*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ.स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम ललित लेख*
*कल्पनेचे पंख*
वास्तवाच्या पंखावर
भावरंग रोज नव नवे..
कल्पनेतलं विश्व मज
आज वाटे हवे हवे..
हो खरं आहे…! अगदीच खरं आहे.. हो खरंच खूप आवडतं मला कल्पनांच्या विश्वात रमणे… कल्पनांच्या पंखांवर स्वार होऊन खुल्या आसमंतात भरारी घेणे.. कल्पनांच्या पंखातली वास्तवांची सोनेरी पिसे चमचमत, फडफडत झेप घेऊ लागतात. ही गरुड झेप गगन भरारी घेत निळ्या नभंगणी उतरतात. पूर्ण गोल चंद्रावर फिदा होत, त्याच्या चंद्रकलात रममान होतात.
उत्तरेला स्थानपन्न असलेला स्थिर असा ध्रुवतारा आणि त्याचे आढळ ध्रुवपद याविषयी कुहुतल वाटते आणि थोडा हेवा पण वाटतो. लुकलुकणाऱ्या चांदण्या संगे बागडताना इंद्रधनु बनते… त्याच्या विखुरलेल्या सप्तरंगात खेळताना.. कधी शुक्राची टिमटिमती चांदणी बनवून ढगा आडून खुदकन हसत निळ्या गगनात लपते… पांढऱ्या कापसाच्या मेघमालेतून जणू इंद्राच्या पांढऱ्या घोड्यांच्या रथावर आरुढ होते. लुकलुकत्या तारकांनी सजलेले आकाश डोळे भरून पाहते. वाऱ्यावर हळुवारपणे डोलताना विजांचा लखलखणारा नाच पाहते…. मनाला निळ्या आसमंताची भुरळ पडते. आणि मग दूरवर दिसतो तो विश्वाचा रथ हाकणारा रवी राजा…. डोळे त्याच्या तेजोवलयाने दिपून जातात… मन पुलकित होते…. आणि दृष्टीस पडते ती जीवसृष्टीने बहरलेली हिरवीगार वसुंधरा.. सृजनशमतेचे स्त्रोत असणारी अवनी ,वरून इवलीशीच वाटत होती. पण तिची गुरुत्वाकर्षण शक्ती मात्र अफाट होती…
त्याच शक्तीने खुणावले का मनाला…?
हो तिच्या सौंदर्याचा आणि शक्तीचा मोह झाला मनाला… मग कोसळणाऱ्या पावसाच्या मोत्याच्या जलधारातून धरतीवर उतरले…
अन् सोहळा सुरू होतो तो सृजनतेचा… मृदगंधेत दरवळत हिरवे कोंब अंकुरताना अवघी जीवसृष्टी चैतन्यात न्हावून निघते.. आणि मग जगतजननी चा जन्मोत्सव सुरू होतो. वात्सल्याचा सोहळा माता -बालक दोन्ही रूपात बहरतो…अन् उधळण होते ती लक्ष्मी रुपात लयलूट करणाऱ्या हिरव्या निसर्ग संपन्नतेने भरलेल्या वैभवाची …..
कधी मधुमालतीच्या फुलाप्रमाणे हरित वेलीवर फुलते.. कधी फुलपाखरासम इवल्या इवल्या पंखात सप्तरंग लेवून मुक्तपणे विहरते… रानावनात, बागेत नाजूक कलीकेवर अन् दवबिंदूंनी सजलेल्या तृणांवर…..
अचानक कधी सोनेरी मासोळी होऊन, जलवलयांना भेदत तळ गाठते नितळ सरोवराचा…
मनात आलं की झेपही घेते, गरुड होऊन स्वच्छ निरभ्र निलाकाशी… हिमालयाच्या पर्वतरांगेत फिरत असताना ही वाऱ्यासंगे कल्पनेच्या पंखावरून अलगद उतरते सागराच्या फेसाळणाऱ्या लाटांवर… अगदी जवळून पाहते सागराचे ते अफाट अमर्याद निळे गहिरे रूप… तरीही सरितेच्या मिलनाला आसुसलेला, किनाऱ्यावर प्रेम करणारा, तो अथांग सागर… अबोलीचा गजरा माळून क्षितिजावर अवतरलेल्या रविकिरणांना स्पर्शून येते….. खोल तळाशी पडलेले शिंपले बघून, त्यातून वेचून घेत आहे मौल्यवान शुभ्र ज्ञानमोती.. माझ्या लेखणीतून पेरण्यासाठी…!
मग ज्ञानाची शेतं उगवतील… ज्ञानमोत्याच्या राशी पिकतील… आणि माता सरस्वतीच्या मुखातून वेद बोलतील…..
माझ्या या आवडीमुळेच माझ्यातल्या सृजनशीलतेला मूर्त स्वरूप प्राप्त होते. ते कधी कवितेच्या रूपात अंकुरते… तर कधी ललित लेखाच्या रूपाने बहरते…. तर कधी कथेतून व्यक्त होते…
हे सारे घडते कल्पनेतच…
कल्पना शक्तीचा अविष्कार नाही का हा….? जर भगवंताने ही शक्ती मनुष्याला दिलीच आहे तर… का जगावे शुष्क ..अकल्पित..? जगणे रोमांचक करण्यासाठी… सर्वानंद उपभोगण्यासाठी… मनुष्य जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी… करूनच घ्यावा पुरेपूर वापर कल्पनाशक्तीचा….. जे वास्तवात नाही जमत ते कल्पनांच्या रम्य दुनियेत अगदी सहज सोपे होते.. हवी असते केवळ अपार सकारात्मक ऊर्जा… कल्पना शोधाची जननी आहे हे तर जगमान्य आहे. मौलिक प्रतिभेला कल्पनेचे भावपंख लाभले की कल्पना शिल्प अस्तित्वात येते. मग ते चित्रकाराचे चित्र असो की शिल्पकाराचे शिल्प.. कवी मनाचे गीत ..काव्य… असो किंवा ललित लेखन, कथालेखन, किंवा कादंबरी लेखन असो. ते तर शोध कर्त्याच्या कल्पनेचे कल्पना अविष्कार असतात.
कल्पना विश्वात रमणाऱ्याला कोणी विचारेल का..? शिखरावरून कोसळणारा जलप्रवाह इतका उनाड का..? आणि ज्या खडकावर कोसळतोय ते खडक इतकं गंभीर का…? शीळ घालत उनाडक्या करत फिरणारा वारा का थबकतो..? रानातून येणारे कर्ण मधुर स्वर ऐकण्यासाठी का..?
सृष्टी ही सुद्धा कदाचित सृष्टीकर्त्याच्या कल्पनेच्या कुंचल्यातून साकारलेलं चित्र नसावं कशावरून….?
म्हणूनच कल्पनांचा हा मनमोहक चित्तरंजक प्रवास… रमून जगून पहावे.. मनोसोक्त या कल्पना विश्वात पंख पसरून घे झेप.. क्षितिज किंचितसे उसवून त्यापलीकडे पंख फडफडवत आनंदाने गाणे गाऊन अनंत होण्यासाठी जगणे सैलाऊ कल्पनांचे..
सौ स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग