You are currently viewing आरोंदा येथे साहित्य जागर

आरोंदा येथे साहित्य जागर

सावंतवाडी :

 

“दिवसेंदिवस कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रभाव वाढत चालला आहे.त्याचा प्रभाव साहित्य क्षेत्रावरही जाणवू लागला आहे. ‘एआय’ आता कथा लिहितो, कविता लिहितो,वैचारिक लेख लिहितो. अशावेळी साहित्य कट्ट्यांचे महत्त्व वाढले आहे. आपली जबाबदारी अधिक वाढली आहे.” असे प्रतिपादन आजगाव साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी आरोंदा येथे केले. ते जोशीवाडीतील भाऊ जोशी यांच्या निवासस्थानी रंगलेल्या आजगाव साहित्य कट्ट्याच्या ४५ व्या मासिक कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईस्थित दिगंबर जोशी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. स्वतः उपस्थित राहून त्यानी ही व्यवस्था केली होती.

प्रास्ताविकात कट्ट्याचा उद्देश स्पष्ट करून सौदागर यांनी ‘तुका मालवणीत सांगतय’ या आपल्या उपक्रमाबद्दल विस्तृतपणे माहिती दिली व आपली भूमिका स्पष्ट केली. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या अभंगाचा दाखला देऊन त्याचे मालवणी रूपांतर कसे केले जाते आणि ओवीतील अक्षरवृत्त कसे सांभाळले जाते, याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

त्यानंतर स्नेहा नारींगणेकर यांनी ‘पाऊले चालती’ या प्रासंगिक लेखाचे वाचन केले. अनेक अभंगांचे दाखले देत पंढरपूरच्या वारीचे महत्त्व अधोरेखित केले. फणसखोलचे सोमा गावडे यांनी ‘माझे लेखन’ याविषयानुसार स्वतःच्या लेखनाविषयी सांगितले. तसेच त्यातील मानसिकतेवर आणि अध्यात्मिकतेवर आपण कसा भर देतो, हे विस्तृतरित्या कथन केले. आयोजक दिगंबर जोशी यांनी ‘टीव्हीवरील एका कुकरी शो मध्ये आपला सहभाग’ या स्वतःच्या काल्पनिक कथेचे वाचन केले. कथा खुसखुशीत असल्याने रसिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळला. त्यानंतर सावंतवाडीहून आवर्जून उपस्थित राहिलेले डॉ. मधुकर घारपुरे यांनी आपल्या काही चारोळ्यांचे वाचन केले. घारपुरे यांनी सुमारे ४०० चारोळ्या लिहिलेली वही आणली होती आणि उपस्थित जो नंबर सांगतील त्या क्रमांकाच्या चारोळीचे त्यांनी वाचन केले. सरोज रेडकर यांनी रणजित देसाई यांच्या कथेबद्दल सांगितले. प्रसिध्द गायक शेखर पणशीकर यांनी ‘ग. दि. माडगूळकर यांची कोकण गीते आणि सागर गीते’ याविषयीच्या स्वतःच्या लेखाचे वाचन केले. “गोमू माहेरला जाते हो नाखवा’ ‘त्या तिथे पलीकडे’ अशा विविध गीतांचा उल्लेख करीत त्यातील मर्म त्यांनी उलगडून दाखवले. ‘

मांद्रे-गोवा येथील साहित्य संगम या संस्थेचे सचिव गजानन मांजरेकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. त्यांनी ‘फसवे शब्द आणि फसवीगीते’ याविषयावर भाष्य केले. ‘चंदनासी परिमळ’ ‘दासामणी जाता शरण’ आदी ओळींतील फसव्या शब्दांविषयी सागितले. दिगंबर जोशी यांनी सर्व उपस्थितांना पेन भेट दिले;तसेच सन्माननीय पाहुण्यांचा गुलाब पुष्प आणि श्रीपळ देऊन सन्मान केला. सौदागर यांनीही उपस्थितांना स्वतःचे ‘मायकू’ पुस्तक, तसेच पांडुरंग गावडे यांचे ‘सखी जन्मांतरीची’ पुस्तक भेट दिले.

कार्यक्रमाला आरोंदा वाचनालयाचे ग्रंथपाल चेतन आरोसकर, गुळदुवे वाचनालयाचे सचिव अरुण धर्णे, आरोंदा पोस्टमन केदार शिरोडकर, अविनाश जोशी, प्रकाश मिशाळ, एकनाथ शेटकर आणि अनिता सौदागर आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.वाहन व्यवस्था दीपक हळदणकर यांनी केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा