अतिवष्टीमुळे गगनबावडा तालुक्यात दोन ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी; वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविली
अजित नाडकर्णी यांनी आमदारांशी संपर्क साधून यावर मार्ग काढण्याचे घेतले आश्वासन
कणकवली
गगनबावडा तालुक्यातील मांडुकली व खोकुर्ले येथे पुराचे पाणी आल्याने महामार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. एसटी प्रशासनाने देखील लांब पल्ल्याच्या गाड्या फोंडाघाट मार्गे वळविल्या आहेत. करुळ व भुईबावडा हे दोन प्रमुख मार्ग आहेत. करुळ घाट रस्ता रुंदीकरणामुळे गेले अनेक महिने वाहतूकीसाठी बंद आहे. तर भुईबावडा मार्गे वाहतूक सुरू होती. मात्र गगनबावडा तालुक्यात दोन ठिकाणी पाणी भरल्याने वाहतूक बंद झाली आहे.
गेले पाच दिवस गगनबावडा तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. तालुक्यात आज दिवसभर मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. पावसाचा जोर अद्यापही कायम असून कुंभी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. कुंभी नदीला पूर आला असून या पुराचे पाणी रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मांडुकली व खोकुर्ले येथील रस्त्यावर आले. मांडुकली व खोकुर्ले येथील रस्त्यावरील पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने तालुका प्रशासनाने गगनबावडा मार्गे कोकणात सुरू असलेली वाहतुक सायंकाळी 7 च्या सुमारास बंद केली.
गगनबावडा तालुक्यात आज दिवसभरात सर्वत्र मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. परिणामी तालुक्यातील कुंभी, धामणी, सरस्वती व रुपणी या सर्वच नद्यांना पूर आला आहे. पुरामुळे कुंभी नदीवरील शेणवडे, मांडुकली, वेतवडे, पळसंबे, सांगशी, कळे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर असाच राहील्यास याचा परिणाम वाहतुकीवर होणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी आमदारांशी संपर्क साधून यावर मार्ग काढण्याचे आश्वासन घेतले आहे.