You are currently viewing कबुलायतदार प्रश्र्नी गेळे वासियांचे आमरण उपोषण..

कबुलायतदार प्रश्र्नी गेळे वासियांचे आमरण उपोषण..

ओरोस :

 

सावंतवाडी तालुक्यातील गेळे गावच्या कबुलायतदार गांवकर प्रश्ना संदर्भात मागीलवर्षी २६ जुलै रोजी शासन निर्णय होऊन देखील तसेच त्या संदर्भात गेळे ग्रामस्थांच्या माध्यमातून परिपूर्ण प्रस्ताव व वाटप केलेले नकाशे प्रशासनाला देऊन देखील जमीन वाटपा संदर्भात जिल्हा प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी देखील या संदर्भात निर्देश दिलेले असताना जिल्हा प्रशासनाची याबाबतची भुमिका संशयास्पद आहे. जागा वाटपाबाबत शासनाचे आदेश झालेले असताना, त्या ठिकाणी पुढील प्रक्रिया रोखणारा झारीतील शुक्राचार्य कोण ? असा सवाल करीत कोणाच्याही दबावाखाली जिल्हाधिकाऱ्यांनी काम करू नये. ग्रामस्थांना त्यांच्या जमिनीचे वाटप करून न्याय देण्यात यावा अशी मागणी भाजपाचे युवा नेते संदीप गावडे यांनी केलीय.

गेळे येथील ग्रामस्थांची जमीन वाटपाची गेले अनेक दिवस मागणी आहे. याबाबत सकारात्मक शासनाचा आदेश झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडून पुढील वाटपाची परवानगी प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी यासाठी आज गेळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दु.११.३० पासुन आमरण उपोषण सुरू केले आहे.

गेळे गावातील कबुलायतदार गांवकर जमीनी वाटपा संदर्भात २६ जुलै २०२३ रोजी शासन निर्णय झाला होता. मात्र, त्यात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे त्या त्रुटी व वाटपासंदर्भातील अहवाल आम्ही पालकमंत्र्यांना दिला होता. त्यानंतर शासन स्तरावर तीन ते चार वेळा या संदर्भात बैठका घेण्यात आल्या. १६ जुलै रोजी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत उपस्थित वन अधिकाऱ्यांनी वनसंज्ञा जमीनीचे वाटप करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असल्याचे स्पष्ट केले. तर महाराष्ट्र शासन उल्लेख असलेल्या जमीनी वाटत करण्याचे अधिकार यापूर्वीच शासनाने जिल्हाधिकारी यांना दिले आहे. मात्र, असे असून देखील जिल्हाधिकारी यांच्याकडून याबाबत टाळाटाळ होत असल्याने जिल्हाधिकारी यांच्यावर कोणाचा दबाव आहे की यामागे कोणी पडद्यामागचा सुत्रधार आहे का ? असा संशय उपस्थितांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाचा २६ जुलै रोजी झालेला निर्णय व १३ मार्चला अलिकडेच झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिलेले स्पष्ट निर्देश असताना देखील जिल्हा प्रशासन निष्क्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. जोपर्यंत गावकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही असा इशारा संदीप गावडे यांनी दिला. तर जिल्हाधिकारी यांची बदली करण्यासंदर्भातील मागणी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे, उपसरपंच विजय गवस, गेळे गावचे माजी सरपंच तातोबा गवस, आंबोली मंडळ अध्यक्ष अमोल सावंत, तुकाराम बंड, देवसू सरपंच रूपेश सावंत, श्रीकृष्ण गवस, माजी पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर, धनगर समाज मंडळ अध्यक्ष दीपक पाटील केसरी, केसरी उपसरपंच संदीप पाटील, भिलवडे सरपंच प्रकाश दळवी, गेळे जमीन कमिटी ग्रामस्थ आनंद गावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा