You are currently viewing जिवाची वारी…..

जिवाची वारी…..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम अभंग रचना*

 

*जिवाची वारी…..*

 

जन्मा येई जीव l वारीचे कारण l

जन्म न् मरण l दोन टोके l l…..१

 

वारीचा प्रारंभ l जन्म वेळ असे l

पार करीतसे lएक टप्पा l l…..२

 

बालपण जीवा l एक थांबा असे l

मन रमतसे l बालक्रीडा l l…..३

 

दुसरा तो थांबा l तारुण्यात येई l

संसाराच्या ठाई l गुंततसे l l….४

 

जीव व्यवहारी l रमतो संसारी l

घेई शिरावरी l कार्यध्वज l l….५

 

वय वाढू जाता l वारीची सवय l

मनी येई सय l पांडुरंगा l l….६

 

वारीचा शेवट l जाणवे मनास l

देखे अंतरास l जीव आता l l….७

 

देहाच्या रिंगणी l जीव फिरतसे l

अश्व जसा दिसे lवाखरीस ll….८

 

वारकरी होई l अगतिक जरी l

देह नाना परी l झिजतसे l l….९

 

जीवा दिसे आता l देवाचे राऊळ l

पाऊल उचल l वेगे वेगे l l….१०

 

उज्वला सहस्रबुद्धे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा