तब्बल 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
2015 रोजी छोटा राजनने पनवेल येथील बिल्डर नंदू वाजेकर यांना धमकावून त्यांच्याकडे 26 कोटींची खंडणी मागितली होती. वाजेकर यांनी पुण्यात एक भूखंड खरेदी केला होता. त्याबदल्यात त्यांना पाहिजे आरोपी एजंट परमानंद ठक्कर याला 2 कोटी रुपये कमिशन द्यायचे होते. मात्र, ठक्कर याने वाजेकरांकडे अधिक पैशाची मागणी केली. त्याला वाजेकरांनी नकार दिला. त्यानंतर ठक्करने थेट छोटा राजनशी संपर्क साधला आणि वाजेकरला धमकावून दोन कोटीपेक्षा अधिक खंडणी मागण्यास सांगितलं.
त्यानंतर छोटा राजनने त्याच्या काही साथीदारांना वाजेकरांच्या कार्यालयात पाठवून धमकावण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर दोन कोटी ऐवजी वाजेकरांकडून 26 कोटीच्या खंडणीची मागणी करण्यात आली. खंडणी न दिल्यास वाजेकरांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या वाजेकरांनी पनवेल पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी छोटा राजन विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणात एकूण चार आरोपी असून सुरेश शिंदे आणि लक्ष्मण निकम ऊर्फ दादया, सुमित आणि विजय म्हात्रे अशी त्यांची नाव आहेत. पोलिसांना ठक्करचा अद्यापही शोध लागलेला नाही. बिल्डरकडे सीसीटीव्ही फुटेज असून त्यातून आरोपींनी वाजेकरांच्या कार्यालयात जाऊन त्यांना धमकावल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. शिवाय कॉल रेकॉर्डिंगमधूनही छोटा राजन त्यांना धमकावत असल्याचं दिसून येत आहे. याप्रकरणाची सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावर आज फैसला आला असून छोटा राजनसह तिघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.