भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग यांचा घणाघात
खा. नारायण राणे यांच्या माध्यमातूनच होणार जिल्हा बँकेचा विकास
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा बँक, भगिरथ प्रतिष्ठान, देसाई डेअरी यांनी सावंतवाडी माडखोल येथे दुग्धविकास प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. सतीश सावंत हे गेली पाच वर्ष जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना आता निवडणूक तोंडावर आल्यानंतरच शेतकऱ्यांना विविध आश्वासने देत फसवणूक करत आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच त्यांची ही फसवेगिरी सुरु आहे असा आरोप भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी केला.
दरम्यान, अशा फसवेगिरीला आमचे शेतकरी बळी पडणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या माध्यमातूनच जिल्हा बँकेचा विकास होणार आहे. ते दुग्धविकास मंत्री असताना कणकवलीमध्ये डेअरी बांधली आणि शेतकऱ्याना प्रत्येक घरात मुऱ्हा जातीची म्हैस देण्यात आली. त्यावेळी डेअरीमध्ये दररोज पंचवीस ते तीस हजार लीटर दूध रोज जमा होत होते. सिंधुदुर्ग बँकेला आपला शेतकरी सुखी व्हावा असे वाटत असेल तर ज्याप्रकारे नारायण राणे यांनी दुग्धविकास मंत्री असताना फुकट जनावरे दिली, तशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून प्रत्येक शेतकरी कुटुंबातील सदस्यांना फुकट म्हैशी देण्याचा कार्यक्रम करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
सतिश सावंत यांनी स्वत:च्या गावात आणि कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्ज दिली. त्यापैकी किती शेतकरी सुखी झाले आणि किती जणांना भिक मागायला लावली हे प्रथम पहावे. सिंधुदुर्ग बँक सर्वाना कर्ज देते. मात्र, शेतकर्यांच्या कर्जापोटी जमीन तारण घेऊन कर्ज थकीत झाल्यावर रोज वसुली पथक पाठवते. त्यावेळी कोणीही शेतकर्यांच्या मदतीला धावून येत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.