You are currently viewing चला पंढरीला जाऊ…!!!

चला पंढरीला जाऊ…!!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य जेष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*चला पंढरीला जाऊ…!!!*

 

आषाढी एकादशी निमीत्त विठ्ठलभक्त दर्शनासाठी पंढरपूरास पायी जातात.पंढरपूरची वारी करणारे ते वारकरी आणि त्यांचा वारकरी हा संप्रदाय. या संप्रदायात वर्ण जात धर्म याचा भेद नाही. सर्वसमावेशक असा हा संप्रदाय.आणि पंढरपूरच्या या पदयात्रेत भक्तगणांचा ऊत्स्फूर्त सहभाग असतो.उन, पाउस, वारा कशाचीही पर्वा न करता आनंद सोहळ्यात,लहानथोर,रंक, राव सारे एकात्म भावनेने सामील होतात.

कपाळी बुक्का,गळ्यात तुळशीमाळ,हरिपाठाचे पूजन,सात्विक आहार ही वारकर्‍यांची ओळख.

वारीची ही परंपरा ज्ञानेश्वर महाराजांच्या वडीलांपासून आहे.पुढे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन ज्ञानेश्वरांनी समाजसंघटनाचा पाया रचला आणि संत तुकाराम,नामदेव यांनी ती धुरा वाहिली.

पंढरपूर हे वारकर्‍यांचे तीर्थस्थान.भीमा तीरेवरचे पावन क्षेत्र. आषाढी एकादशीला,आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका असलेली पालखी,आणि देहुहून संत तुकारामाची पालखी, दिंड्या पताकासहीत पंढरपूरास पायी चालणार्‍या प्रचंड जनसमुदाया सवे येतात.विठोबाच्या दर्शनाचा

एक अपूर्व ,लोभसवाणा सोहळा घडतो. दुथडी भरून

वाहणार्‍या चंद्रभागेत स्नानाचे महात्म्यही अपार..

पावसाच्या अमृतधारांत ,ग्यानबा तुकारामाच्या गजरात,टाळ मुृदुंगाच्या वाद्यवृंदात,डोईवर तुळशीवृंदावन

घेउन चाललेली बाया बापड्यांची ,भक्तीरसात नाहून निघालेली वारी एखाद्या पांगळ्या पायात सुद्धा शक्ती निर्माण करते.

या वारीत ,रिंगण,झिम्मा ,फुगड्या असे उर्जादायी खेळही असतात. ठिकठिकाणच्या स्वयंसेवी संघटना

वारकर्‍यांच्या सुविधासाठी झटतात.

श्रद्धा आणि धार्मिकता म्हणजे परंपरा. पण पंढरीची वारी परंपरा सांकेतिक आहे.समाजाचं एकत्रीकरण

हा ध्यास आहे.विषमता निवारण हा सारांश आहे. पांडुरंग

ही अशी सगुण शक्ती आहे की जी भेदाभेदाची मूळे उखाडते.

परब्रह्माला घेउन विवेकाच्या दिशेने होणारी वाटचाल म्हणजे वारी…पायी वारी..

वारी वारी जन्म मरणाते वारी।

हारी पडलो आता संकट निवारी..

विठ्ठला मायबापा,तुझ्या दर्शनासी आतुरलो

भेट घडण्या पंढरपूरी आलो,,,,

 

राधिका भांडारकर पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा