मुसळधार पावसाने तेरेखोल नदीने धोका पातळी ओलांडली…
बांदा शहरातील आळवाडी परिसरात पुराचे पाणी शिरले:प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा..
बांदा
मुसळधार पावसाने तेरेखोल नदीने धोका पातळी ओलांडली असून बांदा शहरातील आळवाडी परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती उद्भवण्याची स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बांदा परिसरात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. रात्रीच तेरेखोल नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने शहरातील आळवाडी कट्टा कॉर्नर रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे रात्रभर येथील व्यापाऱ्यांनी रात्र जागून काढली. आज सकाळी देखील पावसाचा जोर वाढल्याने पाणी याठिकाणी स्थिर आहे. मच्छिमार्केट परिसरात अद्यापही पाणी असून स्थानिक ग्रामस्थ व प्रशासन पूर स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. बांदा वाफोली रस्त्यावर रात्री निमजगा येथे पाणी आले होते. तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासन देखील सतर्क आहे.