*ओंजळीतील शब्दफुले साहित्य समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पुष्पा कोल्हे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुझ्या पायरीचा दगड मी व्हावे!*
देवा पांडुरंगा कृपाळू अनंता
पाडी पावसाला ओल देई शेता
काळी माझी आई बीज धरी पोटी
पान टाळीसंगे भक्तिगीते ओठी
डोलते शिवार लहरते मन
कष्टल्या कायेला आनंद निधान
कणसात मोती चमकती शेती
तव कृपा मोठी सोनं येई हाती
भरले कोठार मिटली ददात
दैन्य जाई पार सौख्य ये घरात
सुखी तुझे पोर राहो सदाकाळी
आनंदे अभंगी वाजवितो टाळी
तुला मी भजावे तुला मी स्मरावे
तुझ्या पायरीचा दगड मी व्हावे!
–पुष्पा कोल्हे,
चेंबूर, मुंबई ७१