशालेतून गुणानुक्रमे प्रथम ३ विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कै. अणावकर सर यांच्या “आठवणीतली गाणी” हा कार्यक्रम ही सरांना श्रद्धांजली म्हणून प्रशालेच्या कलासंगमच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. इ. ५ वीपासून या प्रशालेत शिकत असलेल्या सरांना जवळून पाहिलेल्या इ. ११ वीच्या विद्यार्थ्यांनी सरांबद्दल स्वतःच्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली.

संस्था चालकांमधून संस्था सहसचिव मान. श्री. जयभारत पालव यांनी आपल्या मनोगतात “सरांना आदरांजली अर्पण करताना “सर जरी आपल्यातून गेले असले तरी ते अदृश्य रूपाने या शैक्षणिक संकुलात वावरत असून त्यांच्या आशीर्वादानेच इंग्लिश मिडीयम स्कूलला अंतिम मान्यता मिळाली. सिनीअर महाविद्यालयाची नक तपासणी होऊन ही ग्रेड मिळाली. ग्लोबल फाऊंडेशन कडून भरघोस निधी मिळाला” असे सांगितले.

प्रशालेचे माजी मुख्याध्यापक व संस्था खजिनदार मान. श्री. सुधाकर वळंजू सर म्हणाले की, कै. अणावकर सरांबरोबर सगळ्यात जास्त ३४ वर्षे मी काम केले. सरांचे अक्षर अतिशय वळणदार व सुंदर होते. त्यांच्या सारखे अक्षर काढण्याचा मी कायम प्रयत्न केला. संपूर्ण जिल्ह्यात पणदूर हायस्कूल म्हणजे अणावकर सरांची शाळा असे त्यांचे शैक्षणिक कार्य होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पणदूर महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य मान. डॉ. एस. बी. सावंत यांनीही गुरुवर्य कै. अणावकर सर यांच्या आठवणी सांगितल्या. एक शाळा उभी करणे विशेष करून ग्रामीण भागातील गरीब मुलांसाठी तो ध्यास घेणे आणि नुसता ध्यास घेऊन नाही तर तो पूर्णत्वास नेणे त्याचबरोबर शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटविणे ही एक तपश्चर्याचं असल्याचं नमूद केलं. सरांच्या पश्चातही संस्थेच्या उन्नतीचा हा वसा त्यांचे सहकारी प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था चेअरमन मान. श्री. रघुनाथ गावडे साहेब यांनी शाळेच्या स्थापनेपासून ते समाजकारण व राजकारण करत असतानाचे सरांन सोबतचे अनुभव कथन केले. समाजकारण राजकारण यातून शिक्षण क्षेत्र पूर्णपणे वेगळे ठेवणे आणि त्याचा वेगळेपणा टिकविण्यासाठी अहोरात्र झटणं हा सरांसोबतचा अनुभव व्यक्त करायला दिवसही अपुरा असल्याचे सांगितले.

शिक्षकांच्या वतीने सहा. ज्येष्ठ शिक्षक अविनाश वालावलकर सरांनी शिक्षकांच्या वतीने अणावकर सरांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी सांगितलेल्या “जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते” या गाण्याची आठवण ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले. कार्यक्रमाला सर्व संस्था उपाध्यक्ष मान. श्री. प्रकाश जैतापकर, मान. संचालक श्री. रविंद्र कांदळकर, सौ. रिना सावंत, श्री. आनंद भोगले, सरांचे कनिष्ठ बंधू व संचालक श्री. सुबीकाका अणावकर, श्री. एम. एस. पाटील सर, शिक्षकवृंद – शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अविनाश वालावलकर सर यांनी केले तर आभार श्री. पाटील सर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा