कोकण रेल्वे रखडपट्टीचा प्रवाशांना मोठा फटका….
मत्स्यगंधा, मंगलोरचा मुक्काम वैभववाडी कणकवलीत : मंगलोरमधील ५१३ प्रवासी एस.टी.तून मुंबईला
कणकवली
कोकण रेल्वेचा मार्ग चोवीस तासानंतर सुरळीत झाला. मात्र तेवढे तास रेल्वेगाड्याही थांबल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मंगलोर एक्सप्रेसमधील ५१३ प्रवाशांना आज कणकवली स्थानकातून मुंबईला रवाना करण्यात आले. त्यासाठी एसटी. महामंडळाच्या १२ एस.टी. बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. मत्स्यगंधा एक्सप्रेस वैभववाडी स्थानकात खोळंबली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास ही गाडी रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाली.
दरड हटविण्याचे काम सायंकाळी पाच वाजत पूर्ण झाले. त्यानंतर कोकण रेल्वेच्या विविध स्थानकावर थांबलेल्या गाड्या रवाना करण्यात आल्या. सिंधुदुर्गातील वैभववाडी स्थानकात मत्स्यगंधा एक्सप्रेस तब्बल चोवीस तास खोळंबली होती. यात रेल्वे स्थानकातील उपहारगृहामधील खाद्य पदार्थ संपल्याने प्रवाशांना उपाशी राहण्याची वेळ आली. वैभववाडी रोटरी क्लब आणि युवा सेना यांच्या माध्यमातून चहा आणि बिस्कीट पुरवठा मदतकार्य करण्यात आल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. काल सायंकाळी सहा वाजता आलेली मत्स्यगंधा आज सायंकाळी सहा वाजता वैभववाडी स्थानकातून रवाना झाली.
कणकवली स्थानकात सकाळी सहा वाजता मंगलोर एक्सप्रेस थांबविण्यात आली. तर सकाळी दहा वाजता ही गाडी रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. तर दुपारी साडे अकरा वाजल्यापासून १२ एस.टी. बसेसमधून या प्रवाशांची मुंबईत रवानगी करण्यात आली. त्यासाठी एस.टी. विभागाने कणकवली आगारातून सहा, मालवण येथून चार तर देवगड आणि वेंगुर्ले आगारातून प्रत्येकी एक बस वापरली. तर कणकवली स्थानकातील मंगलोर एक्सप्रेस माघारी नेण्यात आली. मंगलोर एक्सप्रेसमधील प्रवाशांना सामाजिक कार्यकर्ते असलम शेख यांनी जेवणाच्या पॅकेट्सची व्यवस्था केली होती. दिल्लीकडे जाणारी मंगला एक्सप्रेस पहाटे साडे पाच वाजता सावंतवाडी स्थानकात दाखल झाली होती. ही गाडी सकाळी आठ वाजता कणकवली पर्यंत अाणण्यात आली. त्यानंतर पुन्हा ही गाडी मडगाव पर्यंत माघारी नेऊन लोंढा, मिरज मार्गे दिल्लीच्या दिशेने वळविण्यात आली. त्यामुळे कणकवली स्थानकातून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी खाली उतरून माघारी जाणे पसंत केले. तर मुंबई, दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना अठरा ते वीस तास विलंबाचा फटका बसला आहे.