इंडियन इनस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे (IIM) घेण्यात आलेल्या कॉमन एन्ट्रान्स टेस्ट 2020 (CAT Result 2020) चा निकाल जाहीर झाला आहे. आयआयएम इंदौरनं प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये नऊ विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. यापैकी पाच विद्यार्थी आयआयटीचे आहेत. गेल्यावर्षीच्या प्रवेश परीक्षेत 10 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळवले होते.
इंडियन इनस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन या अभ्यासक्रमासासाठी CAT परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला 2 लाख 27 हजार 835 विद्यार्थी बसले होते. कोरोना संकट आणि इतर कारणांमुळे या वर्षी प्रवेश परीक्षेला विद्यार्थ्यांची संख्या कमी झालीय.
*निकाल असा पाहता येईल*
CAT 2020 परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रक आयआयएमची अधिकृत वेबसाईट www.iimcat.ac.in वर पाहता येईल. या परीक्षेची अंतिम उत्तर तालिका देखील मागील आठवड्यात जारी करण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेत यश मिळवले आहे. त्यांना पुढील फेरीसाठी आयआयएमकडून संपर्क साधण्यात येईल. आयआयएम प्रवेश परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची पुढील फेरीमध्ये मुलाखत किंवा अॅप्टिट्यड टेस्ट घेईल.
निकाल पाहण्यासाठी प्रथम तुम्हाला www.iimcat.ac.in या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर लॉगीन वर क्लिक करुन लिंक ओपन करावी लागेल. यानंतर जी टॅब ओपन होईल त्यावर नोदणी क्रमांक आणि पासवर्डद्वारे तुमच्या अकाऊंटमध्ये लॉगीन करुन निकाल पाहता येईल.
*कोरोनामुळे परीक्षेत बदल*
कोरोना विषाणू संसर्गामुळे यावर्षीच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला होता. परीक्षेचा कालावधी देखील कमी करण्यात आला होता. सन 2021-22 च्या एमबीए अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. CAT परीक्षेत यश मिळवल्यानंतर एमबीएला प्रवेश मिळेलच असं नाही. कारण यानंतरच्या फेरींमध्ये देखील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण व्हावं लागते.