You are currently viewing माझे गाव कापडणे

माझे गाव कापडणे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*२८)माझे गाव कापडणे*

 

माणूस मोठा बहुरूपी आहे. क्षणाक्षणाला तो

आपले रंग बदलत असतो.बाहेरच्या जगात वावरतांना आपली प्रतिमा चांगली रहावी म्हणून त्याने एक खोटा मुखवटा धारण केलेला

असतो व प्रसंग आला की क्षणार्धात तो त्या

मुखवट्यात प्रवेश करतो जे त्याचे मूळ रूप नसते.खरेतर प्रत्येकच मनुष्यप्राणी अभिनय सम्राट असतो. फक्त त्यातले काही रंगमंचावर

जातात काही घरीच आपापल्या भुमिका वठवत असतात. याला कुणीही अपवाद नाही.

भाग फक्त संस्कारांचा असतो. चांगले संस्कार

असतील तर मात्र दुसऱ्याला दुखवण्याआधी तो दहा वेळा विचार करतो.

 

खरं म्हणजे कोणतेच आईवडील मुलांवर वाईट

संस्कार करूच शकत नाही. मग समाजात घरोघर जी विषवल्ली निर्माण होते ती कशी?

हा प्रश्न उरतोच. त्याची अनेक कारणे अनेक जण देतील पण त्याच्याने प्रश्न सुटणार नाहीच.पण वेळोवेळी घरोघर समाजात आपल्याला अशा महाभागांना तोंड द्यावे लागते

व आपण खमके नसू तर ते आपल्याला जगणे

मुष्कील करू शकतात, करतात. बाहेर ॲाफिसमध्ये काम करणाऱ्या मंडळींनाही हे अनुभव नित्याचेच असतात. कठोरपणे त्यांच्याशी निपटता आले पाहिजे नाहीतर ते

सुखाने जगूच देत नाहीत. म्हणून वेळ पडली तर

“सौ सुनारकी और एक लुहारकी” देता आली पाहिजे.तुम्ही जसजसे प्रगती करता तसे हे राहू केतू मागे मागे येतात.

 

हे सगळे मी अशासाठी सांगितले की, कापडण्याला लहानाची मोठी होतांना मनुष्य

स्वभावाचे हे नमुने हळूहळू मलाही कळत होते.

आता डोळ्यांसमोर सारे दिसते व विषाद वाटतो

कां ही मंडळी, जी रक्ताची, जवळची, भाऊबंदातली असून अशी वागत होती.तुम्ही परक्यांशी इमेज खराब होऊ नये म्हणून चांगले

वागता व जवळचे जे तुमचे हितचिंतक आहेत

त्यांच्याशी वाईट वागता, त्यांच्या वाईटावर टपलेले असता असे का? त्यात तुम्हाला विकृत

आनंद मिळतो म्हणून? ही विकृतीच तुमच्या

सर्वनाशाला कारण ठरते हे माणसाला तेव्हा कळत नसले तरी अशांचा सर्वनाश मग सारा

गाव पाहतो नि म्हणतो,” बरं हुई गे, तिले अशेच

लागाव व्हतं, भलती माती गयथी ती! देवबानी

बरोबर हानी तिले” असे उद्गार सर्रास कानावर

पडतात.

 

माणूस कसा असतो पहा. माझ्या वडीलांशिवाय घराचे काय? गावाचे पान हलत

नव्हते हे मी वारंवार तुम्हाला सांगतेच आहे, पण कुटुंबात काही त्यांना कमी शत्रू नव्हते?

आमच्या पूर्ण फॅमिलीला काके चुलते मामे लांबचे जवळचे सर्वांना माझ्या वडिलांनी उभे

केले. मार्गी लावले. पण कृतज्ञता? छे.!

काही मंडळी भयंकर कृतघ्न! त्यांना ना उपकाराची चाड ना लाजलज्जा.. जे काम

असले की, मी विष्णुभाऊंचा अमुक तमुक आहे

सांगून अजून कामे करवून घेतात पण ते जीवंत

असतांना या स्वार्थी लोकांना त्यांची कदर फक्त अडले की करावी हे माहित होते.

 

सांगायलाच लाज वाटावी असे लग्नाचे आहेर

ह्या मंडळींनी माझ्या लग्नात केले. तेव्हा स्टीलची खूप क्रेझ होती. मग हलक्या पितळी

तांब्यांना चकचकीत नकली पॅालिशचे तांबे त्यांनी माझ्या लग्नात वाजवले ज्याचे पितळ

लवकरच उघडे पडून ते भंगार मध्ये गेले.आमचे काय वाईट झाले सांगा? त्यांनी तसे केले नसते तर आज दोन शब्द मी त्यांच्या विषयी चांगले लिहू शकले असते ना? अर्थात तुम्हालाही असेच अनुभव आलेले आहेत हे मला माहित आहे.या उलट एकेकाळी नाशिक महापालिकेचे प्रशासक राहिलेले सि. दौ. चव्हाण यांनी आहेर

केलेले दोन भले मोठे स्टीलचे तांबे पेले अजून माझ्या

जवळ आहेत जे माझे नातलग नसलेल्या या

भल्या माणसाची मला आजही आठवण करून

देतात. इथे मनातील भावना महत्वाची आहे किंमत नाही. ते अस्सल स्टीलचे तांबे त्या अस्सल माणसाचा चेहरा मला दाखवतात

जो माझ्या कायम स्मरणात आहे. मला

येथे तक्रार करायची नाही, मनुष्यस्वभावावर

प्रकाश टाकायचा आहे की उपकारकर्त्या माणसाशीही आपण असे वागतो. ते कायम फक्त न्यायाने वागले, कुणाच्या फेवरमध्ये वागले नाही हा त्यांचा दोष होता का?पण माझे

वडील हत्ती सारखे होते सरळ चाल चालणारे.

म्हणून अशा कुत्सित माणसांकडे त्यांनी कधी

लक्ष दिले नाही, ते आपली चाल चालत राहिले.

त्यांच्यासमोर बोलण्याची कुणाची टाप नव्हती,

कुजके कुजबुजत राहिले, अजून कुजबुजतात,

त्यांना उपकारांची जाण नाही, वडील तर उत्तमोत्तम कामे करून देशभर गावभर कीर्ति ठेवून गेले, त्यांना अशा गोष्टींनी कधीही फरक पडला नाही. मला मात्र पडतो व या कृतघ्नतेची

चीड येते.

 

असो, हा अनुभव काही माझा एकटीचा नाही. तुम्हीही अशा अनुभवातून पोळून निघाला असाल याची मला खात्री आहे. मनुष्य स्वभावावर औषध नाही हे खरे आहे असे कधी कधी अशा अनुभवांमुळे वाटते पण आपला काही इलाज नाही हे ही खरेच आहे.माझ्या वडिलांनी कधीही कुणावर अन्याय केला नाही,

होऊ दिला नाही. हे वाघाचे काळीज कदाचित

देशसेवेतून त्यांना मिळाले असावे म्हणून इंग्रजांसह ते कुणालाच घाबरले नाहीत.माझे वडील चळवळीत होते. माझ्या जन्मापासून ते

कापडण्याला स्थिरावले. दोंडायच्याच्या राऊळांनी माझ्या वडिलांना बरीच शेती दिली

होती. टप्या टप्याने ते त्याचे हप्ते भरत होते. ते

देशभर फिरत असल्यामुळे त्यांनी मोठ्या भावाला ती शेती कसायला व पोटभरायला दिली.कारण घरची अत्यंत गरीबी होती.पण

वडील चळवळीतून मोकळे होताच ज्या पुतण्यांना त्यांनी उभे केले, मार्गी लावले, त्यांची लग्ने केली त्यांचीच नियत फिरली व सर्व जमिनीवर ते हक्क सांगू लागले व काकू औताला आडवी

आली. आता ते सगळेच गेलेत पण बघा कसे असते ना? ज्याचे भले करावे तेच आपल्या मुळावर उठतात. कोर्टात आमच्या बाजुने निकाल लागल्यावरही निम्मेशेती वडिलांनी

त्यांना दिली. आधी पण ते हेच सांगत होते,

निम्मे निम्मे घेऊ. पण नाही नियत फिरली व सगळी आमची म्हणायला लागले. असे असते

पहा, घरचे असे तर परक्यांकडून काय अपेक्षा

करायची? अर्थात, हा काही माझा एकटीचा

अनुभव नाही, स्वार्थ माणसाला कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही. तुम्ही जसजसे प्रगती पथाकडे जाता तसतशी शत्रूंची संख्या वाढत

जाते. माझे वडील सगळ्यांनाच पुरून उरले ही

गोष्ट वेगळी…

 

रोज सकाळी आमच्या देवडीत जणू जनता दरबार भरलेला असे. आपले नाना प्रश्न घेऊन

सकाळी लोक दारात येऊन बसत. पाचपन्नास

चपलांचे जोड रोज दाराशी असत. त्यात काम

घेऊन आलेले तसेच रिकामटेकडे, बघेही असत. टाईमपास करत गंमत बघायला आलेले. काही फुकटात पेपर वाचायला नियमित येत असत कारण गावात पेपर फक्त

आमच्या घरी येत असत.मग ते एकडोळा तिकडे ठेवत पेपर वाचत बसत. मिळालाच तर

फुकटात चहा ही मिळे.

 

असेच, आमच्या बांधाला बांध अनेक शेते आहेत त्यातील एकजण कायम पेपर वाचायला व गप्पा मारायला येत असे.बाहेरचे

कामकाज आटोपले की ते तडक घरात माझ्या

आईजवळ गप्पा मारायला येत असत. मग आईपण तिचे काम चालू ठेवत त्यांच्याशी बोलत असे. तिचे एकीकडे चुलीवर भाकरी थापणे व गप्पाही चालू असत. मी जवळच

आजूबाजूला असे सात आठ वर्षांची अशी,

माझ्याकानावर त्यांचे बोलणे पडे. मला त्यांचा

फार राग येई, पण लहान होते ना?

 

“मंग, आक्का कालदिन मयाम्हा गयथू बरं”

आई.. “मंग बरा सेतना गहू?”

कसाना बरा आक्का? गहूवर ते गेरू (गेरवा रोग) पडी ग्या बरं, काही खरं नही गहूस्नं”

माझी आई त्यांना ओळखून होती, हा कुजका

माणूस आहे म्हणून! ती मुळीच मनातून हलायची नाही( मला मात्र खूप राग यायचा,

ह्यांना काय करायचे आमच्या गव्हाशी?) का

ते आक्काशी असे बोलतात?पण मी लहान होते, काही बोलू शकत नव्हते. ते गेल्यावर मी

आईशी बोले, का हे असे बोलतात? आई म्हणे,”बोलू दे, काय व्हत नही”.

आई मोठी हुशार होती,ते रोग पडल्याचे बोलताच म्हणायची,”हा भाऊ, दखाई, जे जगनं

व्हई ते आपलं व्हई? काय करो मंग आते”?

असं बोलताच ते मग काढता पाय घेत असत.

काही लोकांना चांगले बोलताच येत नाही. त्यांची घडणंच तशी असते. काही तर कायम

तिरपेच बोलतात. कारण त्यांना सरळ बोलताच येत नाही. ते तरी काय करतील बिचारे? एकाच जमिनीत काकडी येते व कारलेही येते. तर ही असते कारल्याची जमात.

कारले बिचारे गुणकारी तरी आहे पण ही.. विषवल्ली सर्वत्र असते. तिच्याशी तुम्हाला

निपटता आले पाहिजे, बोलून किंवा न बोलूनही.आमच्या एका नातलगाने तर वडिलांना आयुष्यभर छळले, काय करणार?

“बहुरत्ना वसुंधरा” या मातीत सगळ्या प्रकारची रत्ने पिकतात हो! काही मधुर तर

काही विषारी असतात.झेलावे लागते, इलाज

नसतो कारण ते नको त्या जागेचे दुखणे असते.

असो, गंज माराईग्यात सुखदुखन्या गप्पा..

आखो भेटसुत पुढला आईतवारले…

राम राम मंडई….

 

जयहिंद… जय महाराष्ट्र…

 

आपलीच,

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा