You are currently viewing आशीर्वाद फाऊंडेशनच्या “रंगू वारी संगे” दिव्यांग चित्रकला स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न

आशीर्वाद फाऊंडेशनच्या “रंगू वारी संगे” दिव्यांग चित्रकला स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न

ठाणे :

 

दिव्यांग लोकांमध्ये उपजतच काही कला असतात. त्यांना व्यक्त होण्यासाठी चित्रकला, हस्तकला, संगीत अश्या अनेक प्रकारच्या कला सहाय्य्यभुत ठरतात. त्यांच्या ह्या कलागुणांना वाव द्यावा आणि त्यांना आपल्या कलेमार्फत व्यक्त होण्याची संधी मिळावी या उद्देशाने आशीर्वाद फाऊंडेशन,ठाणे ह्या संस्थेतर्फे आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा ह्या दोन दिवसांचे औचित्य साधून ठाण्यात दिनांक १२ जुलै, २०२४ शुक्रवार रोजी दिव्यांग लोकांसाठी “रंगू वारी संगे” चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

ह्या स्पर्धेमध्ये कमलिनी कर्णबधिर विद्यालय आणि जव्हेरी ठाणावाला कर्णबधिर विद्यालय ह्या दोन्ही शाळातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.वय वर्ष १० पासून ते वय वर्ष १८ पर्यंतचे विद्यार्थी स्पर्धक होते. विद्यार्थ्यांनी अतिशय अप्रतिम अशी चित्र काढली. आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा असे दोन विषय त्यांना स्पर्धेसाठी देण्यात आले होते. एकूण ३० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता. सौ. सौ.वर्षा गंद्रे आणि सौ. मंदाकिनी अहिरे मॅडम स्पर्धेच्या परीक्षक होत्या.स्पर्धेचा बक्षीस समारंभ २० जुलै रोजी पार पडला. ठाण्यातील सुप्रसिद्ध कलाकार श्री. सुधीर देहेरकर हे ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते मुलांना बक्षिसे वाटण्यात आली. मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल आणि त्यांच्या मेंदूची क्षमता वाढेल ह्यासाठी उपयुक्त असे खेळ मुलांना बक्षीस म्हणून देण्यात आले. स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धकाला फुलझाडाचे एक रोप स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल देण्यात आले. ह्या सर्व रोपांचे शाळेच्या आवारातच वृक्षारोपण करण्यात आले आहे. ह्या प्रसंगी कमलीनी कर्णबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मायाताई कुलकर्णी तसेच झव्हेरी ठाणावाला कर्णबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मनीषाताई गवाले तसेच कमलीनी कर्णबधिर विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि आशीर्वाद फाऊंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलीनी कर्णबधिर विद्यालयाच्या श्री. चितळकर सरांनी केले.

मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्याच बरोबर त्यांच्या सर्वांगीण विकासा साठी प्रयत्न करणे ह्याच हेतून आम्ही हि स्पर्धा भरवली होती. आणि मुलांकडून आम्हांला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला. तसेच रोप भेट म्हणून देऊन आम्ही निसर्ग संवर्धनाचा संदेशही मुलांना देऊ शकलो ह्याचा आम्हांला खूप आनंद आहे. असे आशीर्वाद फाऊंडेशन च्या संस्थापिका सौ.अश्विनी पटवर्धन पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. ही माहिती पत्रकार, साहित्यिक रुपेश पवार यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा