You are currently viewing पांडुरंगा विठ्ठला

पांडुरंगा विठ्ठला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पांडुरंगा विठ्ठला*

===========

 

बा विठ्ठला, पांडुरंगा। खरंच कळत नाही ।

तू काय जादू केली आहेस तुझ्या भक्तांवर?

किती दूर दूर वरून येतात हे सारे ।

मैलोनमैल चालत येतात रे ।

हातात टाळ, चिपळ्या आहेत

आणि मुखाने तुझ्या नामाचा गजर चाललाय

अरे ऊन असो वा पाऊस

हे वारकरी चालतच राहतात

खाण्यापिण्याची सोय झाली न झाली

झोपायला घोंगडी मिळाली न मिळाली

तरी तुझ्या भेटीसाठी आसुसलेले असतात रे ।

अरे या आषाढात खाली चिखल

आणि वरून पावसाच्या धारा सुद्धा

त्यांना त्यांच्या ध्यासापासून अडवत नाहीत

अरे पंढरीला पोहोचले तरी तुझं दर्शन होणं कठीण

पण यांची श्रद्धा किती अपार

हे पंढरीत येतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात

आणि तुझ्या मंदिराच्या कळसालाच नमस्कार करून परत फिरतात

समोरून येणाऱ्या प्रत्येक भक्तात

त्यांना त्यांचा विठुराया दिसतो

आणि ते त्याच्या रूपातल्या तुला नमन करतात

ते तुझ्यापुढे पावसाचं गार्‍हाणं सांगत नाहीत

आपल्या व्यथा सांगत नाहीत

ते तर त्यांचं जीवनच

तुला अर्पण करून मोकळे होतात

आमचं बरं वाईट जे व्हायचं ते पांडुरंगाच्या

इच्छेने —कृपेने अशी आस्था त्यांच्या मनात असते

कुठून येते रे ही भक्ती ?

कुठून येतं हे तुझ्यावरचं भोळंभाबडं प्रेम?

खरंच पांडुरंगा तुझ्या सावळ्या रूपात

तू दडवलयस काय ?

तुझ्या नामात आहे तरी काय ?

सांग विठ्ठला आम्हाला कळू देच

तुझी जादू तरी आहे काय?

 

विद्या रानडे

प्रतिक्रिया व्यक्त करा