You are currently viewing सावंतवाडी येथे पार पडली जिल्हा वीज ग्राहक संघटनेची जिल्हास्तरीय बैठक

सावंतवाडी येथे पार पडली जिल्हा वीज ग्राहक संघटनेची जिल्हास्तरीय बैठक

*जिल्ह्यातील वीजेचे प्रश्न घेऊन पदाधिकारी मुंबईत प्रतापगड येथे घेणार वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट*

 

सावंतवाडी:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत व्यापारी महासंघाच्या मदतीने “वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग” गेले दीड वर्षे लढत आहे. निवेदने, आंदोलने, उपोषणे आदी मार्ग अवलंबून वीज व्यवस्था सुरळीत होण्यासाठी रस्त्यावर देखील उतरले आहेत. वीज ग्राहक संघटनेच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील काही प्रश्न मार्गी लावण्यात देखील संघटनेला यश प्राप्त झाले आहे. परंतु जिल्ह्यातील महावितरणचे इन्फ्रास्ट्रक्चर डळमळीत असल्याने व ८५% च्या आसपास असलेला महावितरणचा अननुभवी कंत्राटी कर्मचारी वर्ग यामुळे जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील डळमळीत असलेली वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी पुढे कोणते पाऊल उचलावे याचा निर्णय घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळी ३.३० वाजता सावंतवाडी नगरपालिकेच्या सभागृहात जिल्ह्यातील वीज ग्राहक संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा सचिव दीपक पटेकर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश तथा बाळ बोर्डेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वीज ग्राहकांना भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी केवळ जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना धारेवर धरून चालणार नसून वरिष्ठ पातळीवरून हालचाली कराव्या लागतील याकरिता येत्या सोमवारी दिनांक २२ जुलै रोजी जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी महावितरणचे स्वतंत्र संचालक श्री.पाठक साहेब यांची फोर्ट मुंबई येथील कार्यालयात व महावितरणचे सीएमडी श्री.लोकेशचंद्र यांची महावितरणचे मुख्य कार्यालय प्रतापगड, बांद्रा येथे भेट घेणार आहेत. जिल्ह्यात महावितरणची ढासळलेली यंत्रणा, अपुरा साधनसामग्री पुरवठा, जुनाट विजेचे खांब, जुन्या वीज वाहिन्या, अननुभवी कंत्राटी कामगार, व जिल्ह्यात असलेले कामचुकार, मुजोर अधिकारी यामुळे जिल्ह्यातील वीज ग्राहकांची होणारी पिळवणूक याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहेत.

वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना सदस्य कृष्णा गवस व समीर माधव यांनी तालुक्यातील कोनशी, सरमळे, तांबोळी आदी गावांतील समस्या जैसे थे असून कोणीही या गावांना वाली उरला नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावेळी तात्काळ कार्यकारी अभियंता प्रभारी श्री. दिनोरे यांच्याशी संपर्क साधून सदर तक्रारींची दखल घेण्याची मागणी केली व बैठक संपताच सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांची भेट घेत सदर गावांतील तक्रारी तात्काळ सोडविण्याची मागणी केली त्याचबरोबर तळवडे येथील व्यावसायिकां सोबत देखील बुधवारी २४ जुलै रोजी संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन सोडवाव्यात, आरोस येथील वीज ग्राहकांच्या समस्या आदींवर त्वरित मार्ग काढण्याची मागणी केली. श्री.कुमार चव्हाण यांनी सदर तक्रारींची तात्काळ दखल घेण्याची ग्वाही देत बुधवारी तळवडे येथे बैठक घेण्याचे देखील मान्य केले.

या बैठकीसाठी वीज ग्राहक संघटना सदस्य समीर शिंदे, कृष्णा गवस, समीर माधव, मनोज घाटकर, साईनाथ आंबेरकर(कसाल), तुकाराम म्हापसेकर, वाल्मिकी कुबल आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा