You are currently viewing परोपकारी आयएएस अधिकारी : स्व. रवींद्र जाधव

परोपकारी आयएएस अधिकारी : स्व. रवींद्र जाधव

सकाळी श्रीमती वीणाताई प्रदीपराव वानखडे यांचा फोन आला. सौ विद्याने तो उचलला. आमचे जिवलग मित्र श्री रवींद्र जाधव यांच्या दुःखद निधनाची बातमी त्यांनी दिली. मी लगेच जळगावला त्यांच्या निवासस्थानी फोन लावला. त्यांच्या सुनबाईंनी उचलला. सायं सहा वाजता जळगावला त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा असल्याचे त्यांनी कळवले आम्ही सर्वजण लगेच जळगावला जायला निघालो. रवींद्र जाधव हे आमच्या परिवारातील माझे व्याही श्री प्रदीप वानखडे यांचे ते वर्गमित्र. दोघेही जण चिखलदऱ्याच्या शासकीय विद्यानिकेतनमध्ये शिकले. जाधवसाहेब अमरावती विभागात असताना तसेच राष्ट्रपतीचे विशेष कार्यकारी अधिकारी असताना आणि नाशिकला विभागीय आयुक्त असताना व निवृत्त झाल्यानंतर आजपर्यंत त्यांचे माझे ऋणानुबंध कायम होते. चार नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस असायचा .मी आवर्जून त्यांना फोन करायचो .आमच्या मिशन आय ए एस च्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएसआय अकादमीच्या उपक्रमामध्ये ते सातत्याने सहभागी व्हायचे .कार्यक्रमाला यायचे .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे. मला आठवते एक वेळ तर ते रात्री बारापर्यंत विद्यार्थ्यांना आमच्या अभ्यासिकेत मार्गदर्शन करीत राहिले. आमचे ग्रंथालय 24 तास सुरू असायचे. रात्री बारा वाजेपर्यंत चाललेला हा मिशनच्या कार्यक्रमातील मैंलाचा दगड ठरावा असा कार्यक्रम .रवींद्र जाधव साहेब वेळोवेळी आमच्या मुलांचा उत्साह वाढवायचे. ते सांगायचे मी चिखलदरा येथे शासकीय वस्तीगृहात असताना आम्हाला सगळी कामे करावी लागत होती .अगदी स्वयंपाकासाठी जंगलातून फिरून लाकडे तोडून आणावी लागत होती. तसेच फरशा पुसाव्या लागत होत्या .एवढ्याच नाही तर आळीपाळीने मुलांना जेवण वाढावे लागत होते. हे सगळे करून या माणसाने राष्ट्रपतीच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदापर्यंत आणि विभागीय आयुक्त या पदापर्यंत मजल मारली होती .हा माणूस कधी अधिकारी वाटला नाही .अगदी सामान्य माणसाची दखल घेणारा .एक परोपकारी अधिकारी कसा असावा याचा आदर्श रवींद्र जाधव साहेबांनी आमच्यासमोर ठेवून दिला आहे .पण रहे ना रहे हम महका करेंगे .त्याप्रमाणे मला आठवते .आमच्या सौभाग्यवती शाळेची ट्रिप घेऊन दिल्ली येथे गेल्या होत्या. तेव्हा आमच्या सौभाग्यवती तपोवनच्या महामना मालवीय विद्यालयात मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. जाधवसाहेबांनी ट्रीप मधल्या सगळ्या मुलांची राष्ट्रपती भवनात भोजनाची व्यवस्था केली. सर्व मुलांचा मुख्याध्यापकांचा अध्यापकांचा राष्ट्रपतींबरोबर परिचय करून दिला. त्यांच्याबरोबर ग्रुप फोटो काढून दिला. याला म्हणतात माणुसकी. तपोवन्यातल्या मुलांनी राष्ट्रपती भवनात जेवण करणे ही अनन्य साधारण बाब होती. या मुलांच्या जीवनामध्ये आनंद पेरून रवींद्र जाधव साहेबांनी आपले कर्तव्य निभावले होते. पद्मश्री दाजीसाहेब पटवर्धन यांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण केली होती . जाधवसाहेबांना फोन केला की ते आवर्जून आमचे जावई कर्नल सारंग वानखडे यांच्याबद्दल विचारायचे. खरं म्हणजे सारंग हा त्यांचे मित्र श्री प्रदीप वानखडे यांचा मुलगा. पण स्वतःच्या मुलावर जसे प्रेम करावे .तसे त्यांनी सारंगवर केले. हा माझा हा परका हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता.जाधव साहेब अमरावती जिल्हाधिकारी म्हणून निरोप घेताना व निघताना आमचे दुसरे जिवलग मित्र श्री पुरुषोत्तम भापकर यांनी जिल्हाधिकारी पदाची धुरा सांभाळली. योगायोगाने चार्ज घेताना जिल्हाधिकाऱ्याच्या कक्षेत मी पुरुषोत्तम भापकर रवींद्र जाधव आणि त्यांचा स्वीय सहाय्यक एवढेच लोक होतो .जाधवसाहेब भापकर सर यांना म्हणाले हे काठोळे सर आहेत. लष्कराच्या भाकरी भाजणारे आहेत .प्रामाणिकपणे मिशन आय ए एस चे काम करीत आहेत.माझी एवढ्या सुंदर शब्दात नवीन जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी करून दिलेली ओळख आजही माझ्या लक्षात आहे. मला आठवते रवींद्र जाधव साहेब एक वेळ परत वाड्यावरून अमरावतीला येत होते .जोराचा पाऊस सुरू होता. त्यांच्या गाडीसमोर एक जोडपे मोटरसायकलवर चालले होते .पावसाचा जोर वाढला. ड्रायव्हरने गाडी बाजूला केली .पाऊस थोडा कमी झाल्यावर जाधव साहेब निघाले. त्यांना मोटरसायकलवर जाणाऱ्या जोडप्याची आठवण झाली. ते जोडपे कुठे दिसत नव्हते. जाधव साहेबांनी ड्रायव्हरला सांगितले .थोडा आजूबाजूला लाईट टाक आणि जेव्हा त्यांची गाडी आजूबाजूच्या खड्ड्याकडे गेली तेव्हा त्यांना ते जोडपे तिथे अपघात होऊन पडलेले दिसले .आपला जिल्हाधिकारी पदाचा बाज बाजूला ठेवून त्यांनी त्या परिवाराला दवाखान्यात पोहोचवले आणि त्यांचे प्राण वाचवले .एक आयएएस दर्जाचे अधिकारी एवढे मोठे काम करतो हे खरोखरच नोंदणीय आहे .आज रस्त्याने अनेक आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांच्या गाड्या धावताना दिसतात .परंतु जाधव साहेबांसारखे स्वतःहून त्या जोडप्याचा शोध घेणारे व त्यांना दवाखान्यात पोहोचून जीवदान देणारे लोक कमीच आहेत .कोणतेही काम ताबडतोब त्वरित करण्याची साहेबांना सवय होती.. आळस नावाचा प्रकार त्यांच्यामध्ये नव्हताच .माझ्या सतरा पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रपतीच्या हस्ते करायचे ठरवले. तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या अमरावतीला येणार होत्या. मी जाधव साहेबांना फोन लावला. त्यांनी लगेच होकार दिला व मला एक पत्र पाठवण्यास सांगितले .आमच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएस अकादमीचे काही लोक देखील राष्ट्रपतीची भेट घेऊ इश्चित होते. आम्ही त्यांचेही नावे पाठवली. श्रीमती प्रतिभाताई पाटील अमरावतीला आल्या. ठरल्याप्रमाणे आमचे नाव यादीत आली होती .पण दिल्ली कार्यालयातून नरेशचंद्र काठोळे आणि 21 अशी यादी आली होती. सुरक्षा अधिकारी माझ्याशिवाय इतरांना सोडायला तयार नव्हते. शेवटी माझ्या तेव्हाच्या सहकारी सौ ज्योती तोटेवार यांनी धावपळ केली. साहेबांना संपर्क केला आणि आमचा सर्वांचा जाण्याचा मार्ग सुकर केला. साहेबांच्या मुलीचे जळगावला लग्न होते. पत्रिका आली .त्याचबरोबर साहेबांचा फोन आला .साहेबांनी आठवणीने ताकीदच दिली .काठोळे तुम्ही आलेच पाहिजे.त्याप्रमाणे मी व माझे पत्रकार मित्र श्री नागेश गोळे साहेबांकडे लग्नाला पोहोचलो .प्रचंड गर्दी होती मंत्री आमदार खासदार ऑफिसर यांची रीघ लागली होती. तेवढेही धावपळीमध्ये साहेबांनी एक माणूस आमच्याबरोबर दिला आणि आमची निवासाची व्यवस्था केली. अमरावतीला साहेब जिल्हाधिकारी असताना त्यांचे निवासस्थान आम्हाला आमच्या घरासारखे वाटायचे. साहेबांची घराची आणि कार्यालयाची दारे माझ्यासाठी नाही तर खऱ्या अर्थाने समाजसेवा करणाऱ्या लोकांसाठी सदैव उघडे असायचे. नाशिकला साहेब विभागीय आयुक्त असताना आम्ही साहेबांकडे गेलो. सोबत सौ विद्या होती .नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील कार्यक्रम आटोपून मी अमरावतीला निघालो होतो. साहेबांनी मनापासून स्वागत केले .सौ वहिनीसाहेब घरी नव्हत्या. आमचे साहेबांची भेट झाली तेव्हा सायंकाळचे सात वाजले होते. साहेबांकडे दिल्लीचे काही पाहुणे पण आलेले होते .अल्पोपहार चहापाणी झाल्यावर मी साहेबांना म्हणालो की साहेब आम्ही निघतो .साहेबांनी घड्याळाकडे पाहिले .ते म्हणाले काठोळे तुम्ही आज मुक्काम करा .उद्या सकाळी जा. मी म्हणालों साहेब आम्ही निघतो. बाकी कुठेतरी मुक्काम करू. साहेब म्हणाले वाटेत कुठेतरी करणार आहात ना ? तर माझ्याच बंगल्यावर करा .सकाळी लवकर निघा .साहेबांनी त्या रात्री आमची आमच्या चालकाची राहण्याची जेवणाची व्यवस्था केली. आमच्याबरोबर जेवण घेतले आणि गप्पा गोष्टी झाल्यानंतर झोपायला जाण्यापूर्वी त्यांनी केअर टेकर ला सूचना केल्या. साहेब ज्यावेळेस जातील तेव्हा साहेबांना चहापाणी द्यायचे आणि त्यांच्यासाठी अल्पोहाराचा टिफिन पण द्यायचा .त्यांनी त्यांच्या मुलीसाठी राखीव असलेली रूम आम्हाला उपलब्ध करून दिली .विभागीय आयुक्त पदावर असलेल्या माणूस आमची एवढी काळजी घेत आहे हे पाहून मला देखील गहिवरून आले. आमची शेवटची भेट चिखलदऱ्याला झाली. आमचे मित्र परिवहन अधिकारी मार्तंड नेवासकर यांच्या मुलीचे लग्न होते. शासकीय± या लग्नाला आले होते .त्यानंतर आमचे फोनवर अधून मधून बोलणे व्हायचे .असा हा तुम्हाला आम्हाला मदत करणारा परोपकार करणारा अधिकारी आज आपल्यात नाही आहे त्याचे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच दुःख आहे .असे परोपकारी अधिकारी जाधव साहेबांच्या रूपाने त्यांच्या वारसा पुढे चालवतील अशी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना अपेक्षा करू या.

==============

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा