*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*इंडिया आणि भारत*
भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर इंडिया या नावाने ओळखले जाते तथापि भारत या आपल्या देशाच्या नावामागे मोठा इतिहास दडलेला आहे. प्राचीन काळापासून भारताला वेगवेगळ्या सात नावांनी ओळखले जात असे. जम्बु आणि द्वीप या नावापासून *जम्बुद्वीप* हे भारताचे प्राचीन काळातले एक नाव आहे. जम्बु म्हणजे जांभूळ आणि जांभळाच्या वृक्षाची भूमी म्हणून जम्बुद्वीप. केवळ भारतातच जांभळाच्या झाडाची पैदास होत असावी.
*आर्यावर्त* हे भारताचे दुसरे नाव. इराणहून आर्य लोक भारतात आले आणि त्यांनी त्यांच्या वसाहतीला *आर्यावर्त* हे नाव दिले. महाभारतातही या नावाचा उल्लेख आहे.
*भारत खंड* या नावाचा उल्लेख अफगाणिस्तान पासून ते बांगलादेशपर्यंतच्या भूमीबाबत केला जायचा.
मात्र आपल्या देशाला *भारत* नाव पडले ते भरत राजावरून. दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र चक्रवर्ती सम्राट *भरत* होता. काही पुराणात असेही म्हटले जाते— ऋषभ देवाचा पुत्र *भरत* याच्या नावावरून आपल्या देशाला *भारत* असे नाव पडले. भरत किंवा भारत म्हणजे संपूर्ण भारतीय उपखंड.
सिंधू या नावाच्या अपभ्रंशातून आपल्या देशाला *हिंदुस्थान* असे म्हटले गेले. हिंदू ज्या ठिकाणी राहतात ती भूमी म्हणजे हिंदुस्थान. भारताच्या या सातही नावामागे असा प्राचीन पौराणिक आणि संस्कृतिदर्शी इतिहास आहे आणि तो अभिमानास्पद आहे. त्यामागे शौर्याच्या कहाण्या तर आहेतच पण एका महान जीवनशैलीचा समावेश आहे.
ब्रिटिशांच्या काळात भारताला इंडिया असे म्हटले जात असे. हडप्पा मोहेंजोदडो संस्कृती ही ‘इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन’ म्हणून ओळखली जात असे त्यावरून या देशाला लॅटिन भाषेत *इंडे* असे म्हणत. ब्रिटिशांकडून इंडे या नावानंतर बोलता बोलता इंडिया असे म्हटले जायचे आणि त्यानंतर *इंडिया* हेच नाव प्रचलित झाले. जागतिक नकाशावर भारता ऐवजी इंडिया हे नाव कोरले गेले.
इंडिया आणि भारत या एकाच देशाच्या दोन नावांचा विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा वाटते एखाद्या जन्मलेल्या मुलाची बारशाच्या वेळी कमीत कमी दोन नावे ठेवली जातात. एक पाळण्यातलं आणि एक व्यवहारातले. पाळण्यातलं नाव वास्तविक जन्मवेळ, राशी, ग्रह यावरून येणाऱ्या अक्षरावरून ठेवलेले असते पण ते मात्र सुप्त राहते आणि व्यवहारातले नावच तोंडी बसते. इंडिया आणि भारत या नावांविषयी काहीसे असेच वाटते.
मी *इंडियन* आहे म्हणण्यापेक्षा मी *भारतीय* आहे असे म्हटले तर सहजच एक वेगळे स्फुरण चढते.
*ये मेरा इंडिया* म्हणण्यापेक्षा *मेरा भारत महान* हे छाती रुंदावून म्हटले जाते कारण भारत या नावापाशीच भारतीयांची नाळ जोडलेली आहे.
आता पुन्हा एकदा इंडिया आणि भारत हा विषय ऐरणीवर आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या कलमांमध्ये *इंडिया इज भारत* असा उल्लेख केला आहे त्यामुळे इंग्रजीत इंडिया आणि भारतीय भाषांमध्ये भारत असे नाव आपण स्वीकारले पण बॉम्बेचे जसे मुंबई झाले तसे इंडियाचे भारत होऊ शकते. इंडिया हे नाव भारताच्या राजपत्रातून कायमचे दूर करून *भारत* या नावाने देशाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो आणि हा प्रयत्न यशस्वी व्हावा हीच भारतीयांची मनीषा आहे.
*राधिका भांडारकर*