You are currently viewing सोसायट्यांच्या माध्यमातून आता आंबा कॅनिंग आणि काजू खरेदी – मनिष दळवी

सोसायट्यांच्या माध्यमातून आता आंबा कॅनिंग आणि काजू खरेदी – मनिष दळवी

सोसायट्यांच्या माध्यमातून आता आंबा कॅनिंग आणि काजू खरेदी – मनिष दळवी

५० हून अधिक सचिवांची “केडर” प्रमाणे नियुक्ती करणार…

सावंतवाडी

आंबा कॅनिंग आणि काजू खरेदी असे उपक्रम राबवून ग्रामीण भागात काम करणाऱ्या विकास संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक धोरण ठरवत आहे. त्यामुळे त्याचा फायदा येणाऱ्या काळात निश्चितच होणार आहे. त्यासाठी विकास संस्थांनी स्वतःचे कार्यालय आणि गोदाम याची तयारी दर्शवावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज येथे केले. दरम्यान राज्य शासनाकडून विकास सेवा संस्थांचे सचिव “केडर” प्रमाणे भरती करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील ५० हून अधिक विकास सेवा संस्थांमध्ये सचिवांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा स्थानिक तरुणांना होणार असून विकास संस्था आणखी मजबूत होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून विकास सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत श्री. दळवी बोलत होते.

यावेळी जिल्हा बॅकेचे संचालक गजानन गावडे, महेश सारंग, रविंद्र मडगांवकर, विद्याधर परब, बँकेचे माजी संचालक गुरूनाथ पेडणेकर, सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, क्षेत्र वसुली उपसरव्यवस्थापक दत्ताराम गावडे, कर्ज विभाग प्रमुख के बी.वरक, संगणक संस्था प्रमुख वसंत हडकर, तालुका विकास अधिकारी व्ही एन डोर्लेकर, विकासअधिकारी संजय डंबे, सौ.सोनाली चव्हाण, सावंतवाडी शाखा व्यवस्थापक अमोल शिंदे, तसेच संस्था अध्यश, उपाध्यक्ष, सचिव, संस्था सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले, विकास संस्था तोट्यात जाऊ नये म्हणून योग्य वेळेवर वसुली करणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक ती उपाययोजना चेअरमन आणि सचिवांकडून राबविण्यात यावी. ज्या ठिकाणी कर्ज वसुली होत नाही त्या ठिकाणी संबंधितांना १०१ प्रमाणे नोटीस बजावण्यात याव्यात. आगामी काळात ग्रामीण भागात काम करणाऱ्या संस्था बळकट करण्यासाठी आमचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येक संस्थेने आपले गोदाम तसेच कार्यालय आणि सर्व कार्यालयाचे कामकाज संगणीकृत करण्यासाठी विशेष करून लक्ष देणे गरजेचे आहे. तरच हे उपक्रम राबवणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत नियोजन करावे काही तक्रारी असल्यास किंवा अडचणी असल्यास त्याच्या पाठीमागे सिंधुदुर्ग जिल्हा बँक ठामपणे राहणार आहे

यावेळी प्रत्येक सोसायटी आराखडा घेण्यात आला. १०० टक्के कर्ज वसुली करणाऱ्या विकास संस्थांचा गौरव करण्यात आला. यात आरोंदा विकास संस्था, कोलगाव विकास संस्था,रामेश्वर विकास संस्था डेगवे, भावई क्षेत्रपाल विकास संस्था कुणकेरी , आरोस विकास सोसायटी, वाफोली विकास सोसायटी ,सातार्डा विकास सोसायटी,वेर्ले विकास सोसायटी,चराठे विकास सोसायटी,देवसू विकास सोसायटी,चौकुळ विकास सोसायटी,थापेश्वर विकास संस्था,मळेवाड विकास संस्था.शिरशिंगे विकास संस्था, वेत्ये विकास संस्था,बांदा विकास संस्था, श्री.माउली महिला बहुउद्देशीय औद्यो.सह संस्था न्हावेली या संस्थांना गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा