You are currently viewing ॥वारीची फलश्रुती॥

॥वारीची फलश्रुती॥

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*॥वारीची फलश्रुती॥*

 

“पाऊले चालती पंढरीची वाट…”अगदी लहान होते तेव्हापासून ह्या ओळी सतत कानावर पडत

आल्या.एखादी गोष्ट सतत कानावर पडत आली की तिचा संदर्भ, अन्वयार्थ केव्हातरी कळायला लागतोच.हळू हळू मलाही पंढरी, माऊली म्हणजे काय कळायला लागले.रेडिओवरही “कामगार सभा” या अकरा

वाजता लागणाऱ्या कार्यक्रमात सतत भक्तिगीते कानावर पडत असत.कामगार सभेने

आम्हाला तृप्त केले एवढी गाणी आम्ही ऐकली.

 

पूर्वी आजच्या सारखी एवढी प्रसार माध्यमे व

सुविधाही नव्हत्या. होत्या फक्त एस टीच्या लाल गाड्या. त्याही तुरळक असत.त्यामुळे प्रवास मोठा जिकिरीचा असे. एस टी ने खूप

लोक पंढरपूरला जात असत. पूर्वी पर्यटन म्हणजे देवस्थानी नि क्वचित.अहो, साधनेच

कमी होती नि पैशांचा एवढा सुळसुळाट नव्हता.शेतकरी तर बिचारे खूप विचार करून

निघत. कारण जायचे ते शेत मागे टाकून. पावसाळ्याचे दिवस.पिके पेरलेली असत.

दिंडी बरोबर जायचे म्हणजे निदान पंधरा दिवस किंवा जास्तही लागणार. पाय पंढरीकडे

ओढतात नि वारकरी निघतात.काही एस टी ने तर काही दिंडी बरोबर पायी.भारतीय समाज तसा देवभोळा व अध्यात्माकडे झुकणारा आहे

हे सर्वज्ञात आहे. या विश्वाची नियंती अशी कुणी एक शक्ती आहे हे सारेच मानतात व

आपापल्या परीने वेगवेगळ्या नावाने त्याची

आराधना करतात.नास्तिकांची ही संख्या आहे पण फार कमी.

 

नामदेव ज्ञानदेवादी संत, सर्व जातीधर्माचे, या

चंद्रभागे तीरी जमत व तिथे वैष्णवांचा मेळा भरत असे, अशी नामदेवांची साक्ष आहे.नामदेव

थेट उत्तरेत पोहोचले व त्यांनी भागवत धर्माचा

प्रसार, प्रचार केला व थेट गुरूबानीत ते समाविष्ट झाले.या सर्व संतांना भयानक अशा

सामाजिक छळाला तोंड द्यावे लागले त्यातून

ज्ञानेश्वरादी भावंडेही सुटले नाहीत व तुकारामही थेट पोहोचवले गेले तरी त्यांची

विठ्ठलावरची भक्ति कमी झाली नाहीच पण

वह्या बुडवूनही नामदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली मुखामुखातून अजरामर झाले ते आजतागायत.भक्तिमार्गाचा फार मोठा प्रसार

या साऱ्याच संतांनी केल्यामुळे ते आज देवत्वाला पावले व तीच भक्तिमार्गाची पताका

आज गावोगाव व पंढरीत फडकते आहे.पंढरी व विठोबा श्रद्धास्थान होते व आजही आहे,पुढेही राहील यात मुळीच शंका नाही. अखंडपणे ही वारी चालूच राहणार आहे कारण वारकऱ्यांची विठ्ठलावरची श्रद्धा अतूट

आहे ती कधीही कमी होणार नाही.

 

आज प्रसारमाध्यमांचा सुळसुळाट झाल्यामुळे

वारी घराघरात पोहोचली आहे. वारकऱ्यांबरोबर इतरांनाही वारीचा अनुभव घ्यावासा वाटतो आहे. वारीला स्पॅान्सर करणारे दानशूर पुढे येऊन वारकऱ्यांना सेवा सुविधा पुरवतातच पण गावागावातही वारकऱ्यांची सर्वतोपरी काळजी घेणाऱ्या व आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या संस्थाही पुढे येत

आहेत व वारकऱ्यांची काळजी घेत आहेत.

 

सुटसुटीत नियोजन व सर्व सोयी सुविधा या मुळे “वारी” आता अधिकच आनंद सोहळा झाला आहे.बाराही महिने संसारताप,काळज्या,

चिंता कुणाला सुटत नाहीत म्हणून काही दिवस तरी विठ्ठल नामात दंग होऊन सारे व्याप

ताप मागे टाकून, भवसंसार विसरून वारकऱ्यांसमवेत अवघाची संसार सुखाचा करत विठूमाऊलीचे दर्शन घेवून कृतकृत्य व्हावे

असे प्रत्येकालाच वाटते.१५ दिवस नामसंकीर्तनात व समुहात वावरण्याचा अनुभव

काही अद् भूत आहे याची प्रचिती अनेकांना येते आहे.एक प्रकारचा विरंगुळा किंवा बदल म्हणा हवं तर पण माणसाला तो हवा असतो.

आणि त्यातून कुणाला प्रचंड मानसिक सौख्य

मिळत असेल तर ही वारीची मोठीच फलश्रुती

म्हणावी लागेल. अहो, नुसत्या गर्दीचा अनुभव

सुद्धा रोमांचकारी आहे. एवढ्या संखेने भक्तांना

बघणे साधी का गोष्ट आहे?

 

शेवटी नियंता तोच आहे. तोच सांभाळतो, त्यालाच आपण साद घालतो, तोच दिलासा व

श्रद्धास्थान आहे हे ही सत्य आहे.माणसाला असे श्रद्धास्थान लागतेच व अवघ्या महाराष्ट्राचे

भाग्यस्थान विठोबा आहे.काही दिवस का होईना आपल्या चिंता काळज्या भार विठोबावर सोपवून निश्चिंत होता येत असेल

तर काय हरकत आहे?स्रियांना तर काही दिवस तरी संसारापासून सुटका मिळून मनासारखे जगता वागता बोलता येते व त्या

मोकळेपणाने वावरतात ही त्यांच्यासाठी फार

मोठी गोष्ट आहे, त्यापुढे मैलोन् मैल चालण्याचे श्रम त्यांना काहीच वाटत नाहीत.

ही आणखी एक फलश्रुती होय.प्रत्येक जण

आपापल्या परीने वारीचा अनुभव घेतो व समाधान पावतो, हे समाधानच तर हवे असते

ना माणसाला? वारीतून प्रत्येकाला काही ना काही मिळते व त्या अनुभवावर तो खुश असतो,

आणखी काय हवे ?

 

बरंय् मंडळी .. राम राम…

 

आपलीच..

प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा