मुंबई :
देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबईतून बेपत्ता झालेल्या १२६ मुलींचा शोध सुरू आहे. पोलीस या मुलींना शोधण्यासाठी संभाव्य व्यक्तींची चौकशी करत आहेत. ज्या भागात मुली सापडण्याची शक्यता आहे अशा ठिकठिकाणी वेगवेगळ्या वेळी छापे टाकून तपासणी केली जात आहे. तपास सुरू आहे, शोध लागेल, असे आश्वासन मुंबई पोलिसांकडून मुलींच्या पालकांना देण्यात आले आहे.
*महाराष्ट्रातून २०१९ मध्ये १ लाख २४ हजार ५१५ जण झाले बेपत्ता*
राष्ट्रीय अपराध नोंदणी ब्युरो अर्थात नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो यांच्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये महाराष्ट्रातून ६७ हजार ७४६ महिला, ५६ हजार ७५० पुरुष आणि १९ तृतीयपंथी असे १ लाख २४ हजार ५१५ जण बेपत्ता झाले. यात मुलगे आणि मुली यांचाही समावेश आहे. बेपत्ता झालेल्यांपैकी ६७ हजार १८ जणांचा शोध घेण्यात पोलीस यशस्वी झाले. यात अल्पवयीन असलेल्यांचाही समावेश आहे.
*मुंबईत ११ महिन्यांत ७०८ मुलींच्या अपहरणाची नोंद*
मुंबईत मागील ११ महिन्यांमध्ये ७०८ मुलींच्या अपहरणाची नोंद झाली. यातील ५८२ मुलींचा शोध लागल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. अद्याप १२६ मुली बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
*लॉकडाऊन काळात अपहरणाच्या घटनांमध्ये घट*
लॉकडाऊन काळात मुले आणि त्यांचे पालक असे सर्वजण घरातच होते. यामुळे लॉकडाऊन काळात अपहरण होण्याच्या घटनांमध्ये घट झाली. मात्र महाराष्ट्रात मिशन बिगिन अगेन सुरू झाल्यानंतर पुन्हा अपहरणाच्या घटना घडू लागल्या. मुंबईतून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे.