You are currently viewing दातृत्वाची वृत्ती अंगी बाळगा: दिलिपभाई तळेकर

दातृत्वाची वृत्ती अंगी बाळगा: दिलिपभाई तळेकर

*मन मोठे करा, मनावरचा ताण आपोआपच कमी होईल : अविनाश मांजरेकर*

 

कणकवली / तळेरे :

 

दातृत्वाचे मूल्य हे निर्मोही,निस्वार्थी,कृपाळू भावनेत आहे. दातृत्वात भक्तीभाव असतो. उच्चतम निरपेक्ष अशी कुठलीच आसक्ती नसणारी दैवी, सद्गुनी, पुण्यशील भावना म्हणजे दातृत्व. तुम्ही कितीही मोठे झालात तरी आपल्या शाळेप्रती नेहमी दातृत्वाची भावना ठेवा, असे प्रतिपादन माजी सभापती दिलिपभाई तळेकर यांनी केले. ते वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळेरे येथील सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश घाडी यांनी प्रशालेला दिलेल्या प्रिंटर तसेच संगणक प्रदान सोहळ्यात बोलत होते.

प्रकाश घाडी हे प्रशालेचे गेली 36 वर्षे प्रयोगशाळा परिचर या पदावर कार्यरत होते.शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये ते सेवानिवृत्त झाले.सेवानिवृत्त झाले असले तरी ते प्रशाला नियमित भेट देत असतात. प्रशालेतील विद्यार्थ्यांची संगणकाची असलेली उणीव लक्षात घेऊन त्यांनी प्रशालेला 41 हजार रुपये किंमतीचा प्रिंटर व संगणक सेट भेट दिला. यावेळी त्यांचा विद्यालयाकडून शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शाळा समितीचे सदस्य शरद वायंगणकर,उमेश कदम,प्रवीण वरूणकर,संतोष जठार,प्राचार्य अविनाश मांजरेकर,ज्येष्ठ शिक्षक सी.व्ही.काटे,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. या उक्तीप्रमाणे आपणही दातृत्वाची वृत्ती ठेवली पाहिजे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून तुमची दातृत्वाची भावना दृढ होईल असा मला विश्वास आहे, असे मत शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी व्यक्त केले. मन मोठे करा, तुमचा मनावरचा ताण आपोआपच कमी होईल. दातृत्वाची ही वृत्ती हृदयात ठेवून आपण एखाद्याच्या संकटात उभे राहून त्यांचा ताण कमी केला की, आपला ताण आपोआपच निघून जातो व दहा दिशांनी आपल्याला मदतीचे हात उभे राहतात,हा मला विश्वास आहे असे विचार प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी कार्यक्रमात मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेच्या शिक्षका एस.यु.सुर्वे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा