You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा महावितरणचे नवे अधीक्षक अभियंता श्री.अशोक साळुंके यांचे स्वागत झाले तक्रारींनी

सिंधुदुर्ग जिल्हा महावितरणचे नवे अधीक्षक अभियंता श्री.अशोक साळुंके यांचे स्वागत झाले तक्रारींनी

*वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग व व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अधीक्षक अभियंत्यांची भेट..

*वीज वितरण यंत्रणा सुधारण्याची श्री.साळुंके यांची ग्वाही*

 

कुडाळ :

 

सिंधुदुर्ग जिल्हा महावितरणचे नूतन अधीक्षक अभियंता म्हणून श्री अशोक साळुंके यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना व व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. परंतु यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांना गेली अनेक वर्ष भेडसावणाऱ्या तक्रारींचा वर्षाव वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्गच्या वतीने अधीक्षक अभियंत्यांवर झाला. त्यामुळे नूतन अधीक्षक अभियंत्यांचे स्वागत तक्रारींच्या वर्षावाने झाले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला दिवस आणि तक्रारींचा झालेला वर्षाव यामुळे नूतन अधीक्षक अभियंता खरे तर अवाक झाले परंतु जिल्हावासियांकडून आलेल्या तक्रारींचे शक्य तितक्या लवकर निरसन करण्याची ग्वाही श्री.अशोक साळुंके यांनी देत जिल्ह्यात भविष्यात महावितरणचे काम दर्जेदार होईल व तक्रारींसाठी कुणालाही यावे लागू नये अशी अपेक्षा व्यक्त करत आपल्या कामाची झलक दाखवली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी श्री.किशोर खोबरे हे वीज ग्राहक संघटनेशी चर्चा करण्यासाठी कुडाळ येथील कार्यालयात उपस्थित राहणार होते. त्यांची भेट घेण्यासाठी वीज ग्राहक संघटना व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी कुडाळ येथे गेले असता नूतन अधीक्षक अभियंता श्री साळुंके व जनसंपर्क अधिकारी श्री खोबरे दोघांची संयुक्त भेट झाली. यावेळी वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी नूतन अधीक्षक अभियंता यांच्यावर तक्रारींचा वर्षाव केला. गेले जवळपास दीड वर्ष जिल्ह्यातील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या तक्रारी न सुटल्याने त्यांचा पुरेपूर अभ्यास वीज ग्राहक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे तक्रारींची अभ्यासपूर्ण माहिती व जिल्ह्यातील वीज वितरणची खरी परिस्थिती नूतन अधीक्षक अभियंता यांच्यासमोर मांडली. यावेळी मुख्यतः जिल्ह्यातील वीज ग्राहकांना भेडसावणारे 10 मुद्दे अधीक्षक अभियंता यांच्या समोर ठेवण्यात आले. यात प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व उभे केलेले सडलेले वीज खांब आणि जुनाट वीज वाहिन्या बदलण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे नमूद केले. त्याचप्रमाणे कमी क्षमता असलेले, जुनाट ट्रान्सफॉर्मर व त्यामुळे होणारा कमी दाबाचा वीजपुरवठा याकरिता तातडीने जिल्ह्यातील ट्रान्सफॉर्मरचा सर्वे करून जिल्ह्याला आवश्यक असणारे जवळपास 50 पेक्षा जास्त ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जिल्ह्यातील जवळपास साडेतीन लाख वीज ग्राहकांपैकी एक लाख दहा हजार पेक्षा जास्त वीज मीटर नादुरुस्त किंवा बंद असल्याने लाखो वीज ग्राहकांच्या माथी महावितरण कडून सरासरी बिल मारले जाते. जिल्ह्यात बंद असलेले सर्व वीज मीटर तातडीने बदलून देण्यात यावे, ग्राहकांना अनाठाई येणारी वाढीव वीज बिल प्रश्न निकाली काढणे, महावितरणचे कर्मचारी ग्राहकांचे फोन उचलत नाहीत तर काही कर्मचारी ग्राहकांना उद्धट उत्तरे देतात, दादागिरीची भाषा करतात त्यांना योग्य ती समज देण्यात यावी, जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सीएफसी सेंटर सुरू करावी, जिल्ह्यातील काही अधिकारी ग्राहकांच्या हिटलिस्टवर आहेत त्यांना योग्य ती समज द्यावी, जिल्ह्यातील दोडामार्ग येथे 42 मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती केंद्र आहेत, जिथून कर्नाटक व गोवा राज्याला वीज विकली जाते. त्या वीज निर्मिती केंद्रामधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांना वीज मिळावी यासाठी महावितरण सिंधुदुर्गने वरिष्ठांकडे पाठपुरावा करावा, शाळांच्या मैदानावरून जाणाऱ्या वीज वीज वाहिन्या हटविण्यात याव्यात, त्याचप्रमाणे आंब्रड ते सोनवडे दुर्गवाडी येथील 39 किलोमीटर लांबीचा फिडर असल्याने वारंवार बिघाड होतो. त्याकरिता सोनवडे येथे कणकवली येथून वीजपुरवठा करून आंब्रड दशक्रोशीतील लोकांचा वीजेसाठीचा वनवास संपवावा. निरवडे येथील मंजूर सब स्टेशन आणि जिल्ह्यात आणखी 25 सबस्टेशन उभारण्यात यावीत, सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावासाठी बांदा ऐवजी मळेवाड उपकेन्द्रातून वीज पुरवठा व्हावा, अशा प्रकारच्या अनेक मागण्यांनी नूतन अधीक्षक अभियंत्यांवर वीज ग्राहक संघटना व व्यापारी महासंघाच्या वतीने तक्रारींचा जोरदार वर्षाव करण्यात आला.

वीज ग्राहक संघटनेच्या वतीने ज्याप्रमाणे तक्रारी देण्यात आल्या तशी त्याची तात्काळ लेखी नोंद घेत नूतन अधीक्षक अभियंता श्री अशोक साळुंके यांनी उद्यापासूनच तक्रारींचे निरसन करण्याचा आपला प्रयत्न असेल व सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली. यावेळी त्यांच्या सोबत कोकण विभागाचे जनसंपर्क अधिकारी श्री किशोर खोबरे, प्रभारी कार्यकारी अभियंता श्री.अभयसिंह दिनोरे यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा सचिव दीपक पटेकर, व्यापारी महासंघ कार्यवाह नितीन वाळके, द्वारकानाथ घुर्ये, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, गोविंद सावंत, राजन नाईक, नितीन तायशेटे, संजय भोगटे, अनिकेत सामंत, शार्दुल घुर्ये, संजय सावंत, केशव उर्फ आबा मुंज, चंद्रकांत म्हापणकर, तारकेश सावंत, प्रमोद आरोस्कर आदी वीज ग्राहक व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा