You are currently viewing भाजी मार्केट इमारतीबाबत कणकवलीकरांची केली फसवणूक : समीर नलावडे

भाजी मार्केट इमारतीबाबत कणकवलीकरांची केली फसवणूक : समीर नलावडे

चुकीचे प्लॅन दाखवून फायर परवानगी…

कणकवली

नगरपंचायतीशी करार करून देखील ग्लोबल असोसिएट या विकासकाने गेल्या तीन वर्षात भाजी मार्केटची इमारत पूर्ण केलेली नाही. तसेच मूळ प्लॅन ऐवजी दुसराच प्लॅन तयार करून या विकासकाने अग्निशमन दाखला मिळवला आणि तो सादर करून नगरपंचायतीचीही फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नगरपंचायत सभेत केला. तसेच जोपर्यंत शासनाचे सर्व नियम, निकष, परवानग्या यांची पूर्तता होत नाही तोवर भाजी मार्केट उभारणीबाबत विकासकाशी नव्याने करार करणार नसल्याचीही भूमिका त्यांनी मांडली.
कणकवली नगरपंचायतीची आज सभा आज ऑनलाइन माध्यमातून झाली. यात भाजी मार्केट उभारणीबाबतचा मुद्दा मांडला. यात उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, विरोधी पक्षगटनेते सुशांत नाईक यांच्यासह अभिजित मुसळे, अबिद नाईक, मेघा गांगण, कविता राणे, उर्मी जाधव, अ‍ॅड.विराज भोसले, शिशिर परुळेकर आदींनी सहभाग घेतला.
कणकवली शहरात तेलीआळी डीपी रोड आणि राष्ट्रीय महामार्ग यादरम्यानची जागा भाजी मार्केटसाठी आरक्षित आहे. या आरक्षित जागेपैकी ४० टक्के क्षेत्रात नगरपंचायतीला भाजी मार्केट बांधून देण्याचा करार ग्लोबल असोसिएटने ऑक्टोबर २०१७ मध्ये नगरपंचायतीशी केला होता. हा करार करताना दोन वर्षात भाजी मार्केटची इमारत बांधून ती नगरपंचायतीकडे जागेसह हस्तांतरण करण्याचा करार करण्यात आला होता. जर दोन वर्षात हे मार्केट पूर्ण न झाल्यास त्याबाबतचा पुढील निर्णय नगरपंचायतीच्या सभेत घेण्याबाबतही या करारात अट घालण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष श्री.नलावडे यांनी सभेत दिली.
ग्लोबल असोसिएटने वाढीव मुदतीसह ऑक्टोबर २०२० मध्ये हे काम पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र भाजी मार्केट बांधून ते नगरपंचायतीकडे हस्तांतरण झालेले नाही. मंजूर प्लॅन प्रमाणे या भाजी मार्केटकडे जाण्यासाठीचा ६ मिटर रस्ता सोडण्यात आलेला नाही. चुकीचा प्लॅन सादर करून या इमारतीसाठी अग्निशमन परवानगी घेण्यात आली. तसेच या इमारतीसाठी स्वतंत्र सातबारा देखील करण्यात आलेला नाही. त्यामुळे भाजी मार्केटबाबत काय करायचे याचा निर्णय सभागृहाने घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.
कणकवली शहरात भाजी मार्केट व्हायलाच हवे. त्यामुळे संपूर्ण आरक्षित जागा नगरपंचायतीने भूसंपादन करून ताब्यात घ्यावी अशी मागणी कन्हैया पारकर यांनी केली. तर भाजी मार्केटकडे जाण्यासाठी १२ मिटरचा स्वतंत्र रस्ता, सातबारा स्वतंत्र करणे आदी कामे ठेकेदाराकडून करून घ्यावीत असे सुशांत नाईक म्हणाले. मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी भाजी मार्केट इमारतीची परवानगी आणि प्रत्यक्ष झालेले बांधकाम याबाबतची पाहणी संयुक्त समितीने करावी. या समितीच्या अहवालानंतरच नगरपंचायतीने निर्णय घ्यावा अशी आपली भूमिका मांडली. या भूमिकेचे सर्वच नगरसेवकांनी स्वागत केले. पुढील काळात सर्व नगरसेवक तसेच नगररचना विभागाचे अधिकारी यांच्या समवेत नियोजित भाजी मार्केट इमारत आणि तेथील जागेची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल नगरपंचायतीला सादर करण्याचे निश्‍चित करण्यात आले. तर हा अहवाल पुढील सभेत सभागृहात आल्यानंतर भाजीमार्केट उभारणीबाबतचा निर्णय सर्वानुमते घेण्याचे निश्‍चित करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा