कणकवली :
महाराष्ट्र अर्चरी असोसिएशन यांच्यातर्फे होत असलेल्या अमरावती येथील राज्यस्तरीय अर्चरी (तिरंदाजी) स्पर्धेत कणकवलीतील अक्सा मुदस्सर शिरगांवकर या १२ वर्षीय विद्यार्थिनीने १३ वर्षाखालील वयोगटामध्ये सुवर्णपद पटकावून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विशेष म्हणजे अक्सा हि पहिल्यांदाच राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाली होती. या यशामुळे अक्सा हीची राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कणकवली येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची अक्सा शिरगांवकर ही विद्यार्थीनी असून तिच्यातील तिरंदाजी खेळाचे कौशल्य पाहून तिच्या पालकांनी तिला सातारा येथील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्या अॅकॅडमीत पाठविले. गेल्या ८ महिन्यापासून ती सातारा येथेच राहून तिरंदाजीचे शिक्षण घेत आहे. याच दरम्यान अमरावती येथे महाराष्ट्र अर्चरी असोसिएशन यांच्यातर्फे विविध वयोगटांमध्ये तिरंदाजी स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेसाठी १३ वर्षाखालील वयोगटांमध्ये २०२ स्पर्धक सहभागी झाले होते. या वयोगटांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अक्सा ही एकमेव स्पर्धक होती. या वयोगटात २० जणांमध्ये मुख्य स्पर्धा रंगली अखेरीस अक्सा हीने महत्वपूर्ण लक्षभेद करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेदरम्यान अक्सा हीने १५ वर्षाखालील गटातही सहभाग घेतला आहे.
कणकवलीतील प्रथितयश शासकीय ठेकेदार मुदस्सर शिरगांवकर व खुशबू स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून प्रभावी कामगिरी करणाऱ्या राज्यस्तरीय पारितोषिक पुरस्कर्त्या सौ. तन्वीर शिरगांवकर यांची अक्सा ही कन्या आहे. अक्सा हिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.