You are currently viewing संघर्षाशी सशक्त लढा देणारा कवितासंग्रह : सिझर न झालेल्या कविता

संघर्षाशी सशक्त लढा देणारा कवितासंग्रह : सिझर न झालेल्या कविता

✍️पुस्तक परिचय✍️

*संघर्षाशी सशक्त लढा देणारा कवितासंग्रह : सिझर न झालेल्या कविता*

मा. डॉ. सुनील श्रीराम पवार सर लिखित ‘सिझर न झालेल्या कविता’ हा कवितासंग्रह वाचला आणि मन अगदी भरून आले. तोच छोटासा अनुभव कथन करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रयत्न यासाठी की मा. डॉ. सुनील पवार सरांनी जे लिहिले, तेव्हाचा त्यांचा भाव मला समजेल, हे पाहिजे तितके सोपे नाही. म्हणून प्रयत्न शब्द वापरला आहे.
हा कविता संग्रह माझ्या हातात आल्यावर मुखपृष्ठाला बघून मनात विचार आले की, या चित्राचा नेमका अर्थ तरी काय? परंतु संपूर्ण कविता संग्रह वाचल्यावर कळले की, मा. अरविंद शेलार सर यांनी साकारलेले चित्र म्हणजे कवितांशी एकरूप झालेले चित्र आहे. कवितांना अनुसरूनच या चित्राची निर्मिती झाली आहे. माझ्या मते या चित्रामधून विचारांच्या भोवऱ्यात अडकलेली एक व्यक्ती स्वतःच्या दृष्टीकोनातून हे जग बघण्याचा प्रयत्न करीत आहे आणि लेखणीद्वारे काहीतरी सांगण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मानवाच्या मेंदूतून मनात जाणारी भावना हळूहळू बहरत जाताना या चित्रात मला दिसली.
त्याचप्रमाणे ८९ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. श्रीपाल सबनीस सर यांची प्रस्तावना वाचली आणि पुस्तकाचे थोडेफार स्वरूप समजण्यास मदत झाली. कारण पाहिजे तेवढे मला स्वतःला आकलन झाले नाही. शेवटी साहित्यिकांची भाषा समजण्याइतपत मी अजून मोठी झाले नाही. त्यामुळे मला कठीणच गेले.
दुसरी गोष्ट म्हणजे , महाराष्ट्र राज्य मंत्रालयात सहसचिव असलेले मा. सिद्धार्थ खरात सरांचा अभिप्राय वाचला. त्यातील सर्वात शेवटच्या परिच्छेदात त्यांनी लिहिले आहे की, “कविता हा आत्महत्येला पर्याय असतो. असे मानणारा हा कवी लौकिकार्थाने स्वतःला अपयशी मानत असला तरी त्यांच्या कविता मात्र आशयाने गच्च भरलेल्या गर्भश्रीमंत आहेत”. सोबतच त्यांनी कुबेराइतकी श्रीमंती मा. डॉ. सुनील पवार सरांच्या काव्यप्रतिभेला दिली आहे. हे तितकेच खरे वाटते.
त्यानंतर आपल्या मनोगतात मा. डॉ. पवार सर जणू त्यांच्या जीवनाची प्रत्यक्ष कहाणी सांगत असल्याचे जाणवते. त्यांना केळीच्या पानात त्यांची जीवन प्रतिमा दिसल्याचे ते सांगतात. ती प्रतिमा मला प्रत्यक्ष माझ्या जीवनाशी संबंधित वाटली. त्यातूनच या काव्यसंग्रहाचा जन्म झाल्याचे महत्त्व मला अनुभवास आले. त्यांनी इथे सांगितले आहे की , “ मी सुचलेलं लिहिलं नाही तर बोचलेलं, साचलेलं लिहिलं. सिझर न करता…अगदी सहज !” हे वाक्य खरच कविता वाचण्या अगोदरच अधिक उत्स्तुकता निर्माण करते.
पुढे पानोपान सदरात एकुण ८३ कविता बघून वाटले दोन-तीन दिवस तर नक्कीच लागतील हे पुस्तक वाचायला, पण जेव्हा पुस्तक वाचत गेली. तेव्हा ५० वी कविता ‘मी निघालो’ या कवितेवर मी केव्हा आली हे कळलेच नाही. जेव्हा ‘मी निघालो’ हे शीर्षक वाचले तेंव्हा मला सुद्धा बाहेर जायचे आहे. याचे भान आले. परंतु पुस्तक आणि कविता या मूळातच माझ्या आवडत्या असल्याने मी पुन्हा समोरची कविता वाचत वाचत ८३ वी कविता ‘सिझर’ वर पोहचली.
अश्याप्रकारे माझे पुस्तक वाचण्याची सुरुवात मात्र सकारात्मकतेने झाली.
“सिझर न झालेल्या कविता” या संग्रहातील पहिलीच कविता ‘प्रार्थना’ यामधील कवितेचे भाव मला फार आवडले. पहिलीच ओळ माझ्या मनाला स्पर्शून गेली. ती म्हणजे –

“दमलेल्या मुसाफिराला एक वेळची रोटी दे,
लाख मोलाचा आनंद प्रत्येकाच्या ओठी दे”

यामध्ये मी स्वतःलाच दमलेली मुसाफिर समजले. सर्वांना लाख मोलाच्या आनंदाचे दान पहिल्याच ओळीत मागितले. हे मला खूप आवडले. दुसरी कविता ‘माय’ यामध्ये सुखाचा धागा लेकरासाठी ओवणारी माय कधीच स्वतःसाठी सजायची नाही. स्वतःचा विचार न करता आधी लेकरांचा विचार करणाऱ्या जगातील प्रत्येक माऊलीचे दर्शन ‘माय’ या कवितेतून मला झाले.
तसेच मिरगाचा पाऊस, कुंकू, चूल, मायची कहाणी यासारख्या कवितेतून वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांची जागा घेणारी आई, घरातील चूल नेहमी पेटत राहण्यासाठी कष्ट करणारी आई, सर्व जबाबदारी सांभाळत लेकराला जवळ घेऊन कुरवाळणारी आई, मूल्यसंस्कार देणारी आई, आपले मूल मोठे होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारी आई, माणुसकीची जाण ठेवणारी आई अश्या आईचे दर्शन मला या कवितेमधून झाले.
कष्ट करत मोठे होत असताना कवी सरांना ‘बाकी सर्व ठीक आहे’ या कवितेतून आजूबाजूच्या स्थितीचे खरे चित्र प्रतीत होते. त्यामध्ये –

“ पांढऱ्या नभांगणाखाली काळेच धंदे होत आहे
तेवढं सोडलं तर बाकी सर्व ठीक आहे ”

या कवितेतील ओळी समाजातील सत्य परिस्थितीचें वर्णन करताना दिसतात. त्याचप्रमाणे जुगारी, मूठभर आभाळ, लोकशाही, भ्रमनिरास, हुंदके, परिस्थिती, इलेक्शन, वांझ, गरीबाची दिवाळी, सर, खाजगी नोकरी, वांझोटा संताप, दुःखाचा तुडवून ऊर इत्यादी सारख्या कवितांमधून समाजातील माणुसकीचे विध्वंसक रूप बघायला मिळते. अंगुलीमालाचा माणूस करण्यासाठी तथागताच्या करुणेची गरज यामधून प्रत्ययास येते. समाजातील लोक व त्यांचे स्वतःच्या जीवनावर झालेले सकारात्मक वा नकारात्मक प्रभाव यामधून दिसून येतात.
कवितेवर प्रचंड विश्वास ठेवून माणसाच्या खांद्यावर जाण्यापेक्षा कवितेच्याच खांद्यावर शेवटचा श्वास घेण्याची इच्छा कवीने ‘कवितेच्या खांद्यावर’ या कवितेमधून व्यक्त केली आहे. त्यामधील पुढील ओळी-

“ विसर्जित करण्याआधी म्हणेल राख केविलवाणी
टिळा म्हणुनी लावा मला कागदाच्या माथ्यावरी ”

यामध्ये अत्यंत करुणामय शब्दात कविता लिहिलेल्या कागदांची राख टिळा म्हणून लावण्याची विनंती कवी करतांना दिसतात. कवितेवर एवढे अगाध प्रेम करणे आणि त्यासाठी प्राण गेले तरी, फक्त कविता जीवंत राहावी यासाठी प्रयत्न करणे असे निस्वार्थी विचार या कवितेमधून अनुभवास येतात. ‘आत्महत्या’ या कवितेत संयम, संघर्ष, हिंमत, धीर हे जीवनात आलेले अनुभव आहेत. त्यांनाच नेहमी नेहमी सामोरे जावून त्याचे चिंगम झाल्यासारखे त्यांना वाटते. त्यांनी या संघर्षमय जीवनात आलेल्या कटू प्रसंगांना सामोरे जात त्यांचा प्रतिकार केला. म्हणजेच त्यांची हत्या केली आणि म्हणूनच त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली नाही. या कवितेतून युवा पिढीला संदेश मिळतो की, कितीही मोठे संकट आले तरी स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायची आणि संकटाचा सामना मोठ्या धीराने करायचा. तसेच व्हॉट्स ॲप वरील फोटो वरून मानवाचे व्यक्तिमत्त्व, विचार, स्वभाव, पात्रता ठरविण्याचे निकष सध्या प्रचलित आहेत. असाच काहीसा प्रसंग ‘मेंदू धुवावा म्हणतो’ या कवितेत कवींनी रेखाटलेला आहे. त्यासाठी बुरसटलेल्या विचारांचा मेंदू कवींना धुवावा वाटतो. जेणे करून अशा विचारांना वाळवून, नव्या आधुनिक विचारांना बहरण्यास सहाय्य प्राप्त होईल, असे विचार ‘मेंदू धुवावा वाटतो’ या कवितेमधून डॉ. सुनील पवार सरांनी व्यक्त केले आहेत.
त्याचप्रमाणे विचारांच्या भोवऱ्यात गुरफटत असताना कविता हीच सखी सोबतीन असते म्हणून ‘कविते’ या कवितेमध्ये कवितेसोबतचा एकतर्फी संवाद त्यांनी केलेला आहे. कविता ही सखी आहेच पण, मायेचे पांघरून, बहिणीची माया, बापासारखा आधार असल्याने वेदनेचे गाठोडे फक्त कवितेपुढेच सोडले जातात. हेही तितकेच खरे आहे. संसारातील घाव झेलताना, अश्रूंना पुसत आणि पिसाऱ्यासारखे फुलून मनातील दुःख लपवित असतांना वैतागलेल्या माणसाची व्यथा कशी होते, हे ‘घाव माझा’ या कवितेमध्ये दिसून येते.
कवी डॉ.सुनील पवार सर यांच्या ‘सिझर न झालेल्या कविता’ या संग्रहात लोकरंग, खंजीर, निशा, रे जीवना, निर्मिती, कंठ दाटला चांदण्याचा, सन्मान, मरण सोहळा, मी पणाला, शब्द, दुःखातून, अंत, धाक नाही वेदनेला, सरडे, खंत, बोन्साय, भूक, गणित, साहित्याची वारी या कवितांमधून स्वतःसोबत लोकांवर सुद्धा झालेल्या अन्यायाची, व्यवहाराची, प्रामाणिकपणाची, सत्याची व माणुसकीची जाणीव या कविता मधून दिसते. एव्हढेच नाही तर त्यांची कविता अन्याय सहन करत अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करते. कवींवर आईने केलेले संस्कार, बाबाने सोडलेला श्वास याचे हृदयद्रावक चित्रणही डॉ.पवार सर यांनी कवितेद्वारे केलेले आहे.
कोरोना काळातील परिस्थीतीची प्रत्येकालाच माहिती आहे. त्यासंदर्भात कवी सरांनी सामसूम,अशी कशी महामारी, चायना पार्सल या कवितांमधून कोरोनामधील परिस्थितीचे वर्णन केलेले आहे. तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुध्द यांनी केलेले कार्य, त्यांनी पाहिलेले स्वप्न या सर्वाचा आरसा त्यांच्या शिवबा, चळवळ, तिरंगा, रमाई, बुद्धम् शरणम् गच्छामि या कवितेतून दिसतो. तर दुसरीकडे प्रेयसी, मैत्रीण, सखी असलेली एखादी व्यक्ती सर्वांच्या जीवनात असतेच. आपल्याला आवडलेल्या व्यक्तीला नेहमी आनंदी बघण्यासाठी आपण तिला नको असेल तर तिच्या जीवनातून नेहमीसाठी निघून जाणे हे खऱ्या प्रेमाचे प्रतीक समजले जाते. असेच काहीसे ‘मी निघालो’ या कवितेमध्ये जाणवते. जसे की-

“ हृदयात तुझ्या स्मृती पेरून मी निघालो
दोघातली कहाणी सांगून मी निघालो
तू हरली तरीही मी जिंकलो मात्र नाही
वाटेत तुझ्या चांदणे शिंपून मी निघालो ”

म्हणजे प्रेमातील खरी ताकद, त्यातील निस्वार्थ भाव, त्याग, समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करणे यात असते. हे या कवितांमधून अनुभवास येते.

सदर काव्यसंग्रहातील सयदाची गोडी, साक्ष, हृदय, पालखी, प्रेम, पावसाच्या आठवणी, उदास मैना, सय पावसाची, तुझे शब्द, बुध्द कळला नाही, …तर तू बिनधास्त ये अशा प्रेम कविता आणि प्रेमानेच दिलेल्या वेदना यांचे साध्या सरळ शब्दांमधून वर्णनामुळे डोळ्यांच्या कडा कधी पाणावून जातात हे कळत सुध्दा नाही. कोमल नाजूक हृदयावरील घाव किती खोलवर रूतत जातात आणि ते कवितेच्या माध्यमातून बाहेर पडताना ‘..तर तू बिनधास्त ये’ या कवितेच्या पुढील ओळीमधून दिसून येते,

“माझ्या उसवलेल्या आयुष्याचे
टाचे सांधायचे आहे काही
तू बिनधास्त ये
माझी ना नाही… “

यामध्ये स्वतःच्या प्रेयसीला पत्नी म्हणून घरात येण्याआधीच स्वतःच्या आयुष्याची सत्यता दाखविण्याचा प्रयत्न कवी करतात. अजून एक महत्त्वाचे म्हणजे कवितेची परिभाषा अजूनही कोणालाच तंतोतंत करता येणे शक्य नाही. असे मला वाटते. परंतु कवींनी त्यांच्या कविते, कविता लिहून, कविता असते, कविता, चंद्र संवाद, साहित्याची वारी या कवितांमधून कवितेचा खरा अर्थ प्रतिपादीत केलेला आहे असे समजते. त्यासाठी त्यांनी ‘कविता असते’ यामध्ये पुढील ओळींचा अगदी समर्पक असा अर्थ लावलेला बघायला मिळतो. जसे की –

“प्रतिभावंताला देताना दानशूर असते कविता
गायकाच्या गळ्यातला कोहिनूर असते कविता….

घायाळ तुम्ही झालात की रडू लागते कविता
म्हणूनच साऱ्यांना आवडू लागते कविता”

तसेच मित्रांसाठीचे प्रेम त्यांच्या अनुभवाचे बोल “मी नसतांना” या कवितेतून अगदी सहज व्यक्त होताना दिसतात. एखादा संदेश असो की प्रेम, रागावणे असो की रुसने असो असे सर्व भाव मित्रांसोबत जगले जातात हे या कवितेमध्ये दिसते. ‘लेक’ या कवितेमध्ये स्वतःच्या मुलीसोबत घालवलेले अनमोल प्रेमळ क्षण, ‘आजी’ या कवितेत आजीच्या जीवनाची व्यथा, तिचा संसार, तिला आलेले अनुभव आणि कविसाठी दिलेला संदेश दिसून येतो. ‘कोण म्हणतो’ या कवितेमध्ये बुलढाणा जिल्हा महान कसा आहे. हे पटवून देताना जिल्ह्याच्या उपकाराची जाणीव कवी सरांना होताना दिसते. ‘उदास मैना” या रचनेमध्ये राघू आणि मैना या दोघांची जीवन कथा मांडली आहे. ही एक छोटीशी कवितारूपी प्रेमकथा आहे. असे मला वाटते. ‘सपन’ या कवितेमध्ये तर आपला सर्वांचा पोशिंदा बळीराजाच्या स्वप्नाची हकीकत दाखविली आहे. काळ्या मातीतून उगवणाऱ्या धान्याची वाट पाहत असताना अचानकच पिकांची नासाडी होऊन त्यांचे स्वप्न एका क्षणात कसे भंग होते याचे चित्तथरारक दृष्य नजरेसमोर येते. शेवटी ‘सिझर’ ह्या कवितेने या काव्यसंग्रहाचा शेवट होताना दिसतो. सिझर न करता अगदी सहज एखाद्या कवितेने जन्म घ्यावा. असे कवी सरांना वाटते. ते म्हणतात –

पंख फुटले जखमांना तरी
वेदनेच्या कळा सोसून
प्रतिभेच्या उसन्या कळा
देऊ नये कवीने

अन् घालू नये जन्माला
एखादी लुळीपांगळी कविता
जबरदस्तीने सिझर करून…..

कविता ही ओढून ताणून करणे, जबरदस्तीने करणे, प्रसिद्धीसाठी करणे, यमकांची जुळवाजुळव करून तयार करणे याला कवी सर विरोध करतांना दिसतात. कविता ही मनातून सहज यावी आणि तिने पूर्ण जग व्यापून टाकावे असे त्यांना वाटते.
तसेच नामवंत ज्येष्ठ साहित्यीक मा श्री. यशवंत मनोहर सर यांनी डॉ. सुनील पवार सर यांच्या कवितासंग्रहाला पाठराखण करताना म्हटले की, “यातील कविता या दुःखांना हतबल करणाऱ्याच आहेत. ही माणसाच्या अजिंक्य जिद्दीचीच कविता आहे. म्हणून या कवितेला मी परावलंबनाला पराभूत करणारी माणसाच्या स्वयंसूर्यत्वाचीच कविता मानतो” यातूनच या कवितासंग्रहाची महानता लक्षात येते.
एकंदरीत ‘सिझर न झालेल्या कविता’ हा कवितासंग्रह सर्वांना प्रेरणा देणारा आहे. आई, वडील, मुलगी, मित्र, समाज, प्रेम, पत्नी, विरह, वेदना, दुःख, आनंद, जीवनातील कडू गोड प्रसंग, कल्पना, इतरांना संदेश, या सर्वांचे एकत्रित मिश्रण कवी मा. डॉ. सुनील पवार सर यांनी कवितेत केलेले दिसून येते. शब्द सामर्थ्यावर स्वतःचे स्थान निर्माण करून सरांनी निराश जीवनात आशेचे किरण बघत कवितारूपी जोडीदाराचा हात धरला आहे. हाच हात जीवन प्रवासात घट्ट पकडुन स्वतःला सावरत पुढे नेत आहेत. नवकवींना “सिझर न झालेल्या कविता” हा संग्रह नक्कीच मार्गदर्शक, आणि जुन्या कविंसाठी आस्वादक ठरेल असे मला वाटते.

प्रस्तुत कविता वाचताना दुःख काय असते, त्यातून वेदनेच्या कळा देत कविता कशी बहरते याची जाणीव होते. मा. डॉ.सुनील पवार सरांची साहित्याची वारी ही तथागतापर्यंत पोहचून त्यांच्या लेखणीतून पंढरी निर्माण व्हावी. अशी मी ईश्वरास प्रार्थना करते आणि त्यांच्या पुढील काव्यवारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देते.

पुस्तक परिचय:
️हर्षा बाबुराव खंडागळे.
गडचिरोली.
मो. न. – ९८९०९९४७४१

कवितासंग्रह :
सिझर न झालेल्या कविता
कवी : डॉ. सुनील श्रीराम पवार.
मो. न ९८८१८५१४१३
परीस प्रकाशन, पुणे
मूल्य : ₹ १७० पृष्ठे: १२८

.______________________________
*संवाद मिडिया* Advt

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
https://sanwadmedia.com/141730/
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा