*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*सटवाई*
मी पाच दिवसांची असताना सटवाईने माझ्या कानात हळूच विचारलं,
“ बोल काय लिहू तुझ्या भाळी?”
मी हसून म्हटलं,” लिही, ही सदैव आनंदात राहील.”
जगण्याच्या प्रक्रियेमध्ये सटवाईला विसरूनच गेले. जसं जीवन उभं ठाकलं, जशी आयुष्याने वळणं घेतली, सुख, दुःख, आनंद, अश्रू, समस्या, यश, अपयश, स्वप्नपूर्ती, स्वप्नभंग, जवळीक, दुरावे, प्रेम, द्वेष, नकार, होकार, संगत— विसंगत जे जे काही झोळीत टाकलं ना ते ते झेलत गेले. फुलेही वेचली, काटेही टोचले पण कधीच कसली तक्रार केली नाही. कधी रडले, रागावले, उद्विग्न झाले पण सावरले. मार्ग शोधत गेले, मार्ग सापडत गेले.
“आता काय करू? आता कसं होईल माझं?” असं कधी वाटलंच नाही असेही नाही पण त्यात्यावेळी आतून कुठून तरी ऊर्जा मिळायचीच. स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारं असं काहीतरी अंतरप्रवाहात खळखळायचं आणि पाण्यात डुबत असतानाही हातपाय मारत किनारा गाठता आला की प्रचंड आनंद व्हायचा. आयुष्यभर याच आनंदात आणि याच नंतर मिळणाऱ्या आनंदासाठी मी जगले.
“SHE ALSO RAN” याच सदरात मी असेन. “पहिली” वगैरे किंवा THE BEST वगैरे विशेषणे घेऊन मी कधीच मिरवले नाही. दुसऱ्याच्या यशात, आनंदात सहभागी झाले याचा अर्थ मी संतवृत्तीची वगैरेही नाही पण मृगजळाच्यापाठी कधी धावले नाही. बुद्धी स्थिर ठेवली. भरारी मारण्यापूर्वी पंखातली ताकद तराजूत मोजून घेतली म्हणून कदाचित आज मी सुखी आहे.
आयुष्याचा जमाखर्च लिहिताना खर्चाची बाजू जड असली तरी जी काही जमा आहे त्यात संतुष्ट आहे. *गेली ती गंगा राहिलं ते तीर्थ* या मनोवृत्तीमुळे जगण्यातला आनंद उपभोगला.
नशिबाला कधीच दोष दिला नाही.
त्यादिवशी अचानक सटवाई स्वप्नात आली. विचारले,”कशी आहेस?”
मी म्हणाले,” मजेत आहे.”
ती अंतर्धान पावत असताना मी तिला थांबवले.
“थांब माऊली. मी तुझी आभारी आहे. तू दिलेलं वचन पाळलंस. मी आनंदात आहे.”
*राधिका भांडारकर पुणे.*
राधिका भांडारकर.
(शब्द २३०)